मांड संस्कृती संवर्धनासाठी योजना

0
123

कला व संस्कृती खात्याकडून पारंपरिक मांड संस्कृतीच्या संवर्धनासाठी गोवा मांड संस्कृती योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेखाली मांडांवरील लोककलांचे प्रशिक्षण घेण्यासाठी संस्थांना चार लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यात २५ संस्थांना अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

राज्यातील पारंपरिक जागोर, रणमाले व इतर लोककला प्रकार लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. मांडांवरील पारंपरिक कला प्रकारांचे युवा पिढीला या योजनेच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे. या योजनेखाली प्रशिक्षण देणार्‍या मांड गुरूला मासिक ९ हजार रुपये मानधन, सहाय्यकाला मासिक ६ हजार रुपये आणि शिक्षण घेणार्‍यांना महिना १५०० रुपये मानधन दिले जाणार आहे. एका गटामध्ये कमीत कमी ३० कलाकार, प्रशिक्षणार्थीचा समावेश असणे आवश्यक आहे, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.

लोककला प्रकाराची वाद्ये खरेदीसाठी ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच मांडाची जागा व वाद्यांची योग्य निगा राखण्यासाठी ४० हजार रुपये साहाय्य दिले जाणार आहे. लोककलेच्या वेशभूषा साहित्य खरेदीसाठी ६० हजार रुपये दिले जाणार आहेत. तसेच मांडाच्या जागेची नियमितपणे देखभाल करण्यासाठी २५ हजार रुपये रक्कम दिली जाणार आहे. मागील ३० वर्षे पारंपरिक लोककला प्रकार सादर करणार्‍या संस्थांना या योजनेचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. तसेच गावातील ज्येष्ठ कलाकारांचे गरज भासल्यास साहाय्य घेतले जाणार आहे. एप्रिल २०१८ पासून या योजनेचे अर्ज उपलब्ध केले जाणार आहेत, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.

ही योजना मार्गी लावण्यासाठी खास समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीकडून वर्षभरानंतर योजनेचा आढावा घेतला जाणार आहे. प्रशिक्षणार्थीकडून सादरीकरण करून घेतले जाणार आहे. पारंपरिक कला परराज्यात सादर करण्याची संधी गटांना दिली जाणार आहे. तालुका व जिल्हा पातळीवर कला सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. या योजनेचा कुणीही गैरफायदा घेऊ नये याकडे लक्ष दिला जाणार आहे, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.