महिला कलाकारांनी सिनेसृष्टीकडे वळावे : वर्षा

0
87

>> केपे महामराठी संमेलनात मुलाखत रंगली

महिला कलाकारांनी चित्रपटसृष्टीकडे वळावे. मात्र, पाश्‍चात्य वेशभूषा, संस्कारांचे अनुकरण करू नये. स्वत:चा स्वाभिमान राखावा असे स्पष्ट मत प्रख्यात अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी व्यक्त केले. केपे येथील दुसर्‍या महामराठी संमेलनात डॉ. अजय वैद्य यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

ब्रह्मचारी नाटकाद्वारे आपला नाट्य क्षेत्रात प्रवास सुरु झाला. या नाट्यप्रयोगाच्यावेळी चित्रपट निर्माते व कलाकार सचिन पिळगावकर आपल्याला येऊन भेटले. मात्र, त्यामुळे नाट्य दिग्दर्शक सुधीर भट हे नाराज झाले. आपण सचिन पिळगावकर यांना भेटले तेव्हा त्यांनी आपल्याला ‘गम्मत जम्मत’ हा चित्रपट दिला. हा चित्रपट फारच लोकप्रिय ठरला. त्यानंतर मला चित्रपटामागून चित्रपट मिळत गेले. आपल्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर असे दिग्गज नायक मिळाले असे त्यांनी सांगितले.

माझी आई नेहमीच चित्रपटाच्या सेटवर यायची. पण त्यांच्या विनोदी अदाकारीमुळे त्यांचे चित्रपट अफाट लोकप्रिय व्हायचे. एक चित्रपट मी अजिंक्य देव यांच्याबरोबर केला. पण तो फारसा चालला नाही. नंतर जॅकी श्रॉफ यांच्याबरोबर ‘दूधका कर्ज’ हा हिंदी चित्रपट केला. तो ‘कर्ज दुधाचे’ या नावे मराठीत डब झाला. तो चांगला चालल्याने हिंदी चित्रपटात पाय रोवला गेला. नाटकात, सिनेमात, दूरदर्शन मालिकेत सूत्रनिवेदिका अशा विविध भूमिका निभावल्या. आता मी सासूची भूमिका करत असून तो चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असल्याची माहिती वर्षा उसगावकर यांनी दिली.
दरम्यान, आपले लग्न शर्मा यांच्याशी झाले. सुप्रसिद्ध संगीतकार रवी शर्मा हे आपले सासरे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या सासर्‍यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गाऊन दाखवली.