मानवाचे कर्मच महत्त्वाचे

0
231
  •  डॉ. सीताकांत घाणेकर

परमधामात तर फक्त कर्म हेच चलन. सत्कर्मी लहान मुलासारखे असतात. लहान मुलाने काही चांगले काम केले; परिक्षेत जास्त गुण मिळवले; बक्षीस मिळवले तर ताठ मानेने छाती पुढे करून ते पालकांकडे व शिक्षकांकडे जातात. म्हणून मानवाने कर्मांंंकडे लक्ष द्यावे.

भारतीय संस्कृतीनुसार आपण चार युग मानतो- सत्य, त्रेता, द्वापर व कलियुग. शास्त्रकार सांगतात की सत्ययुगात लोक सज्जन होते. सत्यमार्गी होते. त्यामुळे त्यावेळी कसलेही कलह, अत्याचार नव्हते. विकार-वासनांवर सर्वांचे नियंत्रण होते. पण जसजशी वर्षे गेली – युगं बदलायला लागली तसतसे पुण्यकर्म कमी कमी व्हायला लागले. मानव अधःपतीत व्हायला लागला.

आता कलियुगात तर हे अधःपतन वाढत गेले. मानवाची नैतिकता अगदी खालच्या स्तराला पोचली. इंद्रियसुख हेच उच्च तर्‍हेचे सुख असे मानव मानायला व तसेच वागायलादेखील लागला. भौतिक प्रगती हेच सर्वस्व ठरले. आध्यात्मिकतेकडे दुर्लक्ष झाले. ‘खा- प्या- मजा करा’ हीच संस्कृती रुजली. धनाला प्राधान्य आले. मग ते धन कसेही मिळवू दे, त्यावर दुर्लक्ष झाले.

खरे म्हणजे मानव हा बुद्धिमान प्राणी आहे. पण तथाकथित ज्ञानीदेखील फक्त बुद्धिजीवी झाले. बुद्धिवादी झाले. बुद्धिनिष्ठ अल्प झाले. नैतिकतेचा, धर्मशास्त्राचा अभ्यास, मनन, चिंतन कमी झाले. मानव षड्‌रिपूंच्या अधीन झाला.
* काम- क्रोध- लोभ- मोह- मद- मत्सर आणि अहंकार आहेच. सगळे मायेचेच राज्य. त्यामुळे सर्वत्र रावण- दुर्योधनच दिसतात. स्वार्थामुळे मानव आत्मकेंद्रीत झाला आहे. त्याचे सत्कर्म कमी होऊन दुष्कर्मेच वाढत आहेत.
पुण्यात्मे कमी होऊन पापात्मेच वाढले.
धनाची आवश्यकता आहेच ती तर लक्ष्मी आहे. पण ती पवित्र हवी. तिचा विनियोगदेखील सत्कर्मासाठी करणे अपेक्षित आहे. कर्माच्या संबंधी शास्त्रकार एक सुंदर श्‍लोक सांगतात-

‘धनानि भूमौ पशवो हि गोष्ठे,
नारि गृहद्वारि सखा शमशाने |
देहश्चितायां परलोक – मार्गे,
धर्मानुगो गच्छति जीव एकः ॥

– धन भूमीचे भूमीवरच राहते (पूर्वीच्या काळात लोक धन जमिनीत गाडून ठेवीत असत)
– पशु म्हणजे जनावरे गोठ्यात राहतात.(भारतात पशु हेदेखील धनच मानले जात असे)
– भार्या म्हणजे धर्मपत्नी घराच्या दारापर्यंतच येते (ती नवर्‍यासोबत स्मशानात जात नाही)
– देह चितेपर्यंतच येतो. (एकदा अग्नी दिला की देहाची राख होते).
– परलोक मार्गात जीव (आत्मा) एकटाच जातो. त्याच्याबरोबर फक्त त्याचे कर्मच जाते. म्हणून कर्मालाच जास्त महत्त्व आहे.
हे सर्वांना माहीत आहे. अंत्यक्रियेला जाताना व परत येताना हे स्मशान वैराग्य येते. पण थोडाच वेळ. मग परत ‘ये रे माझ्या मागल्या.’
अनेक व्यक्तींना मृत्युसमयी हा कर्मसिद्धांत आठवतो. पण त्यावेळी फक्त उशीर झालेला असतो. त्यामुळे अनेकजण भयभीत होतात. जास्त करून जे पापी असतात त्यांना जास्त भीती वाटते. सज्जनांना मृत्यूची भीती वाटत नाही. कारण त्यांना त्यांची सद्गती माहीत असते.
या संदर्भात एक गीत आठवते….

‘सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना हैं
न हाथी हैं न घोडा हैं, वहॉं पैदल ही जाना हैं|’

किती बोधपूर्ण गाणं आहे हे! खरेंच, प्रभुकडे जाताना घोडा किंवा हत्ती चालत नाही. आपल्या मोठमोठ्या गाड्यादेखील चालत नाहीत. तसेच तिथे ‘करन्सी’ कुठली… तर कर्माची. रुपया- डॉलर- पेन, पाऊंड… काहीही चालत नाही.

आता कोरोनाच्या महामारीच्या काळात या सगळ्या ‘करन्सी’ ‘डी-व्हॅल्यू’ झालेल्या आहेत- प्रत्येक देशात. मग परमधामात काय उपयोगाच्या?
आणि तिथे तर फक्त कर्म हेच चलन. सत्कर्मी लहान मुलासारखे असतात. लहान मुलाने काही चांगले काम केले; परिक्षेत जास्त गुण मिळवले; बक्षीस मिळवले तर ताठ मानेने छाती पुढे करून ते पालकांकडे व शिक्षकांकडे जातात. म्हणून मानवाने कर्माकडे लक्ष द्यावे.

‘मृत्यू’ या विषयावर लक्ष केंद्रीत करण्याचे कारण म्हणजे आजची परिस्थिती – कोरोनाचे विश्‍वात राज्य. जणुकाय सर्व जग ‘कोरोनामय’ झालेले आहे.
काहीजण म्हणतात की ज्या तर्‍हेने सर्वनाश चालू आहे, ते बघितले तर आपण कलियुगाच्या अंताकडे आलो आहोत. या विनाशानंतर सत्ययुग येणार. हा कोरोना तर कलीचाच अवतार वाटतो.
काय खरें? काय खोटें? अल्पबुद्धीच्या मानवाला काय समजणार – या विश्‍वाचे रहस्य… जन्माचे गूढ? पण आशेचा किरण म्हणजे भारतीय तत्त्वज्ञान – जे अत्युच्च आहे. आध्यात्मिकतेने परिपूर्ण भरलेले आहे. विश्‍वाला मार्गदर्शक आहे.
अशा वेळी स्वामी विवेकानंदांबद्दलची घटना आठवते. – अमेरिकेला वैश्‍विक धर्मपरिषदेला जाण्याच्या आधी स्वामीजी कन्याकुमारीला शिलेवर तीन दिवस ध्यानस्थ बसले होते. तेव्हा त्यांना आपल्या मातृभूमीचे म्हणे संपूर्ण दर्शन झाले.
– पूर्वकाळचा भारत ः जेव्हा इथे सुवर्णकाळ होता. सर्व प्रकारची समृद्धी होती. लोक सुखी होते. ‘सोने की चिडिया’ म्हणजे भारत असे म्हटले जात होते. सोन्याचा धूर सगळीकडे निघत होता. सारांश – प्रजा सुखी- समाधानी- आनंदी होती.
– सध्याचा भारत – विविध समस्यांनी ग्रस्त. सर्वांनाच ठाऊक आहे. नकारात्मक गोष्टींची उजळणी नको. मनाला त्रास होतो पण सत्य परिस्थिती आहे. सत्य कटू असते पण पचवायला हवे. भविष्यकाळातला भारत – पुन्हा समृद्ध राष्ट्र.
थोडा विचार केला की वाटते की ही वेळ आता येत आहे का? भारत कृषीप्रधान देश आहे पण गावात शेती पुष्कळ कमी झाली आणि शेतकरी शहराकडे वळायला लागले. आता कोरोनासुद्धा परत आपल्या गावाकडे अगदी पळत गेले. काहीजण तर म्हणाले की शहराचा त्यांना एवढा वाईट अनुभव आला की ते परत गाव सोडून जाणार नाहीत. काळच याचे उत्तर देईल.
* आर्थिक स्थिती खालावते आहे. त्यामुळे मोठ्या उद्योगांपेक्षा लहान उद्योग भरभराटीला येण्याची शक्यता जास्त वाटते. आणि यातील अनेक उद्योग गावात आपण सुरू करू शकतो- जसे खादी ग्रामोद्योग.
* पैशांची आवक कमी असल्यामुळे अनेकांची मौजमस्ती करण्याची सवय आपोआप नियंत्रणात येईल.
* सोशियल डिस्टंसिंगमुळे गाड्यांची रहदारी कमी होत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी झाले. हवा स्वच्छ झाली.
* पर्यटक कमी झाले. नद्यांचे प्रदूषण कमी झाले.
* कुटुंब घरी राहूनच कामं करू लागले. मुलांचे शिक्षणही ऑनलाईन झाले.
* रहदारी कमी झाल्यामुळे अपघात कमी झाले.
सारांश – कोरोनामुळे अनेक चांगल्या गोष्टीसुद्धा घडताहेत. नवीन परिवर्तनाकडे वाटचाल चालू झाली आहे. भविष्यात काय घडेल हे आत्ताच काही सांगता येणार नाही.
अशावेळी योगसाधनेचा फार उपयोग होतो- सकारात्मक चिंतनासाठी. गीता तर अत्यंत उपयुक्त आहे. ज्यावेळी भीतीयुक्त विचार मनात येतात तेव्हा गीतेतील विविध श्‍लोक आशादायक वाटतात.
भक्तियोगात भगवंत अर्जुनाला सांगतात –
‘मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते |
श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥

– भगवंत म्हणतात, ‘जे माझ्या ठायी मन लावून नेहमी मुक्त (स्थिर चित्त) होऊन परम श्रद्धेने माझी उपासना करतात ते मला श्रेष्ठ योगी वाटतात.
पुढे श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करतात –
‘मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय |
निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ॥

माझ्याच ठायी मन ठेव, माझ्याच ठिकाणी बुद्धी स्थिर कर म्हणजे देहपातानंतर तू माझ्याच ठायी येऊन राहशील यात संशय नाही.
स्वतः पूर्णपुरुषोत्तम श्रीकृष्ण असे आश्‍वासन देतात मग आपला मार्ग कुठला हे सहज ठरवू शकतो.

आपल्या योगसाधकांची साधना अगदी शास्त्रशुद्ध चालू आहे. त्यामुळे त्यांना जास्त परिश्रम घेण्याची गरज नाही. कारण अनेक वर्षे आपण या मार्गावर बरोबर वाटचाल करत आहोत. ते अगदी निर्धास्त, निश्‍चिंत आहेत. त्यांचा मार्ग आणि ध्येय निश्‍चित आहे. हो ना? मग इतरांनादेखील वळवा ना- या सत्‌मार्गाकडे. पुण्य लाभेल. सद्गती मिळेल. विश्‍वकल्याण होईल.