मानस-वारी पंढरीची

0
389
  •  प्रा. रमेश सप्रे

मनाला स्नान नामाचं. चंद्रभागा शरीरासाठी, पण मनासाठी नामसंकीर्तन. पंढरी दिव्य नगरीच भासतेय श्रद्धेनं अनुभवली तर! किती मंदिरं, किती शिखरं, किती धर्मशाळा नि किती पाठशाळा! हे वैभवच देवांनीही हेवा करावं असं.
अशी सर्व इंद्रिये, सर्व गात्रे भगवद्भक्तीत डुंबत राहणं हीच खरी पंढरीची वारी आणि मनाच्या अंतर्कोशात ही वारी अनुभवणं ही मानस-वारी!

एक कविता होती. शाळेच्या पाठ्यपुस्तकात. लोककवी मनमोहन (नातू) यांची. पार्श्‍वभूमी होती महात्मा गांधीजींच्या मृत्यूची. आरंभीच्या दोन ओळी होत्या –

* ती पहा.. ती पहा बापूजींची प्राणज्योती |
तारकांच्या सुमनमाला देव त्यांना वाहताती ॥

त्याच चालीवर म्हणता येईल……
* ती पहा… ती पहा पंढरीची भव्य वारी |
भावनांच्या सुमनमाला देव तिजला वाहताती ॥

यावर्षी मात्र पार्श्‍वभूमी आहे कोविड-१९ची. वैष्णवांच्या महामारीची नाही तर कोरोनाच्या महामारीची. बोलबाला आहे विषाणूचा. त्यात विष्णूचा गजर हरवला तर नाही ना? शरीराच्या डोळ्यांनी (चर्मचक्षूंनी) पाहिलं तर – हो! आणि देहाच्या कानांनी ऐकलं तर होच! पण अंतश्चक्षूंनी म्हणजे मनाच्या डोळ्यांनी पाहिलं आणि मनाच्या कानांनी ऐकलं तर नाही. ध्यान देऊन ऐकलं – पाहिलं तर कोणता अनुभव येतोय?…

* ती पहा.. ती पहा पंढरीची दिव्य वारी|
भावनांच्या पुष्पमाला संत तिजला वाहताती ॥

– इंद्रायणीच्या तीरावरून सुरुवात –

हीच ती पंढरीची मानस-वारी. हीसुद्धा निघते इंद्रायणीच्या पाण्यात स्नान करून तिच्याच काठावरून … पण इंद्रायणी जमिनीवरून वाहणारी नदी नाही. ही आहे जीवनाची इंद्रायणी. कशी? तर ‘पश्य’ म्हणजे गीतेत भगवंत अर्जुनाला अनेकदा सांगतात ना ‘पश्य’ म्हणजे पाहून विचार कर नि विचार करत पहा. आपण अशीच अनुभवू या ही मानस-वारी. इंद्रियातून आपण जीवनातले अनुभव घेतो. या इंद्रियांची शक्ती आहे इंद्रा. तिचा स्वामी आहे इंद्र. त्याची राजधानी इंद्रप्रस्थ म्हणजे आपला देह. आणि या इंद्रप्रस्थातून – वाहणारी जीवनसरिता म्हणजे इंद्रायणी. तर या इंद्रायणीच्या तीरावरून सुरू होते मानस-वारी. दोन महान विभूतींना बरोबर घेऊन. एक देहात असूनही विदेही असलेला (देहभान नसलेला) देहूचा तुकोबा नि दुसरा ज्ञानोबा. दोघेही इंद्रायणी- काठचेच. दोघांच्या समाधीही इंद्रायणीकाठीच. दोघेही एकरूपच. दोघेही ज्ञानाचे ईश्‍वरच.

इंद्रायणी काठी देवाची आळंदी | लागली समाधी ज्ञानेशाची ॥
मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड | अंगणात झाड कैवल्याचे ॥

या कैवल्याच्या झाडाचं.. तुकोबा माउलीच्या देहूचं नाव आहे नांदुरकी. हे नांदुरकीचं झाड थरारतं तुकोबा माउलीची पालखी निघताना.
तसंच ज्ञानोबाची पालखी आळंदीहून निघताना शहारतो सोन्याचा पिंपळ. दोन्हीही झाडं कैवल्याचीच. मोक्षाचीच. त्यांच्या साक्षीनं नि गाथा- ज्ञानेश्‍वरीच्या साथीनं प्रस्थान ठेवू या. पंढरीच्या दिशेनं. पण ही पंढरीही वेगळी आहे-
‘काया ही पंढरी | आत्मा हा विठ्ठल |’ म्हणजे मुक्काम कायापंढरीला असला तरी दर्शन आत्मविठ्ठलाचंच. तेही कसं आतल्या आतच- ‘जसे दुधामध्ये लोणी | तैसा उभा चक्रपाणी ॥
या चक्रपाणीच्या सुदर्शनचक्रावर वसलेल्या आदिपंढरीकडे मानस-वारी निघालीय.
नामदेव या पंढरीचं प्रत्ययकारी वर्णन करतात –

आधी रचिली पंढरी | मग वैकुंठनगरी ॥
जेव्हा नव्हते चराचर | तेव्हा होते पंढरपुर ॥
जेव्हा नव्हती गोदागंगा | तेव्हा होती चंद्रभागा ॥
चंद्रभागेचे तटी | धन्य पंढरी गोमटी ॥
असे सुदर्शनावरी | म्हणुनी अविनाश पंढरी ॥
नामा म्हणे बा श्रीहरी | ते म्या देखिली पंढरी ॥

या चैतन्यपंढरीला जायचंय आपल्याला.
देहूहून निघताना तुकोबांच्या अभंगांच्या वह्या नाही घ्यायच्या बरोबर, तर पाण्यात बुडवल्यावरही त्या तरल्या कारण त्या वह्या झाल्या लाह्या.. हलक्या, तरंगणार्‍या!
नामाच्या भट्टीत भाजून अभंगधान्याच्या लाह्या झाल्या तुकयाच्या विठ्ठल नामानं…
देहूजवळील भंडार्‍याच्या डोंगरमाथ्यावर तुकोबांनी घेतलेलं नाम इतकं शाश्‍वत आहे की त्याची स्पंदनं आजही जाणवतात. तीनशे उन्हाळे – पावसाळे – हिवाळे कोसळूनही भंडार्‍यावरचं ते नाम तुम्हाला भावसमाधीत नेऊन नामातून ध्यानाचा जिवंत अनुभव देतं. याला साक्ष आहे खुद्द नामसाधक गु. बाबा बेलसरे यांची.
नंतर यायचं देवाच्या आळंदीला. ज्ञानोबांच्या पादुका हृदयगाभार्‍यात स्थापन करायच्या. त्यांच्याच शब्दात संकल्प करायचा-

‘सद्गुरुंची पाऊले हृदयी धरीन| आनंदे भरीन तिन्ही लोक ॥

– दिवेघाटातील विठ्ठलमूर्ती –

आता मीलन ग्यानबा-तुकारामाचं पुण्यनगरीत. हीच खरी त्या पुण्याची पुण्याई!
मानसवारीत दिसताहेत मनाच्या पडद्यावर आकाशातल्या तार्‍यांसारखे वारकरी बंधुभगिनी, नव्हे जिकडे तिकडे माउलीच माउली!
सरकतेय पुढे मानसवारी. दिवेघाट. या घाटात दरवर्षी नागिणीसारखी दिसते ही वारी. चढण चढणारे हजारो वारकरी. चढतानाही टाळांचा ठेका, पायांचा ताल चुकत नाही. यावेळी मात्र नागिणीऐवजी तिच्यासारखीच सरसरत वर चढणारी कुंडलिनी असणार आहे. मुख्य म्हणजे कुंडलिनी रखुमाई असंही म्हटलं जातं. या रखुमाईला डोळे भरून पाहणार आहे विठुराया. नुकतीच साठ फूट उंचीची भव्य विठ्ठलमूर्ती दिवेघाटात स्थापन केली गेलीय. रुप तसंच पण अवखळ हास्य गोपाळकृष्णाचं. नाहीतरी विठ्ठल आहेच कृष्णाचं एक रूप.

पंढरपूरच्या प्रसिद्ध विठ्ठलमंदिरात विठोबा आणि रुक्मिणी यांची स्वतंत्र मंदिरं आहेत. त्याला एक कारण म्हणजे त्याच्यातील वाद. रुक्मिणीला वाटतं वैकुंठाला जावं. पण विठुरायाची एकच अट. पंढरपूरला रात्रंदिवस अखंड नामगजर होत असतो. त्यामुळे विठुरायाचा पाय तिथून निघत नाही. दोन नामांच्यामध्ये चुकून जरी क्षणाचीही फट पडली तर त्या फटीतून तो निसटून जाऊ शकतो. पण अशी फट युगानुयुगे पडलीच नाही. म्हणून त्याला अठ्ठावीस युगं विटेवर तिष्ठत उभं राहावं लागलंय. पुंडलिकाच्या माता-पित्यांची चरणसेवा हे एक निमित्त आहे. खरं कारण चोखा मेळ्यानं आपल्या भावपूर्ण अभंगात वर्णन केलंय-
विठ्ठल विठ्ठल गजरी | अवघी दुमदुमली पंढरी ॥
होतो नामाचा गजर | दिंड्या पताकांचा भार ॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान | अपार वैष्णव ते जाण ॥
हरिकीर्तनाची दाटी | चोखा तेथे घाली मिठी ॥

या पंढरीला मानस-वारीतून जायचंय. दिवेघाटातल्या विठ्ठलाच्या महामूर्तीचा एक विशेष आहे. त्याच्या कपाळावर जो रेखीव टिळा आहे त्याला सोन्याचा मुलामा दिला आहे. एका अर्थी विठ्ठलाचा हा सौभाग्यतिलक आहे. कारण तो रुक्मिणीचं प्रतीक आहे. रुक्म म्हणजे सोनं नि रुक्मिणी म्हणजे मूर्तिमंत सोनं. म्हणजे विठ्ठलरखुमाईचं मधुर मीलन या मूर्तीत फार कल्पकतेनं घडवलंय. याचं दर्शन घेत म्हणजे याच्यावर चिंतन करत मानसवारीत पुढे सरायचंय. चिंतन करताना स्मरणातील एकेक प्रसंग आठवायचा असतो.

एक फारच उद्बोधक प्रसंग आहे –
एका विशेष पर्वकाळी नारदांच्या सांगण्यावरून सत्यभामेनं त्यांना कृष्णाचं दान दिलं. हेतू हा की पुढील सात जन्म कृष्ण आपल्या एकटीलाच मिळावा. या जन्मात तो अनेक जणीत वाटला गेलाय. यात सवतीमत्सर नव्हता तर कृष्णाबद्दल स्वामित्वभावना होती. नारद कृष्णाला घेऊन जायला लागल्यावर आपली चूक तिच्या लक्षात आली. तिनं नारदांना याबद्दल विचारताच ते म्हणाले, ‘‘कृष्ण तुमच्याजवळ असावा असं वाटत असेल तर त्याच्या वजनाएवढं सोनं मला द्या.’’ सगळ्यांकडे असलेलं सारं सोनं जरी तराजूच्या एका पारड्यात घातलं तरी कृष्णाचं जड पारडं खालीच राहिलं. दासीनं रुक्मिणीला जेव्हा हा सारा प्रकार सांगितला तेव्हा ती तुळशीची उपासना करत होती. तुळशीचं एक पिकलेलं – पिवळं पान तिनं दासीकडे देऊन सोन्याच्या ढिगावर ठेवायला सांगितलं. तसं केल्यावर कृष्णाचं पारडं एकदम वर उचललं गेलं. त्या पानात भक्तीची शक्ती रुक्मिणीची म्हणजे साक्षात् सुवर्णमूर्तीची ती शक्ती होती.

या प्रसंगाची म्हणून पांडुरंगाच्या कपाळावरच्या उभ्या गंधाच्या टिळ्यावर सोन्याचा लेप दिलाय. त्याच्या दिव्य दृष्टीला दिसत असतील दिवेघाटातून चढणार्‍या वारकरी मंडळींच्या असंख्य छायाकृती नि कानावर पडत असतील पखवाज, वीणा टाळ यांचा सूक्ष्म घोष. मनात साठवायची ती भव्य मूर्ती नि चित्तात भरून घ्यायचा हा सूक्ष्मातला प्रत्ययकारी अनुभव!
तुकोबांचा दिव्य अनुभव- पडिले वळण इंद्रिया सकळ| – हा आपलाही अनुभव बनला पाहिजे. वळण परमार्थाचं असेल तर मानसवारीत रंगत येईल. नाहीतर प्रपंचाची पंगत बसेल. या संदर्भात तुकोबांच्या अभंगातील काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील.
आधी होता वाघ्या | दैवयोगे झाला पाग्या ॥
त्याचा येळकोट राहिना | मूळ स्वभाव जाईना ॥

आणखीनही उदाहरणं तुकोबांनी दिलीयत. खंडोबाच्या जेजुरीपुढून जाताना मनात ‘यळकोट यळकोट, जय मल्हार’चा घोष करून पुन्हा ‘ग्यानबा-तुकाराम’च्या समेवर येऊ या. सर्वांत महत्त्वाची गोष्ट या अभंगाचा कळसबिंदू. मानसवारीत करावयाच्या संकल्पांपैकी एक संकल्प. अखंंड नामात किंवा सत्संगात राहण्याचा. अर्थातच मनाच्या पातळीवर. तुका स्वतःबद्दल सांगतो –
आधी होता संतसंग | तुका झाला पांडुरंग |
त्याचे भजन राहीना | मूळ स्वभाव जाईना ॥

– आता खरी पंढरीची वारी –

मानसवारीची वाटचाल चालूच आहे. आतला नामघोष बाहेरून जाणवू लागलाय. सारं खूप सोपं वाटू लागलंय. मानसपावलं पडत असताना आलं सासवड. सोपानदेवांची समाधी. भक्तीची वाट तशी सोपी वाटली तरी प्रत्यक्षात –
‘भक्ती सुळावरची पोळी| तेथे पाहिजे बळी ॥ सोपानदेवांच्या समाधीपुढे मनानं रेंगाळताना आतून आवाज आला, ‘सोपान मी, सोपा न मी’ मी सोपान असलो तरी भक्तीचा सोपान (जिना) चढून जाणं सोपं नाही. एकेका टप्प्यावर एकेक तप घालवावं लागतं तेव्हा पुढची वाटचाल किंवा प्रगती शक्य होते.

संतांच्या संगतीत मानसवारी चालू राहते. सत्संगाची शिदोरी बरोबर असते. वाटेवरच्या निसर्गानं पडलेल्या पावसामुळे टाकलेली कात हिरवाईच्या कैक छटा दाखवतेय. डोळ्यातून आत जाणारी निसर्गदृश्य मनाला शांत नि संपन्न करताहेत.

वारकर्‍यांनी घातलेल्या फुगड्या, घोड्याचं ते वेगात पुरं केलेलं रिंगण, त्यावेळी भाबड्या डोळ्यात दिसणारे आर्त भाव, डोक्यावर तुळस घेऊन डोलणार्‍या वारकरी भगिनी, दिंड्या, पालख्या सारा सात्त्विक जल्लोष नि भगवंत- भक्तांच्या नामाचा संगीतमय घोष. हे सारं कल्पनेनं अनुभवायचं मनात नि स्मृतिकोशात.

मानसवारी पोचली वारवरीला. हा तसा पंढरीत पोचण्यापूर्वीचा अखेरचा मुक्काम. सर्व पालख्या इथं येऊन एक महासंगम होतो. अवकाश व्यापून जातं भावस्पंदनांनी आणि दिशा दुमदुमून जातात नामनिनादांनी. काय भाग्य असेल त्या वारवरीच्या मातीचं. गुलाल-बुक्का याप्रमाणे ही मातीही कपाळावर लावावी भस्मविभूती म्हणून.
आता शिरायचं पंढरीत. मनाला स्नान नामाचं. चंद्रभागा शरीरासाठी, पण मनासाठी नामसंकीर्तन. पंढरी दिव्य नगरीच भासतेय श्रद्धेनं अनुभवली तर!

किती मंदिरं, किती शिखरं, किती धर्मशाळा नि किती पाठशाळा! हे वैभवच देवांनीही हेवा करावं असं. अनेक नामधुंद वारकर्‍यांकडे पाहिलं की ज्ञानोबामाउली कानात सांगते ते मनात ऐकायचं नि अनुभव घ्यायचा. समोरच्या असंख्य वारकर्‍यांपैकी वरच्या अवस्थेत पोचलेले थोडेच असले तरी काय असते त्यांच्या जीवनाची दिव्य पातळी!

भगवंत सांगताहेत अर्जुनाला नि ज्ञानोबा सांगतोय आपल्याला – खरे भक्त कसे असतात?
जयांचिया वाचे माझे आलाप | दृष्टी भोगी माझेचि रूप |
जयांचे मन संकल्प | माझाचि वाहे ॥
माझिया कीर्तिविण | जयांचे रिते नाही श्रवण |
जयां सर्वांगी भूषण | माझी सेवा ॥

अशी सर्व इंद्रिये, सर्व गात्रे भगवद्भक्तीत डुंबत राहणं हीच खरी पंढरीची वारी आणि मनाच्या अंतर्कोशात ही वारी अनुभवणं ही मानस-वारी!
कसा झाला आपला प्रवास?
* शरीराकडून आत्म्याकडे … देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे…
* आजुबाजूच्या परिसराच्या परिघाकडून … आतल्या स्थिर आत्मकेंद्राकडे…
* तळमळीच्या वेदनेकडून सहसंवेदनेकडे (फ्रॉम पॅशन् टू कंपॅशन्)
* मूर्तीकडून अमूर्त देवत्वाकडे … दिव्यत्वाकडे …
* बुद्धीकडून हृदयाकडे
* रामाकडून नामाकडे, आत्मारामाकडे.
मानसवारी आता अखंड चालू ठेवायची. म्हणायचं- ‘विठो, आता तुझं-माझं राज्य’. देहुआळंदीहून निघाली तेव्हा मानसवारी स्फुरण पातळीवर होती. नाभीस्थानी होती. सासवडला पोचली ती स्पंदन अवस्थेत पोचली. हृदयाकडे.
वारवरीला वारी पोचली कंपनांकडे, आंदोलनांकडे. कंठाजवळ. अन् पंढरीला पोचलेली वारी होती उच्चारणाकडे. घोषाकडे. ओठातून बाहेर. हाच प्रवास आध्यात्मिक उपासनेचाही आहे. नाभीतलं स्फुरण, छातीतलं स्पंदन कंठातलं कंपन नि ओठातलं उच्चारण.. अर्थातच प्रभूनामाचं. नाभीपासून ओठापर्यंत आणि ओठांपासून नाभीपर्यंत अखंड मानसवारी सुरू ठेवली पाहिजे.
पू. गोंदवलेकर महाराज तळमळीनं नि कळकळीनं सांगतात-
सोडू नका नाम, धरु नका काम | नाही नाही नेम आयुष्याचा |
दीनदास म्हणे सांगतो ते ऐका | अभ्यास वैखरी सोडू नका ॥

मानसवारीचा आरंभ तुकोबाच्या चैतन्यसमाधीपासून झाला तर शेवट झाला विठोबाच्या स्थिर, स्तब्ध, शांत स्वरूपात.. आता परतायचं कशाला? राहायचं इथंच तुक्याचा अनुभव येईलच…
‘विठ्ठल पहावया गेलो | विठ्ठल होउनिया ठेलो ॥ विठ्ठल .. विठ्ठल .. विट्ठल … विठ्ठल…