माझी अर्धश्रद्धा?

0
172

– सौ. मीरा निशीथ प्रभुवेर्लेकर

… त्यांनी स्वानुभवावर आधारित लिहिलेल्या अनेक गोष्टी, त्यावरून उद्भवलेले प्रश्न, एखाद्या वकिलाप्रमाणे मांडलेली तर्कशुद्ध कारणमिमांसा हे सगळं वाचून निरीश्वरवादी विचारांचा पक्का पगडा बसला नसला तरी त्या विचारप्रवाहाच्या दिशेने माझे विचार वळू लागले. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्‍न आणि त्यावरची प्रामाण्यवादी उत्तरं मनाला खरोखरच पटण्यासारखी होती. 

वर्षानुवर्षें देवकृत्यांचा ससेमिरा चालणार्‍या सश्रद्ध घरांत मी जन्मले आणि वाढले. या घरांत देवाची नित्यनेमाने रोज शोडषोपचार पूजा (अन्नाच्या नैवेद्यासह), व्रतवैकल्ये यांमध्ये चार पिढ्यांपर्यंत कधी खंड पडला नाही. घरामध्ये स्वतंत्र ऐसपैस देवघर. त्याच्या मधल्या भिंतीमध्ये पंचकोनी आकारातला शुभ्र फरशीने आच्छादलेला गाभारा. त्यामध्ये भला मोठा लाकडी नक्षीदार कोरीव देव्हारा आणि रंगीबेरंगी फुलांनी रथाप्रमाणे सजलेल्या त्या देव्हार्‍यांत विराजमान झालेला चांदीचा श्री मांगिरीश. या कुलदेवाच्या सोबतीस गणपती, लक्ष्मी, सरस्वती, दत्तात्रेय, श्रीकृष्ण, विठ्ठल-रखुमाई, शांतादुर्गा, विष्णू हे तमाम देव-देवता, त्यांना त्यांना दिलेल्या जागी स्थानापन्न झालेल्या! तुलशी, बेलपत्र, निरनिराळी सुगंधी फुलं, धूप, उदबत्ती, चंदन, गंध, अंगारा यांच्या मिश्र सुगंधी वातावरणातलं ते आमचं पवित्र प्रसन्न असं देवघर. घरात सर्व धार्मिक सणांची रेलचेल. तीही शास्त्रशुद्ध पद्धतीने! गुढीपाडवा, होळी, श्रावणी सोमवार, नागपंचमी, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमेची श्रावणी, आषाढी-कार्तिकी एकादशी, चतुर्थी, दिवाळी, पाडवा, तुळशीविवाह, दत्तजयंती, शिवाय वर्षाची पाच देवकार्ये, पितरांची वर्षश्राद्ध… सारं ब्राह्मण-सवाष्णीच्या साक्षीने शास्त्रोक्तरीत्या पार पाडणारं आणि त्याचबरोबर समाजसेवा हीच ईश्‍वरसेवा मानून ते कृतीत आणणारं माझं माहेरघर!!
अशा या देवमय वातावरणाच्या भक्तिरसात लहानाची मोठी झालेली मी आज देवभक्तीपासून कोरडीच कशी आहे? – हा प्रश्न माझ्या सग्यासोयर्‍यांना जसा पडतो तसा तो मलाही पडतो. कौमार्यावस्थेत देवाच्या अस्तित्वाविषयी मनांत कधी विचारच यायचे नाहीत. आजोबा सांगत, देवाला कधीही विसरू नका. वडीलधार्‍यांनी घालून दिलेल्या दिनक्रमानुसार सकाळी उठल्यावर देवघरात जाऊन देवाला नमस्कार करणं, तिन्ही सांजेला परवचा म्हणणं, तुळशीसमोर दिवा लावणं, देवासाठी फुलं ओवणं इ. आम्ही करत असू.
मला वाटतं महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर मासिकं, पुस्तकांमधून देवाच्या असल्या-नसल्याबद्दल अनेक तत्त्ववाद्यांचे लेख वाचनात आले. डॉ. जयंत नारळीकर, डॉ. श्रीराम लागू, डॉ. नरेंद्र दाभोळकर, श्याम मानव अशा अनेक निरीश्वरवाद्यांची तात्त्विक मते वाचली. ही त्यांची मते वाचण्यापूर्वी ‘देव आहे, तो सर्वांचं भलं करतो’, ही भावना मनात होतीच. पण समाजात घडणार्‍या अघटित घटना, अकल्पित प्रसंग वगैरे वगैरे पाहून ‘देव सर्वांचं चांगलंच करतो’ या समजाला घाला बसू लागला. त्याच वेळी श्री. शरद बेडेकरांचं वाचलेलं ‘ईश्‍वरविरहित जीवन’ हे पुस्तक वाचलं नि माझं विचारपरिवर्तन होण्यास कारणीभूत ठरलं. त्यांनी स्वानुभवावर आधारित लिहिलेल्या अनेक गोष्टी, त्यावरून उद्भवलेले प्रश्न, एखाद्या वकिलाप्रमाणे मांडलेली तर्कशुद्ध कारणमिमांसा हे सगळं वाचून निरीश्वरवादी विचारांचा पक्का पगडा बसला नसला तरी त्या विचारप्रवाहाच्या दिशेने माझे विचार वळू लागले. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्‍न आणि त्यावरची प्रामाण्यवादी उत्तरं मनाला खरोखरच पटण्यासारखी होती.
देव देव करणारे भले भले लोक काही खुळे नसतात. तेही विचारवंत असतात. परंतु ‘परंपरा कां मोडा’ असा एक त्यांचा बाणा असतो. ती सोडायला ते धजत नाहीत. दुसरं, आपल्या कुटुंबियांच्या कल्याणासाठीच स्वतःला देवाधीन करणार्‍यांचं मन इतकं भित्र असतं की ते दुबळेपणामुळे मानसिक आधार शोधत असतात. यातूनच देव हा भक्कम आधार त्यांना मिळतो. अशावेळी सत्यासत्यतेचा कस पाडून वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोणी विचार करत नाही. त्यांची विवेकबुद्धीच नष्ट होते. अतिश्रद्धेपोटी अंधश्रद्धा जन्म घेते. गणपतीच्या सोंडेमधून दूध शोषले जाण्यामागे काहीतरी शास्त्रीय कारण असू शकेल, असा विचारही जिथे सुशिक्षितांना शिवला नाही तिथे अडाण्यांची काय कथा? देवताना ओटी, भेटी अर्पण करताना त्यांना चांगलंच ठाऊक असतं की यांपैकी कोणतीही वस्तू देव त्या मूर्तीतून बाहेर येऊन वापरणार नाही. तरीही ते अंधश्रद्धपणे देवाच्या पायावर वाहिलं जातं. कां? तर आपण दान करतो याचं एक विलक्षण समाधान त्यांना मिळतं. आपल्या देवभक्तीच्या प्रदर्शनामुळे मान मिळेल किंवा देवाला भेटरूपी लाच दिल्याने त्याची आपल्यावर नक्कीच कृपादृष्टी राहील. ‘आपण संकटमुक्त होऊ’ असा एक वेडा विश्वास हे अंधश्रद्धाळू बाळगतात. या सर्वांच्या भावनेत जर तथ्य असेल तर त्यांच्यावर कठीण प्रसंग, संकटं वगैरे येता कामा नये. परंतु वास्तवात देवाला कितीही लाच दिली तरी संसारात संकटं यायची ती येतातच. अशा वेळी देव भक्तांना का नाही पावत? तो त्यांचा विश्‍वासघात करतो? देवाच्या भेटीला जाताना किंवा परततांना कितीतरी भक्तांना अपघातात मृत्यू आलेला आहे. त्या बिचार्‍यांना मृत्युमुखी पाडणार्‍या देवाच्या अस्तित्वाबद्दल मग शंका आल्यावाचून राहत नाही. अशा वेळी श्रद्धाळूंचं उत्तर तयारच असतं. त्याला देव काय करणार? त्यांचं दैव बलवत्तर असतं तर असं घडलंच नसतं. आणि जेव्हा कोसळलेल्या इमारतीच्या ढिगार्‍याखाली पंधरा-वीस दिवस गाडली गेलेली व्यक्ती जिवंत राहते किंवा चार चाकीच्या खाली सापडलेलं मूल कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे वाचतं, तेव्हा ‘देव तारी त्याला कोण मारी?’ असं म्हणत त्यांच्या वाचण्याचं श्रेय मात्र देवाला दिलं जातं. मग अशावेळी याला तारणारा हा देव त्या अपघातग्रस्तांना का नाही तारत?(भक्तांमध्ये तो पार्शियालिटी करतो कां?) की दैवापुढे देवाचं काही चालत नाही असं मानावं कां? असं असेल तर श्रद्धेने आंधळे झालेल्या श्रद्धावानांना आपण देवाची मर्जी मिळवण्यासाठी करतो ती कर्मकांडं, नवस, उपवास हे सारं खरं तर देवाला अनपेक्षित आहे तर केलेलं सारं व्यर्थच आहे, हे का नाही उमगत?
किशोर किंवा पौगंड वयात या बाबतीत बुद्धीला कधी ताण दिलाच नाही. घरांत जाणत्यांनी करा.. म्हटलं, केलं. म्हणा.. म्हटलं, म्हटलं. ते संस्कार इतके झिरपले आहेत की इतक्या वर्षांनंतरही ठराविक त्या गोष्टी प्रतिक्षिप्त क्रियेने आपोआप केल्या जातात. देवळासमोर पोचलो की वाहनात बसलेलो असलो तरी आपोआप केल्या जातात. देवळासमोर पोचलो की वाहनात बसलेलो असलो तरी आपोआप हात जोडले जातात. स्नानानंतर देवाला तेल-वात लावली जाते. तिन्ही सांजेला तुळशीला दिवा लावला जातो. शुभंकरोति म्हटलं जातं. कठीण समयी ‘देवा पाव रे बाबा’ अशी ओठावर बसलेली आळवणीही बाहेर पडते. नातवंडांना देवबाप्पा दाखवतो, ‘पाऽव पाऽव’ करायला शिकवतो. बस्स एवढंच! बाकी देवळात जाऊन ओटी करणं, नवस करणं किंवा इतर कर्मकांडं विचाराच्या कक्षेबाहेरच!
बुद्धिवाद्यांचं एक बरं असतं. ते आपल्या मताशी, विचारांशी, तत्वाशी प्रामाणिक, ठाम आणि एकनिष्ठ असतात. ते कधीही देवासमोर हात जोडणार नाहीत, मंदिराची पायरीही चढणार नाहीत आणि देवाला शरणही जाणार नाहीत. अन् आम्ही पडलो अधांतरी- ना आस्तिक – ना नास्तिक! ना अध्यात – ना मध्यात! ठामपणाचा घोडा अडतो तो इथं. मन प्रत्येक बाबतीत वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करतं. परंतु मनाचा आणि कृतीचा ना बसतो ताळ आणि विवेक नि संस्कारांचा ना बसतो मेळ! मग माझा मलाच प्रश्न पडतो- मी श्रद्ध? अश्रद्ध?? की अर्धश्रद्ध???