माझं घर

0
699

– संदीप मणेरीकर

किती सुंदर असते आपुले घर
प्रत्येकाचे असते गोकुळ जणू
किती रंग सांगावे या घराचे मी
जितके क्षितिजावरती पहाटे येती

असं हे आपलं घर प्रत्येकालाच बहुत प्रिय असतं. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या घराचा ओढा असतो. माहेरवाशीण असो किंवा दूर नोकरीसाठी गेलेला मुलगा, त्याला आपलं खर हे घरट्यासारखं असतं. संध्याकाळ झाली की पक्षी जसे आपोआप घराकडे वळतात, तसंच काहीसं या व्यक्तींचही होत असतं. माहेरवाशीणींचं तर मन सतत माहेराकडेच ओढ घेत असतं. पण त्यांना आणखी एक घर मिळतं. आणि त्यात त्या आपल्या सगळ्या भावना ओतत असतात. घर पहावं बांधून आणि लग्न पहावं करून असं म्हटलं जातं. त्याचं कारण घर म्हणजे केवळ चार भिंती नसतात. केवळ चार माणसं नसतात. केवळ संसार नसतो नवरा बायकोचा आणि केवळ खेळ नसतो मुलाबाळांचा. घर म्हणजे एक वस्तू नसते, तर वास्तू असते. घर ही संकल्पनाच वेगळी आहे. घर निर्जीव भिंतीतून साकारलेलं सजीव वास्तव असतं.
माझं घर घोटगेवाडी-मोर्लेबाग इथे आहे. घराच्या चारही बाजूंनी निसर्ग चवर्‍या ढाळत आहे. पूर्वी आम्ही एकत्र रहायचो तेव्हा आमचं मूळ घर घोटगेवाडी इथं होतं. त्यानंतर मोर्लेबाग इथे आम्ही गेलो. त्यानंतर तिथून पुन्हा दादांनी (माझ्या बाबांनी) नवं घर बांधलं. त्या घरात माझा जन्म झाला. माझे आजोबा, आजी, दादा, आई, आम्ही तीन भावंडं अशी सात जण त्या घरात रहात होतो. आजोबांना सगळेचजण बाबा म्हणत असल्यामुळे आम्हीही त्यांची नातरं त्यांना बाबाच म्हणत होतो. त्यांची एक खोली होती. त्या खोलीला बाबांची खोली असं म्हणत. बाहेरची ओसरी, त्यानंतर माजघर, माजघराच्यावर माडी, तिथेच आत स्वयंपाकघर, त्यानंतर वाईनघर, मागची खोली व पडवी अशी घराची साधारण रचना आहे. घराच्या वर मांगर किंवा गोठा. घराच्या मागे पाण्याचा पाट, त्याखाली बागायती.
निसर्गाने नेहमीच कोकणावर भरभरून प्रेम केलं, त्यामुळे दोन्ही हातांनी त्यानं दिलेलं हे दान माझ्या गावात भरभरून वहात आहे. चारी बाजूंनी डोंगर, झाडं, लहरणारा वारा, डोलणारे माड, खळाळते ओहोळ आणि बारमाही पाणी देणारी नदी. समृद्धीची व्याख्या पहायची असेल तर अशा गावात जावं. आम्ही शहरात येऊन समृद्धीला खरंच मुकलो असं वाटू लागतं.
ओसरीचं हॉलात रूपांतर झालं आणि हाल झाले. स्वयंपाकघराचं किचन झालं. बेडरूम आलं आणि बाकीच्या खोल्या गायब झाल्या. कारण इथं सामान्य माणसांचं बजेट संपतं. आमच्या घरात वाईनघर होतं. बहुतेक जुन्या घरात अशी आणखी छोटी छोटी घरं असतात. जसं स्वयंपाकघर, तसंच हे वाईन घर. या वाईन घरात एक वाईन असायचं. (आज वाईनचा अर्थ वेगळाच आहे) त्या वाईनात कांडण व्हायंच. वाईन हे बहुतेक दगडाचं असायचं. भात कांडण्यासाठी याचा फार मोठा उपयोग होत होता. वाईनात भाताचे गोटे घालायचे व चार बाजूंनी चार जणांनी विशेष करून बायकांनी चार मुसळं हातात घेऊन एकानंतर दुसरीने असं क्रमाने त्या वाईनात जोराने घालायची. त्या वाईनात भात घातलेलं असायचं. वाईनाबाहेर आलेलं भात पायाने परत आत ढकलायचं आणि हे करत असताना मुसळापासून पाय वाचवायचीही करामत करायची लागायची. किती कसबी काम होतं. आणि तेही जोखमीचं. पण महिला त्या करायच्या. एक विशिष्ट प्रकारचा त्यात ताल असायचा. एक जजमेंट, टायमिंग असायचं. अचूक टायमिंगच्या आधारे भात कांडणे व्हायचं. एखादीला जरी विलंब झाला तरी घात होण्याची शक्यता असायची. एकाच उंचीवर चारही मुसळं जाणं व एकाच वेगानं ती खाली-वर होणं याच वेगाचं किती अचूक गणित बांधलेलं असेल याची कल्पना केली तरी घड्याळाची अचुकताही मागे पडेल असं लक्षात येतं.
आता आमच्या घरात सध्या ते वाईन नाही. त्यात कोणाचा तरी पाय सापडून मुरगळून जायची भीती होती त्यामुळे ते काढून ठेवलं आहे. पण त्याचबरोबर आज ते काम करणार्‍या बायका, महिला मिळत नाहीत. त्यामुळे घरात भात कांडणे हा प्रकारच नाहीसा झालेला आहे. आज शेतीही जवळ जवळ बंद झालेली आहे. युवकांची ओढ नोकरीकडे वाढत चाललेली आहे. नोकरीसाठी शिक्षण ही परंपरा निर्माण होत आहे.
घरासमोर मस्तपैकी शेणानं सारवलेलं अंगण, उन्हाळ्यात अंगणात घातलेला मंडप, किती सुंदर रूप दिसतं. मंडपात झोपाळा झुलतोय. आपणही लहान मुलं होऊन त्या झोपाळ्यावर झोके घेत असतो तेव्हा खरं तर लहान मुलांचा हेवा वाटतो आणि कधीच मोठं होऊ नये असं वाटून जातं. मी दहावीनंतर घरात फारसा जरी राहिलो नाही तरी घराची ओढ कधीच कमी झाली नाही; आजही ती तशीच आहे. माझ्या एक लक्षात आलं की, घरची आठवण आली की माहेरवाशीणीसारखी आपल्याही मनाची तगमग होत असते. मन कासावीस होतं. ती आठवण नेमकी कसली असते हे मात्र सांगता येत नाही, आई-वडिलांची, घरातील भावा-बहिणीची लहानपाणाची की आपल्या घराची? अनुत्तरीत प्रश्‍न आहे हा. निदान माझ्या बाबतीत तरी आहे. आणि मग अशी घरची आठवण येऊ लागली की मला आठवते ती –
‘घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
माहेरीच्या सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग, आईच्या कानात
आई भाऊसाठी परी मन खंतावतं’
पुढे ही सुंदर कविता आहे. कोणाची आहे मला नक्की माहीत नाही परंतु तिचे कवी वा. रा. कांत हे असावेत असं मला वाटतं. सहावी-सातवीत असताना आम्हांला ही कविता होती. त्यावेळी तिच्यामागील अर्थ आणि भावनाही कळत नव्हती. त्यानंतर काही दिवसांनी अर्थ कळला आणि आता त्या काव्याचा अनुभव घेतोय.
आज माझ्या घरात नाही पण कौलांची जागा स्लॅबनं घेतलेली आहेत. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. घर शाकारण्यासाठी माणसं मिळत नाहीत, लाकूड सामान महाग झालेलं आहे, वरती पाहिजे तर मजले चढवता येतात अशी अनेक कारणं यामागे आहेत. पण काहीही कारणं असली तरी बदल होत आहेत. शेणाच्या जमिनींची जागा टाइल्सनं घेतलेली आहे. शेण काढण्यासाठी माणसं नाहीत, गोठा नाही, गुरं नाहीत, त्यामुळे मग टाइल्स बर्‍या फक्त पुसत राहिल्या व स्वच्छ ठेवल्या की झालं. परत परत शेण सारवत बसायला नको असा यामागे पोक्त व दूरदृष्टीचा विचार आहे. शहरीकरणाचं आक्रमण ग्रामीण भागातही पोहोचत आहे. त्यामुळे शहरी संस्कृती इथेही येऊ लागलेली आहे.
अंगणाच्या बाजूने भरगच्च फुलझाडं स्वच्छंदी वातावरणात वाढत होती. आज त्याच झाडांची कलम करून बोन्साय करण्यात आलेली आहेत. त्यांना कुंड्यात बंदिस्त करण्यात आलेलं आहे. पूर्वीची समृद्धी आज लोप पावत चाललेली आहे. आमच्या घराचा दरवाजा दिवसा उजेडी बंद नसतो. तसं पाहिलं तर ग्रामीण भागात घराचं दार कधीच बंद आढळत नाही. अगदीच नाईलाज झाला तर कडी घालून बंद केलं जातं. पण बहुतेक दरवाजा उघडाच असतो. माझ्या घराचा दरवाजाही नेहमी उघडाच असतो. दरवाजा नेहमी उघडा असल्यामुळे मनाचं दारही उघडंच असतं. त्यामुळे ग्रामीण भागात बहुतेक कोत्या मनाची माणसं मिळत नाहीत. सगळीच दिलखुलास व्यक्तिमत्व असतात. घराचे दरवाजे उघडे असल्यामुळे त्यामुळे गावात कोणीही कुठेही आला, काहीही घडलं तरी ती बातमी आपसूकच दारापर्यंत पोहोचत होती. पण आज आम्ही फ्लॅटमध्ये रहात असल्यामुळे आम्हांला फ्लॅटचे दरवाजे कधी उघडे दिसत नाहीत. आसपासचं सोडाच पण समोरच्या घरात कोणीही कितीही गोंधळ घातला तरी आम्हांला त्याचा पत्ता नसतो. आत शिरल्याबरोबर आधी फ्लॅटचे दरवाजे बंद केले जातात त्यामुळे आपोआपाच मनाचे दरवाजेही बंद होत जातात. समोरच्या फ्लॅटमध्ये कोण रहातो हेही आपल्याला माहित नसतं. तो सकाळी उठून निघून जातो; आपणही निघून जातो. त्यामुळे केवळ दोन्ही कुलपं एकमेकांना ओळखत असावीत. महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला असं आवाहन केलं होतं. आज ते आपोआपच घडत आहे, खेडीही शहरीकरणाकडे वळत आहेत. विकास हवा आहे; परंतु तो बाह्यविकासासोबतच अंतर्विकासासोबत. परंतु तेच होत नाही. माणसं जेवढी जवळ येत जातील तेवढी त्यांची मन दूर दूर जात राहतील अशी भीती वाटू लागलेली आहे. जग जवळ येतं. परंतु जगातील चांगल्या गोष्टी मात्र दूर ठेवतं. नको असलेल्या गोष्टी सोबत घेऊन येतं आणि मग संवेदनशील मनं मुर्दाड बनत जातात. घर हा त्यातीलच एक प्रकार बनत चाललेला आहे. घराची जागा बंगल्यांनी घेतली वा फ्लॅटनी घेतली तरी घराची शोभा, घराची शान, घराचा डौल आणि घराची ओढ त्यात कुठेच नसते. दिसते ती फक्त एक यांत्रिकता. माणसाचं मन पिळून पिळून काढणारी!
………..