मालवण समुद्रात किल्ला…!

0
323

– गौतमी चोर्लेकर, शेळप बुद्रूक, वाळपई
ऐकिवात आलेले एक गीत…
मालवण समुद्रात किल्ला
शिवाजी आत कसा शिरला…!
खूप दिवसांची मनीषा होती, मालवणातअसलेला अरबी समुद्रातील हा किल्ला बघायची, अन् ती मनीषा पूर्ण झाली. अंदाजे तीन तासांचे अंतर कापून मजल.. दरमजल.. करत गेलो. खरेच, तेथे जाताच अन् महाराजांच्या त्या अप्रतिम कृतीचे दर्शन होताच डोळ्यांचे पारणे फिटले!
मालवणचं सौंदर्य तर मालवणच्या वेशीपासूनच आमच्या बरोबर होतं, पण किल्ल्याचं लावण्य काही औरच! मालवण जेटीवरून नजरेच्या टप्प्यात असलेला किल्ला बोटीतून जवळ जाता जाता भव्य-दिव्य वाटत होता. अन् महाद्वाराशी पोहोचताच त्याच्या महाकाय आकाराचा खराखुरा अंदाज आला. महाराजांनी अगदी सखोल विचार करून किल्ला बांधला असेल यात शंकाच नाही. त्यावेळी दर्यावर्दी इंग्रज आणि गोव्यातील पोर्तुगीज यांचा व्यवहार मार्ग हा अरबीसमुद्रच होता अन् आक्रमण मार्गही तोच. त्यामुळे सुरक्षेच्या बाजूने या समुद्रालगत किल्ला बांधणे नितांत गरजेचे होते. हीच गरज लक्षात घेऊन महाराजांनी किल्ला बांधायचे निश्‍चित केले आणि मालवणच्या या बेटाशिवाय अन्य योग्य जागा नसल्याचे चाणाक्ष महाराजांनी जाणले. अशा प्रकारे २५ नोव्हेंबर १६६४ साली समुद्रपूजन व किल्ल्याची पायाभरणी झाली.
मिळालेल्या माहितीनुसार श्री हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीखाली बांधण्यात आलेल्या या किल्ल्यासाठी ११०० कामगारांचा हातभार लागला आहे. तटबंदीच्या मजबुतीसाठी पायात शिसे ओतले आहेत. तर संपूर्ण किल्ला बांधकामासाठी एकूण १ कोटी होनांचा खर्च आलेला आहे. संपूर्ण बेट तटबंदीआड कैद केल्यासारखे आहे. नागमोडी वळणाच्या या तटबंदीवर जागोजागी तोफांसाठी नियोजित जागा दिसून येतात. तसेच प्रत्येक बुरुजावर टेहळणीसाठी चौकटी केलेल्याही स्पष्ट दिसतात. त्या जागांतून कुठूनही चाल करणारा शत्रू नजरेतून सुटण्याची शक्यताच नाही. मग तो समुद्रातून चाल करून येणारा असो वा जमिनीवरून, एकूण किल्ला पाहताना शिवाजी महाराजांची नियोजनबद्धता क्षणोक्षणी लक्षात येते. पण विशेष कौतुक वाटते ते मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस उभारलेल्या बुरुजांचे! तसे इतर छोटेमोठे बुरूज तटावर जागोजागी उभारले आहेत. पण यांची भव्यता काही औरच आहे. स्वराज्याची निशाणी असलेला भगवा फडकविण्यासाठी तेथे असलेली निशाण काठी त्या किल्ल्याच्या इतिहासाची साक्ष देणारी आहे.
किल्ल्यात आत शिवाजी महाराजांचे मंदिर, भगवान शंकराची पिंडी व नंदी, भवानी देवीचे मंदिर, गणपतीचे मंदिर आदी बांधलेले आहे. तसेच आत एक गोड्या पाण्याची विहीर आहे. चहूबाजूंनी खारा समुद्र अन् मध्ये गोड्या पाण्याची विहीर.. हे खरे अप्रूपच!
मालवणचा किल्ला शिवाजी महाराज, त्यांची चाणाक्ष बुद्धी, त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य आदी इतिहासाची साक्ष देणारा आहे. ही ऐतिहासिक इमारत महाराष्ट्र शासनाने सुरक्षित ठेवणे जेवढे गरजेचे आहे तेवढेच तुम्ही-आम्ही त्याची पवित्रता जाणून त्याची पवित्रता राखून ठेवणे!!