मालिका विजयासाठी टीम इंडिया सज्ज

0
94

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज टी-२० मालिकेतील दुसरी लढत बारसापारा स्टेडियमवर खेळविण्यात येणार असून टीम इंडिया मालिका विजयाच्या इराद्यानेच मैदानावर उतरणार आहे. बारसापारा मैदानावरही हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना असेल. ऑस्ट्रेलियन संघ बरोबरी साधण्याच्या इराद्यानेच मैदानावर उतरेल.

टी-२० मालिकेतील रांचीत पावसाच्या व्यत्ययात झालेला सामना ९ गड्यांनी जिंकत भारतीय संघाने १-० आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमविल्यास टीम इंडियाला मालिका विजयासह जागतिक क्रमवारील तिसर्‍या स्थानावर पोहोचण्याची संधी आहे. रांचीत भारतीय फलंदाजांना पावसामुळे जास्त संधी मिळाली नव्हती. त्यामुळे संघात बदलाची शक्यता बरीच कमी आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी बजावली होती. बुमराह आणि कुलदीप यादव यांनी टिच्चून मारा केला होता. भुवनेश्वर कुमार व युजवेंद्र चहलनेही आपली कामगिरी योग्य प्रकारे निभावली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला कमी धावसंख्येवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले होत. तशाच कामगिरीची अपेक्षा कर्णधार विराट कोहलीला गोलंदाजांकडून असेल.

दुसर्‍या बाजूने ऑस्ट्रेलियाचे प्रदर्शन चांगले राहिले नव्हते. पूर्ण दौर्‍यातच त्यांचे खेळाडू संघर्ष करताना दिसत आहेत. ऑस्ट्रेलियन संघातही या सामन्यासाठी बदलाची शक्यता कमीच आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नरला फलंदाजांकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा असेल. ऑस्ट्रेलियन गोलंदाजी मात्र चांगली आहे. फलंदाज चमकल्यास गोलंदाज भारतावर भारीही पडू शकतात.

संभाव्य संघ ः भारत : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), मनीष पांडे, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), आरोन फिन्च, ग्लेन मॅक्सवेल, ट्रेव्हिस हेड, मोइसेस हॅन्रिक्स, डेन क्रिस्टियन, टिम पॅन, नाथन कुल्टर-नाइल, अँड्रयू टाई, ऍडम झम्पा, जेसन बेहरनड्रॉफ.