‘महिलांसाठी गोवा सुरक्षित’ चे श्रेय मुख्यमंत्र्यांणा : सुलक्षणा सावंत

0
107

केंद्रीय बाल आणि महिला विकास मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात गोवा राज्य हे मुले व महिला यांच्यासाठी सुरक्षित राज्य असल्याचे दिसून आलेले आहे. गोव्यातील मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार त्यासाठी अभिनंदनास पात्र असल्याचे भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष सुलक्षणा सावंत यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. भाजप महिला मोर्चातर्फे आपण त्यासाठी सरकारचे अभिनंदन करीत असल्याचे त्या म्हणाल्या.

महिला सुरक्षेत गोवा नं. १
वरील सर्वेक्षण करताना महिलांचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षा व आर्थिक स्थिती या गोष्टींचा विचार करण्यात आला होता असे सांगून महिला सुरक्षेच्याबाबतीत गोव्याला महिला क्रमांक मिळाला आहे, असे सुलक्षणा सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. गोवा सरकारने महिलांच्या प्रगती व उन्नतीसाठी कितीतरी योजना सुरू केलेल्या आहेत. लाडली लक्ष्मी, गृह आधार, माता ममता आदी योजना भाजप सरकारने सुरू केलेल्या असून या योजनांमुळे राज्यात महिलांची कधी नव्हे एवढी प्रगती झाली असल्याचे सावंत म्हणाल्या.

महिला सशक्तीकरणात
केंद्र सरकारचाही : हात
गोव्यात महिलांचे जे सशक्तीकरण झालेले आहे त्याला केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारचेही मोठे योगदान असल्याचे सांगताना केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या योजनेचा सावंत यानी उल्लेख केला. पत्रकार परिषदेला महिला मोर्चाच्या सरचिटणीस पुनम सावंत व सपना मापारी याही हजर होत्या. त्यांनीही सरकारचे अभिनंदन केले.