महिला चालकयुक्त टॅक्सीसेवेस प्रारंभ

0
79
पर्यटक टॅक्सींसमवेत महिला चालक. (छाया : नंदेश कांबळी)

पर्यटन विकास महामंडळाने महिला चालक असलेल्या पर्यटक टॅक्सी सुरू करून महिलांना वेगळ्या व्यवसायाची दिशा दाखविली आहे. गोव्यात येणार्‍या महिला पर्यटकांना किंवा कुटुंबांना या योजनेचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले.काल मिरामार येथील यात्री निवासच्या आवारात मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवून या योजनेचा शुभारंभ केला. भविष्यकाळात खासगी टॅक्सी चालविण्यासाठीही महिलांना पुढे येण्यास वातावरण तयार झाल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटकांना सुरक्षितता असली पाहिजे, असे ते म्हणाले.
महिला चालक असलेल्या टॅक्सीमुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल. कुणालाही टॅक्सी हवी असल्यास ०८३- २४३७४३७ या क्रमांकावर फोन केल्यास टॅक्सी उपलब्ध होऊ शकेल. या टॅक्सीत महिला प्रवासी किंवा पुरुष बरोबर असलेल्या कुटुंबाला लाभ घेणे शक्य आहे, असे पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष निलेश काब्राल यांनी सांगितले. सध्या दहा टॅक्सी सुरू करण्यात आल्या असून भविष्यकाळात त्यात आणखी वाढ केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
या टॅक्सीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सुविधा उपलब्ध असून सरकारने अधिसूचित केलेल्या दरानुसारच भाडे आकारले जाईल. त्यामुळे फसवेगिरी होणार नाही, असे ते म्हणाले. टॅक्सीमध्ये जीपीएस व्यवस्था असल्याने टॅक्सी कुठे पोचली हे कळेल. सध्या उत्तर गोव्यातच ही योजना सुरू केली आहे. पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनीही या योजनेमुळे पर्यटन व्यवसायाला मदत होईल, असे सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी टॅक्सी चालक असलेल्या शोभा जोशी, ग्रेसी इरादो, रिटा वाझ, एरलिन फर्नांडिस, राजश्री च्यारी, विटने फर्नांडिस, शामली नाईक, रिना फर्नांडिस, मनिशा बॅनर्जी व मारिया यांचा सत्कार केला.