माणसाची निर्मिती कशासाठी?

0
1603

– प्रकाश आचरेकर, वास्को
आज आपले जीवन पूर्वीप्रमाणे कष्ट करून जगावेे असे राहिलेले नसून थोड्याच श्रमांत अन्न, संरक्षण, आसरा घेणे व खूप उत्पादन घेऊन आरामात वेळ घालवणारे व तसेच अत्यंत वेगाने विकासाकडे घोडदौड करणारे आधुनिक जीवन झालेले आहे. त्यानुसार माणसाच्या खाण्यापिण्यात, राहणीमानात व विहारात मोठा बदल झालेला आहे. पण आमचे जीवन सुरू कसे झाले याची माहिती वैज्ञानिक देत आहेत. पृथ्वीचा जन्म ४५० कोटी वर्षांपूर्वी सूर्यापासून तुटलेला जळता गोळा थंड होऊन झाला. तो थंड होण्यास सव्वाशे कोटी वर्षे लागली. म्हणजे तीनशे वर्षांपूर्वी प्रथम वायरस व अल्गी व नंतर साधे बॅक्टेरिया, अमिबा निर्माण झाले. त्यानंतर पुढे दोनशे कोटी वर्षे हे प्राथमिक सजीव राज्य करीत होते. त्यानंतर साठ कोटी वर्षांपर्यंत बहुपेशीय कमी गुंतागुंतीच्या सजिवांचे वास्तव्य होऊन गेले. नंतर तीस कोटी वर्षांपर्यंत सरपटणारे प्राणी व विविध डायनॉसॉर आणि अनेक वनस्पतींचे मध्य जीव युगात साम्राज्य होऊन गेले.
त्यानंतर पाच कोटी वर्षांचे नवजीवयुग होऊन गेले. या युगात प्राथमिक स्वरुपाचे सस्तन प्राणी निर्माण झाले. त्यात बिन शेपटीचा मानव पूर्वज माकड निर्माण झाला. त्यानंतरच्या उत्क्रांतीत फक्त दीड दोन लाख वर्षांपूर्वी दोन पायांवर चालणारा आदिमानव निर्माण झाला. त्यानंतर माणसात हळूहळू सुधारणा होत गेली. मग या नरमानवाचे वास्तव्य काही हजारो वर्षांएवढेच आहे. परंतु इतिहासात नोंद असणारी मानवी संस्कृती पाच ते दहा हजार वर्षांत उदयास आली, तर तीनशे चारशे वर्षांत विज्ञानाची जोड देणारी मानवाची आगळीच संस्कृती निर्माण झाली.
गेल्या ५० ते ६० वर्षांत पृथ्वीवरील कॉंक्रीटचे जंगल झपाट्याने वाढत चालले. रस्त्यांचे जाळे, शेतींचे वने जंगलावर आक्रमण व माणसांचे खाणे पिणे एवढे बदलले आहे की ते पृथ्वीला व माणसांना हानीकारक बनले आहे. हे चालतच राहणार आहे. व १० ते १५ वर्षांत हा बदल दुप्पट होणार आहे. पृथ्वीवरील वाढणारी लोकसंख्या त्याला दुजोरा देत आहे. यामुळे नैसर्गिक जीवन घटक प्रदूषित होत चालले आहेत. आणि ते प्रदूषण झापाट्याने वाढत चालले आहे. आज माणसाची प्रगती आणि पृथ्वीवरील निसर्ग घटकांचे प्रदूषण हे एकमेकांशी संबंधित आहे. आज पृथ्वीवरील वाहने, कारखाने व घरातील उपकरणे पृथ्वीवर हवा प्रदूषित करीत आहेत. त्यामुळे श्वासोच्छ्‌वासाचे अनेक रोग बळावत चालले आहेत, त्याचबरोबर हवेतील वाढते प्रदूषण पृथ्वीवरील तापमान वाढवीत आहे. त्याचा परिणाम पृथ्वीवरील हवामान बदलात झालेला आहे. पृथ्वीवरील बर्फ वितळत आहे. समुद्राची पातळी वाढत आहे. पृथ्वीवरील ओझोनचे कवच विरळ होऊन त्यास छेद पडलेले आहे. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला जीवघेण्या किरणांना सामोरे जावे लागणार आहे. तसेच घरांची, कारखान्यांची घाण व शेतीतील किटकनाशकांची घाण नद्या व समुद्रात सोडल्याने नद्या व समुद्र प्रदूषित होत चाललेले आहेत. नंतर माणसांची कॉंक्रीटची घरे, आस्थापने, रस्ते व प्लास्टिकचा कचरा तसेच वनांवरील आक्रमणाने जमीन प्रदूषित झालेली आहे. ध्वनी व प्रकाशाचे प्रदूषण मानवाच्या व वनस्पतीच्या व प्राण्यांच्या जीवनावर परिणाम करणारे झालेले आहे.
हे सारे वैज्ञानिक दृष्टीकोनातून सत्य असले तरी विकासवादी लोक ते मानून घेत नाहीत. त्यांचे म्हणणे पृथ्वी, निसर्ग हे सर्व माणसांसाठीच आहे. त्यांचे असेही मत आहे की माणसाच्या विकासामुळे प्रदूषण झालेले नाही. आणि जे क्षुल्लक झालेले आहे, ते निसर्ग भरून देणार आहे, म्हणून घाबरण्याचे काहीच कारण नसल्याचे ते मानतात.
आज आपण केलेले प्रदूषण म्हणताना माणसांच्या उलाढालींवर नजर पडते. आपण सहज म्हणत असतो की ‘ज्याने कचरा केला, त्याने तो साफ केला पाहिजे.’ म्हणजे माणसाने पृथ्वीवर केलेल्या कचर्‍याची साफसफाई करण्याचे काम त्याचेच आहे आणि त्याचीच जबाबदारी आहे.
आणखी एक आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे पृथ्वीवर निसर्गानेही प्रदूषण केलेले आहे. वर सांगितल्याप्रमाणे पृथ्वीवर जीवन सुरू होऊन ५०० कोटी वर्षे झाली. त्यांच्या शरीरातील घाण, मळ व शरीरे पृथ्वीवर पडून राहिल्याने त्याचे रूपांतर पेट्रोल व कोळशात झाले. हे वाढत चाललेले जळण पदार्थ पृथ्वीवरील जीवनाला धोकादायक झालेले होते आणि त्याची साफसफाई व्हायलाच हवी होती.
आता प्रश्‍न पडतो, पृथ्वीवर प्राण्यांची उत्क्रांती झाली व शेवटी माणूस जन्माला आला. आता ती उत्क्रांती थांबलेली आहे. आज माणसांचे विचार विस्तारत चाललेले आहेत. न सुटणार्‍या गूढ गोष्टींमुळे व समजुतींमुळे धर्माची निर्मिती झाली. त्यातून अनेक प्रश्‍न तयार झाले. त्यातील हा एक प्रश्‍न जग हे माणसासाठी निर्माण केले आहे ते खरे नव्हे काय? दुसरा प्रश्‍न माणसासाठी योजनापूर्वक जग निर्मिण्याची गरज का वाटली? तिसरा प्रश्‍न माणसाला कशासाठी व कोणत्या हेतूने निर्मिले गेले?
आपणाला माहीत आहे की जगात कुठलीही गोष्ट कारणाशिवाय तयार होत नाही. तेव्हा आज पृथ्वीवर अणुबॉम्ब, अण्वस्त्रे व मोठमोठी युद्धसामुग्री तयार का व कशी तयार झाली? तसेच माणसाच्या प्रगतीच्या खुळातून अनियंत्रित वेगाने झपाटल्यासारखे पसरणारे प्रदूषण पाहिल्यास एक दिवस ते माणसाला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही हे निश्‍चित.
तेव्हा विचार करा, या पृथ्वीची शाश्‍वती काय आहे? कोटी वर्षे, की लाखो वर्षे, की हजारो वर्षे की शेकडो वर्षे? सर्व बाजूंनी विचार केल्यास शेकडो वर्षे सुद्धा हे रहाटगाडगे चालेल की नाही याची शंका वाटते. आता परत प्रश्‍न पडतो ईश्‍वराने माणसाला निर्माण का केले? त्याला कारण काय?