महिलांची सोनेरी कामगिरी

0
116

>> चार बाय ४०० मीटरमध्ये पुरुषांना रौप्य

भारताच्या महिलांनी चार बाय ४०० मीटर रिले प्रकारात अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदकाची कमाई केली. आशियाई क्रीडा स्पर्धेत सलग पाचव्यांदा या प्रकारात भारताने सुवर्ण कमाई केली. पुरुषांना मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
महिला संघात हिमा दास, एम.आर. पूवम्मा, सरिताबेन गायकवाड व विस्मया वेल्लुवा करोथ यांचा समावेश होता. त्यांनी ३ मिनिटे २८.७२ सेकंदसह सुवर्ण आपल्या नावे केले. बहारिन (३.३०.६१) व व्हिएतनाम (३.३३.२३) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक मिळविले. भारतीय संघ २००२ सालापासून महिलांच्या या प्रकारात सुवर्ण पदक जिंकत आला आहे.

दुसरीकडे पुरुषांच्या कुन्हू मोहम्मद, धरून अय्यासामी, मोहम्मद अनास व राजीव अरोकिया यांनी ३.०१.८५ सेकंद अशा वेळेसह रौप्य जिंकले. कतारने ३.००.५६ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक प्राप्त केले. ३.०१.९४ सेकंदसह जपानचा संघ तिसर्‍या स्थानी राहिला. पात्रता फेरीत भारतीय संघाने ३.०६.४८ सेकंद अशी वेळ नोंदवून चौथ्या स्थानासह अंतिम फेरीत प्रवेश केला होता. २०१४ साली या प्रकारात भारताला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले होते.