महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भवितव्य काय?

0
118
  • ल. त्र्यं. जोशी

शिवसेना काय किंवा मनसे काय, त्या अर्थाने राजकीय पक्षच नाहीत. त्या आहेत कौटुंबिक आणि राजकीय पक्षांच्या रूपातील मालमत्ता. पण राजकीय पक्ष होण्यासाठी कायद्याने निश्चित केलेले निकष ते दोन्ही पक्ष पाळत असल्याने त्यांना राजकीय पक्ष म्हणायचे एवढेच.

शिवसेनेने मुंबई महापालिकेतील मनसेचे सहा नगरसेवक फोडल्यामुळे त्या महानगरातील राजकारणात कोणता फरक पडेल, ठाकरे बंधूंपैकी कुणाची सरशी होईल हे प्रश्न औत्सुक्याचे असले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात महत्वाचे असले तरी ते व्यक्तींच्या संदर्भात तरी गौणच आहेत. तसे फोडाफोडीचे राजकारणही आता इतके नित्याचे झाले आहे की, त्यामुळे वैध काय, अवैध काय, नैतिक काय आणि अनैतिक काय, या चर्चेला फारसा अर्थ उरत नाही. या राजकीय घटनेमुळे खरा प्रश्न निर्माण झाला आहे तो मनसेच्या भवितव्याचा आणि तेवढाच राज ठाकरे यांच्या भविष्यातील खेळीचा.

वास्तविक शिवसेना काय किंवा मनसे काय, त्या अर्थाने राजकीय पक्षच नाहीत. त्या आहेत कौटुंबिक आणि राजकीय पक्षांच्या रूपातील मालमत्ता. पण राजकीय पक्ष होण्यासाठी कायद्याने निश्चित केलेले निकष ते दोन्ही पक्ष पाळत असल्याने त्यांना राजकीय पक्ष म्हणायचे एवढेच. त्या संदर्भात निवडणूक आयोगाचा नियम असा आहे की, प्रत्येक राजकीय पक्षाची नोंदणी आयोगाकडे झाली पाहिजे. त्याचे पदाधिकारी नियुक्तीच्या नव्हे तर पक्षांतर्गत निवडणुकीच्या माध्यमातून निवडले गेले पाहिजेत. पक्षाच्या आर्थिक व्यवहारासाठीही नियम आहेत. पण सर्वच राजकीय पक्ष त्यातून शॉर्टकट मारतात. शिवसेना वा मनसेही त्याला अपवाद नसावेत. हे दोन्ही राजकीय पक्ष सर्वार्थाने कुटुंबाधारित आहेत. मनसेच्या बाबतीत तर त्याच्याही पुढची स्थिती आहे. तेथे कुटुंबप्रधानतेपेक्षा व्यक्तिप्रधानता महत्वाची ठरली आहे. अर्थात दोन्ही पक्षांना आपापल्या पध्दतीने पक्ष आणि राजकारण चालविण्याचे स्वातंत्र्य निवडणूक आयोगाने व राज्यघटनेने दिले आहेच. ते पक्ष त्याचा वापर करुन आपापले राजकारण करत आहेत.

व्यक्तिंबाबत विचार करायचा झाल्यास व्यक्ती म्हणून, पक्षनेते म्हणून राज आणि उध्दव दोघेही आपापल्या परीने महान आहेतच, पण बाळासाहेबांच्या व्यक्तित्वाच्या आणि कर्तृत्वाच्या संदर्भात विचार केला तर राज ठाकरे वक्तृत्वाच्या बाबतीत आणि उध्दव ठाकरे कर्तृत्वाच्या बाबतीत बाळासाहेबांचे खरे वारस ठरतात. जरी पक्षप्रमुखपद उध्दवकडे गेले असले तरी गेल्या पंधरा वर्षांत कर्तृत्वानेही आपण त्या पदास पात्र आहोत हे त्यांनी निर्णायकपणे सिध्द केले आहे. राज ठाकरे, नारायण राणे यांच्यासारखे पहिल्या फळीचे नेते बाहेर गेल्यानंतर आणि मनोहर जोशी यांच्यासारखे ज्येष्ठ नेते निष्क्रिय झाल्यानंतरही उध्दव यांनी ज्या पध्दतीने शिवसेनेचा विस्तार केला, ती बाब त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणारीच आहे. मी तर असे म्हणेन की, बाळासाहेब हयात असतांना शिवसेना काहीशी मुंबई महानगर आणि औरंगाबाद या शहरांपुरतीच मर्यादित होती. अखेरच्या दिवसात बाळासाहेबांनीही सेनेला महाराष्ट्रव्यापी बनविले हे खरेच, पण उध्दव ठाकरे यांनी तिला अधिक मजबूत केले व तिचा राज्यभर विस्तारही केला याबद्दल वाद असू शकत नाही.

राज ठाकरे तर केव्हाही बोलायला उभे राहिले तरी त्यांच्या आवाजातील चढउतार, विनोदबुध्दी, शब्दांची चपखल निवड आणि आक्रमकता पाहून कुणालाही बाळासाहेबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. पण बाळासाहेबांची प्रतिमा आणि प्रतिभा जवळ असूनही ते पक्षप्रमुख होऊ शकले नाहीत हे वास्तव शिल्लक राहतेच.

दोन्ही पक्षांच्या स्थापनेच्या कालावधीत फरक असला तरी त्यांच्या स्थापनेचा कालावधी आणि दोघांनीही आपापल्या पक्षाचे नेतृत्व स्वीकारण्याचा कालावधी यात कमी अंतर आहे. उध्दवकडे शिवसेनेचे नेतृत्व २००४ मध्ये आले, तर राज यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. पण शिवसेनेच्या वाढीचा वेग आणि मनसेच्या वाढीचा वेग यात बरेच अंतर आहे. सहा नगरसेवकांचा शिवसेनाप्रवेश लक्षात घेतला तर मनसेची पीछेहाट सुरू झाली आहे असेच म्हणावे लागेल. इत:पर राज ठाकरे अतिशय त्वेषाने आपली सर्व शक्ती पणाला लावून ही पीछेहाट थांबवतील असा विश्वास मनसैनिकांना वाटणे स्वाभाविक असले तरी मनसेच्या गेल्या अकरा वर्षांतील वाटचालीवरुन तरी तसे दिसत नाही. ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखालील दोन पक्षांच्या वाढीची गती पाहिली तर ससा कासवाच्या गोष्टीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मनसेची स्थापना झाल्यानंतर तिची वाढ खूप वेगाने झाली व तेवढ्याच वेगाने तिला धक्केही बसत आहेत. तिने लढविलेल्या २००९ मधील पहिल्याच विधानसभा निवडणुकीमध्ये तिला १३ जागा मिळाल्या. विशेषत: नाशिक, कल्याण डोंबिवली, पुणे या महापालिकांमध्येही बर्‍यापैकी जागा मिळाल्या. नाशिक महापालिकेत तर तिला सत्ता राबविण्याची संधी मिळाली.

राज यांच्या प्रभावी वक्तृत्वामुळे लोकही त्या पक्षाकडे आकर्षित होऊ लागले पण दुर्दैवाने हे आकर्षण राज यांच्या सभांपुरतेच मर्यादित राहिले. प्रथम लोकप्रियता प्राप्त करणे, नंतर लोकमत संघटित करणे, त्या बळावर पक्ष संघटना उभी करणे आणि तिच्या माध्यमातून कायदे मंडळांमध्ये जागा मिळवून सत्ताप्राप्तीपर्यंत मजल मारणे हा राजकीय पक्षाच्या वाढीचा क्रम मात्र मनसे अंमलात आणू शकली नाही. इतकेच काय पण राज यांच्यासारखे भक्कम आणि गुणी नेतृत्व असतांनाही मनसे शिवसेनेला कधीच भगदाड पाडू शकली नाही. आपल्या राजकीय वाटचालीत ती सातत्यही राखू शकली नाही. ज्या ज्या वेळी मनसेने टोलविरोधी आंदोलनासारखे उपक्रम हाती घेतले त्या त्या वेळी तिने यश जरुर प्राप्त केले, पण महाराष्ट्रासारख्या विशाल राज्याच्या समस्या टोलपुरत्याच मर्यादित नाहीत. त्यातील शेतकर्‍यांच्या समस्या तर अक्राळविक्राळच आहेत पण शेतकर्‍यांमध्ये मनसेचा साधा चंचुप्रवेशदेखील होऊ शकला नाही, ही वस्तुस्थिती नाकारणे मनसेलाही जड जाईल. त्या तुलनेत उध्दव यांनी मात्र प्रारंभीच्या काळात चाकरमान्या मराठी भाषिकांपुरताच मर्यादित असलेला पक्ष शेतकर्‍यांपर्यंत अतिशय परिश्रमपूर्वक पोचविला.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाशी युती नसतांना शिवसेनेने स्वबळावर ६३ जागा मिळविणे आणि मनसेच्या पदरात मात्र तेराऐवजी फक्त एकच जागा पडणे ही घटना बरेच काही सांगून जाते. मुंबई महापालिका निवडणुकीतही त्यापेक्षा वेगळे घडले नाही. एखादा मुद्दा डोक्यात आला की, त्याचा अभ्यास करायचा, त्याच्याभोवती वातावरण निर्माण करायचे यात राज ठाकरे यांचा हातखंडा असला तरी जेव्हा एखादा प्रादेशिक पातळीवरील का होईना, पण राजकीय पक्ष उभा करण्यासाठी तेवढे पुरेसे ठरत नाही. त्यासाठी काही वर्षे तरी संघटना बांधणीतच वेळ घालवावा लागतो. शिवसेनेचे प्रयत्न त्याबाबतीत भरपूर असले तरी मनसेने त्याबाबतीत साधा श्रीगणेशाही केलेला नाही. निवडणुकीच्या राजकारणात हवेचेही महत्व आहे, पण कोणताही राजकीय पक्ष केवळ हवेवर वाढू शकत नाही. अशा स्थितीत मनसेला काही राजकीय भवितव्य असू शकते असे आज तरी ठामपणे सांगता येत नाही.