माझ्या बाबांचे लपलेले प्रेम!

0
1128

कृतिका दीपक मांद्रेकर, सेंट झेवियर कॉलेज, म्हापसा
स्वतःची स्वप्ने विसरून, आपल्या मुलांची स्वप्ने आपले मानून जगणारे ते भोळे वडील..! आपली प्रत्येक लहान-थोर गरज मागे टाकून आपल्या मुलांसाठी धडपडणारे ते निःस्वार्थी वडील..! अशा या वडिलांच्या जराशा कठोर स्वभावामागे लपलेले त्यांचे ते अथांग प्रेम, ते मायेने भरलेले हृदय, वात्सल्याचे तेज असलेले त्यांचे ते डोळे कधी कुणाच्या नजरी पडलेच नाही.दिवस-रात्र एक करून आपल्या मेहनतीचा घाम गाळून एक वडील मोठ्या उत्साहाने आपल्या परिवारासाठी छान घरकुल उभारतो. जीवनाच्या प्रत्येक वळणावर ढाल बनून ते आपल्या परिवाराचा बचाव करतात. येणार्‍या प्रत्येक संकटांना ते एकट्याने सामोरे जातात, इतरांना धीर देताना स्वतःच्या सर्व वेदना, अश्रू मात्र लपवून ठेवतात. सतत आपल्या मुलांवर आनंदाचा वर्षाव करण्याचा त्यांचा प्रयत्न चालूच असतो. स्वतः एके काळी जे दुःखाचे दिवस पाहिले तशी आपल्या मुलांवर कधीच पाळी येऊ नये म्हणून ते आरोग्याचा विचार न करता काम करत असतात. बघायला एकदम कठोर असणारे ते वडील मनाने तेवढेच कोमल असतात. ते आपल्या मनातील भावना जास्त कधी व्यक्त करत नाही. पण मनात मात्र सतत म्हणतात, ‘बाळा तुला मिळाले ना, मग माझे पोट भरले.’ या त्यांच्या भावना त्यांच्या प्रत्येक कृतीत झळकून दिसतात. पण दुर्भाग्याने काही केल्यास आपणाला ते मात्र दिसतच नाही. आपण विसरतो की लहान असताना जेव्हा आपण आजारी असायचो तेव्हा आपल्या आईचे डोळे अश्रूने भरायचे पण तिला धीर देणारे आपले वडीलच असायचे. स्वतःचा एकही वाढदिवस न मनवणारे ते वडील आपल्या मुलांचा प्रत्येक वाढदिवस मात्र मोठ्या थाटामाटात साजरा करतात; आणि तीच मुले मोठी होऊन ‘तुम्ही माझ्यासाठी कधी काही केलेच नाही’ असे म्हणून बेईमान बनतात. आपल्या बाळाच्या चेहर्‍यावर हास्य पाहायला वडील घोडा-घोडा सुद्धा खेळतात व तेच बाळ पुढे जाऊन आपल्या मित्रांसमोर आपल्या वडिलांची सहज टिंगल उडवतो. फक्त आपल्या मुलांसाठी जगणार्‍या त्या वडिलांच्या काही इच्छा, आकांक्षा असणार हे आपण मुले विसरूनच जातो. मुलांचे भविष्य घडविण्यासाठी आपल्या स्वप्नांचा त्याग करणार्‍या वडिलांचा विचार कधी आपण करतच नाही. पूर्ण जीवन आपल्या परिवारासाठी झटत असतात. घराचा पूर्ण भार त्यांच्या खांद्यावर असतो. एकदा सुद्धा तक्रार न करता ते आपले मोठ्या प्रेमाने निभावतात. अशा या वडिलांना सुखी ठेवणे, त्यांच्या आत्मसन्मानाची काळजी घेणे, त्यांची अपुरी स्वप्ने पूर्ण करणे हे आम्हा मुलांचे कर्तव्य आहे. ज्या वडिलांनी सतत आपल्या मुलांच्या इच्छेचा विचार केला त्या वडिलांच्या इच्छेनुसार आपण जर वागलो तर त्यांच्या चेहर्‍यावर एक समाधानी गोड हास्य पाहायला मिळणार व त्याने आपल्यालाच मोठे पुण्य लाभेल.
मित्र हो!! वडील जरासे ओरडतात, चिडतात म्हणून ते मनाला लावून घ्यायचे नाही. उलट त्यामागे लपलेली त्यांची ती माया, काळजी समजून घ्यायची. त्यांचा आदर केला पाहिजे. त्यांच्या भावना जपल्या पाहिजे. त्यांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. जीव ओतून प्रेम करणार्‍या त्या वडिलांना आपण मुलांनी समजून घेणे खूप गरजेचे आहे.
चला तर आज आत्तापासून सुरुवात करूया त्या वडिलांचे प्रेमाने, मायेने भरलेले, लपलेले व्यक्तित्व शोधायला व त्यांचा मान राखायला…