महाराष्ट्रात शिवसेनेला सत्तेत घेण्यास उत्सुक : भाजप

0
79

नेता निवडीसाठी उद्या बैठक
शिवसेनेला सरकारमध्ये सामील करून घेण्यासाठी भाजप उत्सुक असल्याचे काल भाजप नेते विनोद तावडे यांनी सांगितले. महाराष्ट्र भाजपची उद्या बैठक होणार असून यात विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. राज्यातील भाजप नेत्यांना शिवसेना सत्तेत नकोय, या शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता तावडे म्हणाले की, भाजपला शिवसेनेशी युती हवी आहे. पण त्यासाठी आधी मने जुळण्याची गरज आहे. त्यासाठी पूर्वअटींशिवाय एकत्र यावे लागेल. लोकांना महाराष्ट्रात चांगले व भ्रष्टाचारमुक्त सरकार हवे आहे, असे ते म्हणाले.
युतीच्या दृष्टीने शिवसेनेशी मागील दारातून बोलणी चालू असल्याचे कळते. मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळ जवळ नक्की आहे.
दरम्यान, उद्या सकाळी ११ वा. विधान भवनात ही बैठक घेतली जाणार असल्याचे वरिष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग तसेच भाजपचे महाराष्ट्र प्रभारी जे. पी. नड्डा उपस्थित असतील. बैठकीनंतर राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करणार आहे.