मायेची सावली!!

0
208

 – रश्मिता राजेंद्र सातोडकर
आज माझं शालेय जीवन जगत असताना मी खूप भाग्यवान आहे असंच वाटतं आहे. कारण शालेय जीवनातच एखादं सामाजिक कार्य करायला मिळणं ही माझ्या जीवनातील एक पवित्र गोष्टच आहे असं समजता येईल. याचं सर्व श्रेय मी केरी-सत्तरीतील विवेकानंद प्रेरणा प्रतिष्ठान, या संस्थेला देऊ इच्छिते. या संस्थेमुळेच आज मला समाजामध्ये वावरण्याची व समाजात मिसळण्याची संधी मिळते आहे. यातीलच एक योगायोग म्हणजे हल्लीच आमच्या संस्थेने रायगड-पेण येथील ‘अंकुर ट्रस्ट’ व ‘चाइल्ड हेवन’ या संस्थांना दिलेली भेट!!
अंकुर ट्रस्टमध्ये कार्यरत असलेल्या वैशाली पाटील यांनी एक दिवस आमच्या संस्थेला भेट दिली होती आणि या भेटीवेळीच त्यांनी त्यांच्या संस्थेला भेट देण्याचं निमंत्रणही दिलं होतं. त्यांनी दिलेल्या शाब्दिक माहितीतूनच ते चित्र मी माझ्या डोळ्यांसमोर उभी करीत होते. पण खरी ओढ लागली होती ती प्रत्यक्षात त्याठिकाणी पोहोचण्याची व तेथील वातावरणात रममाण होण्याची. अखेर ठरलेला दिवस उजाडला. सगळी तयारी करून आम्ही रेल्वेस्टेशनवर पोहोचलो. जेव्हा कोकणकन्या एक्सप्रेस समोरून येताना दिसली तेव्हा मी तर एकदम लहान मुलांसारख्या उड्याच मारायला सुरुवात केली. का.. कोण जाणे..परंतु तेथील मुलांमध्ये जाऊन मला बागडायचं आहे, हेच फक्त डोळ्यासमोर होतं. आई-बाबांचं प्रेम न मिळताही ही गोंडस मुलं या विश्‍वात कशीकाय रममाण झाली असतील, हे पाहायचं होतं.
पूर्ण रात्र प्रवास करून सकाळी त्याठिकाणी पोहोचलो. तेथे गेल्यावर मला खरोखरच बालकांच्या स्वर्गात गेल्यासारखं वाटत होतं कारण त्या संस्थेला दिलेलं नावही तसंच होतं- ‘‘चाइल्ड हेवन’’. मनमोकळेपणाने सर्व मुलं आपापल्या कामात दंग होती. खरोखरच तो बालकांचा स्वर्गच होता. आपला जन्मदाता कोण आहे हे तर थोड्यांना कळण्यापूर्वीच ही बालकं त्याठिकाणी आली होती आणि स्वतःच्या विश्‍वात रमली होती. त्यांनी तर या ठिकाणी आपलं जीवन जगायला सुरुवातही केली होती.
थोर कवी नारायण सुर्वे यांनी एका कवितेतून असं म्हटलेलं आहे की…
हंबरुनी वासराले
चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामध्ये
दिसती माझी माय…
पण तिथे मात्र चित्र काही वेगळंच होतं. त्यांना स्वतःच्या मायेचं असं कुणी माहीतच नव्हतं. घरात बाळ जन्माला आल्यापासून ते त्याचे बोट धरून त्याला चालवण्यापर्यंत आणि पुढे तो पाचवीत जाईपर्यंत त्याचे आईवडिलच त्याला भरवत असतात. परंतु येथे मात्र ही मुलं सगळं स्वतःचं स्वतःच करीत होती. कारण त्यांना ‘स्व’ची जाणीव झालेली दिसून येत होती. आज ही जाणीव फार कमी मुलांमध्ये दिसून येते.
एक वेगळेच दृश्य मी तिथे पाहिले ते म्हणजे आम्ही सगळीजणं मुलांबरोबर खेळत असताना एका मुलाचे नातेवाईक त्याला भेटायला आले. परंतु एक औपचारिकता म्हणून तो मुलगा त्यांच्याकडे गेला व लगेच येऊन आमच्यामध्ये मिसळला. हे पाहून मन थोडं अचंबितच झालं. कारण काहीतरी वेगळं असं माझ्या दृष्टीला दिसत होतं आणि मला स्वतःला खूप काही शिकवत होतं. स्वबळावर काम करण्याचा एक धडाच होता तो! देशाचा विकास आणि समाजाचा विकास करून भारत ही स्वर्गभूमी बनवू पाहणारे छोटे छोटे चेहरे माझ्या नजरेतून दिसत होते.हे सर्व चालू असताना आम्ही सर्वजण कधी त्यांच्याशी एकरूप झालो हे आमचं आम्हालाच कळलं नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचं युग असल्याकारणाने छोटी-छोटी मुलं आज मोबाईलवर स्वतःचा वेळ उगाच वाया घालवत असतात. अशा मुलांनी खरं तर या मुलांकडून शिकवण घेण्याची गरज आहे.
अंकुर म्हणजेच बिजाला फुटलेला कोंब आणि बीज म्हणजेच या अंकुर ट्रस्टमध्ये असलेली मुलं! या बिजांना कोंब येण्यासाठी अंकुर ट्रस्टची माणसं झटत आहेत. हा कोंब म्हणजे फक्त बीजातून फुटणारा कोंब नव्हे तर जगात स्वतःचं असं एक अस्तित्व निर्माण करणारं वास्तवमय जीवन! अशा या वास्तवमय जगात कातकरी समाजातील मुलांचा सहभाग आहे. या समाजातील मुलं नेहमीच रानावनात भटकत असतात. पण या अंकुर ट्रस्टने या मुलांवर आरोग्याची व मायेची सावली पांघरली आहे. ही मुलं रानावनात भटकू नयेत व त्यांना शालेय शिक्षण व सुसंस्कृत जीवन मिळावं म्हणून ही संस्था त्यांना आशेची किरणं प्रदान करीत आहे. आपण आणि आपल्या समाजाने कुठंतरी नाव कमवावं याची धडपड त्यांच्या मनात रुजवत आहे. आज पाहायला गेलो तर भयानक चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभी राहतात. अशी कितीतरी मुलं आहेत ज्यांना आईवडलांचं प्रेम व माया काय असतं ते ठाऊक नाही. म्हणून अशा मुलांना मायेची व आपुलकीची गरज असते. पण जेव्हा अशा संस्था निर्भयपणे या मुलांसाठी काम करताना दिसतात तेव्हा मनामध्ये असलेलं भयाण चित्र नाहीसं होतं. अशा संस्था चालविणार्‍यांना आमचा लाख- लाख सलाम!!!