महिला बॉक्सिंगपटूंची पदके निश्‍चित

0
113

भारताच्या पाच महिला बॉक्सिंगपटूंनी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अनामिका (५१ किलो) व आस्था पाहवा (७५ किलो) यांनी आपली पदके पक्की करताना अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समध्ये होणार्‍या युथ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्याच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारली आहे. ६ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत सदर स्पर्धा होणार आहे. महिलांमध्ये ५१ किलो, ५७ किलो, ७५ किलो व ६० किलो वजनी गटातील आघाडीचे चार खेळाडू प्रतिष्ठेच्या युथ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. अनामिकाने मंगोलियाच्या मुगुनसारन बालसान हिला नमविले तर आस्थाने चीनच्या झियुए वांग हिला पराजित केले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती साक्षी चौधरी (५७ किलो) व जोनी (६० किलो) यांना मात्र धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. साक्षीला थायलंडच्या पानपातचारा सोमनुएकने तर जोनीला कझाकस्तानच्या मारिया ग्लादकोवाने ३-२ अशा फरकाने हरविले. अन्य वजनी गटांत ललिता (६९ किलो) हिने व्हिएतनामच्या थी गियांग ट्रान हिला अस्मान दाखवले तर दिव्या कुमार (५४ किलो) हिने चीनच्या झेकिंग काव हिला एकतर्फी लढतीत लोळविले. चीनच्या झिफेयू यू हिला हरविण्यासाठी नीतू घांगस (४८ किलो) हिला अधिक मेहनत घ्यावी लागली नाही.