महिलांवरील अन्याय खपवून घेणार नाही

0
98

>> ‘मनकी बात’ मध्ये पंतप्रधानांचा इशारा

महिलांवर कोणत्याही प्रकारचे अत्याचार व अन्याय खपवून घेतले जाणार नाही व अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍यांना कायद्यानुसार कठोर शिक्षा केली जाणार असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आपल्या ‘मनकी बात’ या रेडिओ कार्यक्रमाद्वारे बोलताना दिला.

देशातील महिलांवर होणारा कोणत्याही प्रकारचा अन्याय येथील नागरी समाज सहन करू शकत नाही. महिला. अल्पवयीन मुलींवर बलात्कार देश खपवून घेणार नाही. त्यासाठीच गुन्हेगारी कायदा दुरूस्ती विधेयक संमत करून संसदेने संबंधित आरोपींना कठोर शिक्षा होण्याची तरतूद केली आहे.
‘संसदेने मंजूर केलेल्या संबंधित दुरूस्ती विधेयकानुसार बलात्कार करणार्‍यांना किमान दहावर्षे तुरूंगवास व १२ वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणार्‍यांना मृत्यूदंड ठोठावला जाणार आहे’ असे मोदी यांनी म्हटले आहे.
एका ताज्या प्रकरणात वेगवान न्याय प्रक्रियेद्वारे आरोपीला कठोर शिक्षा सुनावण्यात आली याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

तिहेरी तलाकवरही मोदी यांनी यावेळी भाष्य केले. तिहेरी तलाक विधेयकामुळे मुस्लिम महिलांना न्याय मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत सदर विधेयक संमत होऊ शकले नाही याचा उल्लेखही त्यांनी केला. मात्र मुस्लिम महिलांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण देश त्यांच्यामागे राहील असे आश्‍वासन आपण देत असल्याचे ते म्हणाले. सामाजिक परिवर्तनाविना आर्थिक समृद्धी अपूर्ण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मुस्लिम धर्मिय पुरूषांनी पत्नीला तत्काळ तिहेरी तलाक दिल्याच्या गुन्ह्यात संबंधित पतीला जामीन देण्याची विरोधकांची प्रमुख मागणी केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली आहे. मात्र सदर गुन्हा अजामीनपात्र राहणार आहे, असेही मोदी यांनी सांगितले. न्यायदंडाधिकारी अशा प्रकरणी आरोपीला जामन मंजूर करू शकेल अशी तरतूद केंद्रीय मंत्रिमंडळाने केली आहे.