महिलांच्या लेखनात वैचारिक अद्ययावतता दिसावी

0
138
१२ व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना सुकन्या कुलकर्णी. बाजूला मंगला गोडबोले, निर्मला खलप, चित्रा क्षीरसागर, मधुगंधा कुलकर्णी, संगीता अभ्यंकर व सुगंधा बोरकर.

महिला साहित्य संमेलनात मंगला गोडबोलेंची स्पष्टोक्ती
लेखन करताना आत्मविश्‍वासाचा अभाव महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवतो. त्यामुळे म्हणावे तितके त्यांचे लेखन आकार घेत नाही. आपल्याला परिस्थितीपेक्षा मनाची बंधने जास्त असतात. स्त्रियांमध्ये अद्ययावततेचे आकर्षण खूप वाढलेय व ती अद्ययावतात प्रयत्नपूर्वक जपली जातेय (केशरचना, फिगर, फॅशन बाबत). मग विचारांची अद्ययावतता कां दिसू नये असा प्रश्‍न प्रसिध्द साहित्यिक, विचारवंत सौ. मंगला गोडबोले यांनी येथे उपस्थित केला.श्री शारदा ग्रंथ प्रसारक संस्था फोंडा या संस्थेने तुळशीमाता पांडुरंग महिला मंडळ ताळगाव आणि कला व संस्कृती संचालनालय, गोवा शासन यांच्या संयुक्त आणि कला व संस्कृती संचालनालय, गोवा शासन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील इन्स्टिट्यूट ब्रागांझा सभागृहात रविवारी आयोजित केलेल्या १२ व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून मंगला गोडबोले बोलत होत्या. अप्रमाणिकपणे लिहिले, तर ते टीकत नाही. कुवतीनुसार लिहायला हवे व त्यात प्रगतीही केली पाहिजे असे स्पष्ट करून मंगलाताई पुढे म्हणाल्या, आपल्याला काय जमतंय, खुलेपणाने वावरू असे क्षेत्र कुठले आहे हे पक्के ठरवून प्रयत्न करत रहायला हवेत. प्रत्ययकारितेला महत्व आहे. आयुष्यातील विद्रूपता, भयानकपणा आपल्याला दिसत नाही का? की ते स्वीकारायचेच नाही? नदी तीच असते. आपण कुवतीप्रमाणे छोटा – मोठा घाट बांधू शकतो.
आपण कितीही श्रीमंत असलो तरी भूतकाळ विकत घेवू शकत नाही. पण लेखनातून भूतकाळ देऊ शकतो. याची जाणीव देवून मंगलाताई यांनी सांगितले, की लेखन हा स्वत:शी केलेला संवाद आहे. दुसर्‍याशी तो झाला तर चांगलेच आहे. यावेळी व्यासपीठावर, सन्मानीय पाहुण्या सुप्रसिध्द अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी, विशेष अतिथी लेखिका व अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी, स्वागताध्यक्ष निर्मला खलप, शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेच्या अध्यक्ष विजया दीक्षित, कार्याध्यक्ष संगीता अभ्यंकर, तुळशीमाता पांडुरंग महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ. सुगंधा बोरकर व कार्यवाह सौ. चित्रा क्षीरसागर उपस्थित होत्या.
शुध्द मराठी ऐकली : सुकन्या
सुकन्या कुलकर्णी म्हणाल्या, गोव्यासारख्या ठिकाणी महिला साहित्य संमेलन होत आहे ही चांगली गोष्ट आहे. यानिमित्ताने इथे शुध्द मराठी ऐकायला मिळाली. मी साहित्यिक नाही. लेखकांनी लिहिलेले संवाद बोलणारी मी महिला आहे. इथला निसर्ग नेहमीच आकर्षित करतो. मधुगंधा कुलकर्णी यांनी सांगितले की महिला साहित्यिक किंवा साहित्य याची चर्चा आपण खूप करतो. ती करायलाच हवी. नवीन साहित्यिक घडविण्यासाठी ती मदत करते. दूरदर्शन मालिका, चित्रपट, इंटरनेट यामुळे वाचनाची आवड काहीशी कमी झाली आहे. लेखक बनण्यासाठी चांगला वाचक होणे आवश्यक असते.
लेखकांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे, असे सांगून त्या म्हणाल्या, डॉक्टर, इंजिनीअर व्हायचे असेल तर त्यांना कॉलेजमध्ये पाठवता येते पण लेखक व्हायला शाळा, कॉलेज नसते. मात्र लेखकासाठी आज अनेक माध्यमे आहेत.
त्यासाठी लहानपणापासून खूप वाचन करायला हवे, वाचन आणि व्यासंगाला पर्याय नाही. स्वागताध्यक्ष सौ. निर्मला खलप म्हणाल्या, महिलांनी ओव्या, कविता, गाणी रचल्या व ते त्यांच्यात आहे. गोव्यातील लेखिका स्वकर्तृत्वाने पुढे आल्या आहेत. या संमेलनातून होणार्‍या विचार मंथनातून नवे मापदंड उभे राहतील अशी आशा आहे. महिला साहित्यात भरारी मारताहेत त्याची नोंद घेणारे कुणीतरी हवे. स्त्रीचे कर्तृत्व आज चहुबाजूंनी बहरते आहे.
सौ. विजया दीक्षित यांनी शारदा ग्रंथ प्रसारक संस्थेतर्फे स्वरनाद हा कर्णबधीर मुलांना बोलते करणारा उपक्रम पुणे येथील कॉकलीया संस्थेच्या सौजन्याने राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. सिध्दी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले. सौ. चित्रा क्षीरसागर यांनी आभार मानले.