माजी लोकसभा सभापती सोमनाथ चटर्जींचे निधन

0
122

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, माजी लोकसभा सभापती सोमनाथ चटर्जी यांचे काल सकाळी इस्पितळात उपचारांदरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८९ वर्षे होते. गेले काही दिवस मूत्रपिंडाच्या विकाराने चटर्जी आजारी होते. प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना दि. १० रोजी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र काल त्यांची प्रकृती खालावली व त्यांची तेथेच प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्‍चात पत्नी व दोन कन्या आहेत.

चटर्जी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी, भाजपाध्यक्ष अमित शहा, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आदींनी तीव्र दु:ख व्यक्त केले.

इस्पितळात चटर्जी यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गेल्या जून महिन्यात त्यांना पक्षाघाताचा झटका आल्यानंतर एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. चटर्जी यांची भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये गणना होते. १४व्या लोकसभेत ते प. बंगालमधील बोलपूर मतदारसंघातून निवडून आले होते.
प. बंगालमध्ये अलीकडेच झालेल्या पंचायत निवडणुकांवरून राज्य निवडणूक आयोगावर चटर्जी यांनी कठोर टीका केली होती. आपल्या दीर्घ राजकीय कारकीर्दित प. बंगालच्या कोणत्याही निवडणुकीत आपण या निवडणुकीएवढा हिंसाचार कधीच पाहिला नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

दहा वेळा लोकसभेवर निवडून आलेल्या सोमनाथ चटर्जी यांना १९९६ साली उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने गौरविण्यात आले होते. २००४ ते २००९ या काळात लोकसभेचे सभापती म्हणून त्यांनी कामगिरी बजावली. मात्र २००८ साली पक्षादेश न जुमानल्याच्या कारणावरून भाकपने त्यांना पक्षातून काढून टाकले होते.