मानव – निसर्ग ः एक अतूट नातं

0
2476

– दासू शिरोडकर

झाडं आणि निसर्ग हा माणसाचा सर्वश्रेष्ठ असा मित्र आहे. एक वेळ आपण आपलं सर्वस्व पणाला लावून लाडाने वाढविलेली आपली मुलं मोठी झाल्यावर आम्हाला विसरतील; पण प्रेमाने लावलेली आणि निष्ठेने वाढविलेली झाडं माणसाला कधीच दगा देत नाहीत, त्याची कधी फसगत करीत नाहीत. कारण माणसांप्रमाणे त्यांच्या ठायी हेवेदावे आणि स्वार्थ असत नाहीत.

मला गंमत वाटते, माणसांना आज ‘झाडे लावा..’ असे सांगावे लागते. त्यासाठी त्यांना रोपटी उपलब्ध करून द्यावी लागतात. काही ठिकाणी तर माणसांना झाडांचे महत्त्व पटवून देण्यासाठी व त्यांना झाडे लावण्यास प्रेरित करण्यासाठी वनमहोत्सवासारखे उपक्रम घडवून आणावे लागतात. सरकारतर्फे झाडे उपलब्ध करून दिली जातात. या निमित्ताने राजकारणी रोपटी वाटण्याचे कार्यक्रम घडवून आणून वर्तमानपत्रातून आपले फोटो छापून आणून राजकारण साधतात.
खरं म्हणजे, भारतासारख्या शेतीप्रधान देशात लोकांना झाडे लावा.. असं सांगण्याची गरज पडू नये. ते उत्स्फूर्त व्हायला हवं. काहींच्या बाबतीत तसं ते होतंही. पाऊस पडून धरती ओलीचिंब झाली की झाडांची आवड असलेला माणूस अवजारं घेऊन मातीत उतरतोच. मग रोपं, शेती, जमिनीशी काहीतरी लगड झगड होतेच. तरी आज काळाच्या ओघात काही माणसं शिक्षण, नोकरी, तंत्रज्ञान वगैरेच्या शोधात शहरांकडे धावायला लागलीत. मग शहरातील लोकांना झाडे कुठे लावावीत असा प्रश्‍न पडत असावा. अशा माणसांनी मोठी नसली तरी छोटी फुलांची, शोभेची रोपं आपल्या इमारतीभोवतीच्या जागेत किंवा गच्चीवर कुंड्यांमध्ये लावावीत. तुम्ही अशी रोपं लावून निष्ठेने त्यांची निगा राखा, मशागत करा. त्यांची वाढ निरखत रहा. त्यांना लागणारी फुलं, फळं पहा. तो आनंद आणि ते समाधान शब्दांपलीकडची असतात. एकदा अनुभव घेऊन तर पहा.
आमच्या कुटुंबाच्या बाबतीत आम्हाला झाडं लावा, असं सांगण्याची आमच्या वाडवडिलांना कधी गरज पडली नाही. ते आमच्या रक्तातंच आलं, निदान माझ्या बाबतीत तरी. मैंगाळ (तरवळे, शिरोडा परीसर) सारख्या खेडवळ भागात बालपण गेलं. घरची परंपरागत शेती-बागायती म्हणून हालचाल करायला शिकलो ते माती आणि चिखलातच. घराच्या मागील बाजूस हौदासारखी उघडी विहीर (आज दगडांनी बांधून काढलीय) आणि बाजूला नाला (ओहळ). पावसाळ्यात दोन्ही ठिकाणी भरपूर पाणी. मग काय? डुबक्या, बुचकाळ्या, हुंदडणं व्हायचंच. घरासभोवतालच्या परिसरात पेरू, रामफळ, पपई, बोरं, तोरिंग, अंबाडा, बकूळ, शंकर, दशवंती, अनंतासारखी छोटी झाडं आणि माड, आंबा, फणस, कोकमाचं झाड, भिरंड, खष्टीचं झाड, काजूची झाडं, जांभा, किनळ (रानटी झाडं) अशी मोठी झाडं होती. किंचित मोठा झाल्यावर यातल्या होईल त्या झाडांवर चढून फुलं, फळं काढण्याचे पराक्रम आम्ही मुलांनी त्या काळात केले होते. त्यामुळे झाडं-पेडं आणि निसर्गाशी वीण घट्ट जुळलेली होती. त्यातूनच बालपणापासूनच झाडं लावण्याचं वेड लागलं. म्हणून कुठेही फिरताना उपयोगी पडणारं असं एखादं झाडाचं रोपटं दिसलं की उपटून नेऊन ते आमच्या बागायतीत लावायचं, हा जणू छंदच जडून गेला होता. त्यासाठी घराभोवतालच्या परिसरातल्या मोठ्या झाडांच्या मध्ये उगवणारी रानटी झुडपं आणि वेली कोयत्याने कापून कापून आम्ही मुलं तो भाग साफ करायचो. त्यामुळे आज तो परिसर रानटी झुडपं आणि वेलींपासून मुक्त झाला आहे आणि त्या ठिकाणी आज माड, पोफळीच्या माडी, आंबा, फणसाची कलमी झाडं, पेरू, अंबाडा, नीरफणस, जाम, बिंबल, करमल, रामफळ, पपई वगैरे फळांची झाडं तसंच विविध फुलांची झाडं दाटीवाटीने उभी राहून आम्हाला फळं, फुलं देत आहेत. तरी अजून कुठं एखादं नवीन कलमी रोपटं दिसलं, तर ते आणून लावायची हौस आहेच.
मध्यंतरी नोकरीसाठी काही काळ शहरात राहणं झालं. तरी झाडं आणि निसर्गाशी असलेली नाळ तुटली नाही. सुटीच्या दिवशी गावात जाऊन, बागायतीची देखभाल, मशागत करणं व्हायचंच. कारण झाडांप्रतीची ओढच तशी होती. आता निवृत्तीनंतर मुक्काम गावीच आहे. मग काय? लेखन आणि बाकी वेळेत बागायतीची देखभाल, हाच दिवसाचा नित्यक्रम झाला आहे.
झाडं आणि निसर्गावरील प्रेमाने एक शिकवण अनुभवाने मिळालीय. त्यांच्यावर जेवढं प्रेम तुम्ही कराल, त्यापेक्षा किती तरी अधिक निसर्ग तुम्हाला भरभरून देत असतो. झाडं आज आम्हाला फुलं, फळं, लाकडं देतात. प्राणवायुयुक्त शुद्ध हवा देतात. पाऊस-पाणी व सावली देतात. जमिनीत ओलावा ठेवतात. जमिनीची धूप होण्यापासून रक्षण करतात. हे सारं ती निरिच्छ भावनेने करत असतात. म्हणूनच झाडांवर माझं जन्मतःच प्रेम आहे. आमच्या बागायतीत कामाला येणार्‍या बाया नेहमीच म्हणतात, ‘‘दादा, आपल्या मुलांचीही कधी घेतली नसेल इतकी काळजी झाडांची घेतात.’’ खरं आहे हे. झाडं तर मी लावतोच, त्याचबरोबर त्यांच्या वाढीसाठीही मी तेवढाच दक्ष असतो. आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वतःकडून होत नसलं तरी कामगार आणून त्यांची मशागत करतो. लावलेलं एखादं झाड कोणत्याही कारणाने मेलं तर मला अतिशय दुःख होतं. मला आठवतं, दोन वर्षांपूर्वीच्या पावसाळ्यात एका चक्रीवादळामुळे माझ्या बागेतलं एक-दोनेक मीटर गरगरीत वाढलेलं मलेशियन जातीचं फणसाचं कलमी झाड पिळवटून काढल्याप्रमाणे मुळातूनच मोडून पडलं होतं. त्याला वाचविण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण ते वाचलं नाही. तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. नंतर तशाच प्रकारचं दुसरं कलम मी त्याच ठिकाणी लावलं. आज ते पूर्वीच्या झाडाइतकंच वाढलं आहे. हे माझं झाडांवरील प्रेम. कारण माझ्या मते झाडं आणि निसर्ग हा माणसाचा सर्वश्रेष्ठ असा मित्र आहे. एक वेळ आपण आपलं सर्वस्व पणाला लावून लाडाने वाढविलेली आपली मुलं मोठी झाल्यावर आम्हाला विसरतील; पण प्रेमाने लावलेली आणि निष्ठेने वाढविलेली झाडं माणसाला कधीच दगा देत नाहीत, त्याची कधी फसगत करीत नाहीत. कारण माणसांप्रमाणे त्यांच्या ठायी हेवेदावे आणि स्वार्थ असत नाहीत. जेवढं तुम्ही त्यांच्यावर प्रेम अन् भक्ती कराल, त्याच्या कितीतरी पटींनी अधिक ती तुम्हाला परतफेडीच्या रूपाने देत असतात. नारळाच्या झाडाचं ज्याला कल्पवृक्ष म्हटलेलं आहे, उदाहरण घेऊ. याचं रोप लावून व्यवस्थित निगा राखली तर ते झाड चार ते पाच वर्षांनी नारळ देऊ लागतं. अशी दोन झाडं चार-पाच माणसांच्या कुटुंबाला वर्षभर पुरतील इतके नारळ सतत ३५-४० वर्षे सहज देऊन जातात.
झाडं ही सर्व सजीवांप्रमाणेच संवेदनशील असतात, हे प्रयोगातून सिद्ध झालेलं आहे. फळं, फुलं देणार्‍या झाडांच्या बागेत संगीत खेळतं ठेवलं तर त्या झाडांची वाढ चांगली होऊन ती अधिक उत्पन्न देतात, हेही सिद्ध झालेलं आहे. आपण लावलेल्या रोपट्याची चांगली निगा राखली, दिवसातून एकदातरी जाऊन त्याला आंजारलं-गोंजारलं, त्याच्या अवतीभवती उगवणारं तृण तसंच इतर वनस्पती काढून टाकल्या तर त्याचा त्या झाडावर सकारात्मक परिणाम होतो. किडे व इतर हानिकारक जीव त्याच्यापासून दूर राहून झाडाची वाढ चांगली होते, हे अनुभवातून मी शिकलो आहे. याचा अर्थ जेवढे आपण निसर्गाच्या जवळ जाल तेवढा निसर्ग आमच्या कृतीचा अधिक साकारात्मक प्रतिसाद देत असतो. म्हणून माणसाने निसर्गाशी तादात्म्य पावणे हे मानव जातीच्या कल्याणाचंच आहे. इथं मला माशेलात दरवर्षी आषाढात साजरा होणार्‍या चिखलकाल्याचं मर्म जाणवतं. माणसाला मातीशी, धरतीशी म्हणजे पर्यायाने निसर्गाशी एकरूप होण्याची शिकवण देणारं ते प्रतीक नाही का? या जगात निर्माण होणारा प्रत्येक जीव या मातीतूनच निर्माण होत असतो. कोणत्या ना कोणत्या रूपात तो मातीवरच जगत असतो आणि शेवटी मातीलाच मिळायचा असतो, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. अर्थात निसर्ग हाच माणसाच्या उत्पत्तीचा, अस्तित्वाचा आणि मुक्तीचाही एकमेव स्रोत आहे.