मांस प्रकल्पाच्या डॉक्टरला लाच घेताना रंगेहात पकडल

0
101

उसगाव येथील गोवा मांस प्रकल्पात नव्यानेच सुरू केलेल्या रेडरींग प्लांटचे व्यवस्थापक मंदार तांबे यांच्याकडून ५ हजारांची लाच घेताना पशुचिकित्सक डॉ. रामदास नाईक यांना काल संध्याकाळी रंगेहाथ पकडले. रात्री उशिरापर्यंत दक्षता विभागाचे उपअधीक्षक बॉसेट सिल्वा या प्रकरणी चौकशी करीत होते.

गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून मंदार तांबे यांच्याकडून दरमहा ५ हजार रुपये लाच डॉ. नाईक घेत होते. सदर रेडरींग प्रकल्पात टाकाऊ मांसावर प्रक्रिया करून कोंबड्या व कुत्र्यांसाठी खाद्य पदार्थ तयार करण्यात येतात. मात्र, लाच न दिल्यास स्थानिक लोकांच्या मदतीने प्रकल्प बंद पाडण्याची धमकी वरील डॉक्टर देत होता. गेल्या काही दिवसांपासून सदर रक्कमेत वाढ करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे तांबे यांनी दक्षता विभागाकडे तक्रार केली होती. काल संध्याकाळी २ हजार रुपयांच्या दोन तर ५०० च्या दोन नोटा दिल्यानंतर सदर रक्कम वाहनातून घेऊन जात असताना डॉ. रामदास नाईक यांना दक्षता विभागाने पकडले. त्यावेळी सदर नोटा त्यांच्याकडे सापडल्या. उपअधीक्षक बॉसेट सिल्वा व सहकारी रात्री उशिरा पर्यंत चौकशी करीत होते.