महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक जागा

0
98
मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी उचलून धरले.

हरयाणात सत्ता भाजपची : मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आज ठरणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झालेल्या भारतीय जनता पक्षाने हरयाणा विधानसभेसाठी स्वबळावर साधे बहुमत मिळवीत या राज्यात सरकार स्थापण्याचे निश्‍चित केले. उभय राज्यामध्ये भाजपने कॉंग्रेसची धूळधाण उडवली असून अनेक कॉंग्रेसी दिग्गज पराभूत झाले आहेत. कालच्या निकालाच्या दिवसाची अनपेक्षित बाब ठरली ती राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी भाजपाला देऊ केलेला विनाअट पाठिंबा. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फक्त एक जागा मिळू शकली. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ पैकी भाजपला १२३ जागा मिळाल्या आहेत. मात्र साध्या बहुमतासाठी त्यांना १४५ जागांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीचा भाजपाला पाठिंबा
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल सर्वाधिक जागा मिळवलेल्या भाजपला सरकार स्थापनेसाठी आपला पक्ष पाठिंबा देऊ इच्छित असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादीचा भाजपला बाहेरून पाठिंबा असेल व तो बिनशर्ती असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राला स्थैर्याची गरज असल्याने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय ४२ जागा पटकावलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतल्याचे पटेल यांनी सांगितले.
भाजपकडून प्रस्ताव येऊ द्या : उध्दव ठाकरे
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा भाजपला घ्यायचा असल्यास त्यांनी तो स्वीकारावा. सरकार स्थापनेसाठी आधी आम्हाला भाजपकडून प्रस्ताव येऊ द्या. त्यानंतर आम्ही काय ते पाहू अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते उध्दवर ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. त्याआधी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘काहीही होऊ द्या, पण मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. तसेच सरकार स्थापनेबाबत सर्व पर्याय खुले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
मोदी लाट कायम : शहा
दरम्यान, भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्र व हरयाणातील भाजपच्या अभूतपूर्व यशामुळे देशात अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेची लाट कायम असल्याचे सिध्द झाले असल्याचा दावा केला आहे. दोन्ही राज्यांमध्ये भाजपचे सरकार येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याआधी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेशी भाजपची चर्चा झालेली नसली तरी गरज घडल्यास मित्रपक्षांकडून पाठिंब्याची अपेक्षा आपल्याला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
हरयाणात भाजप सरकार
हरयाणा विधानसभेतील एकूण ९० जागांपैकी ४६ जागा जिंकून भाजपने साधे बहुमत प्राप्त केले असल्याने सरकार स्थापनेसाठी त्यांच्यातर्फे सर्व सज्जता आहे. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारासाठी त्यांची चर्चाही सुरू झाली आहे.
२००९ च्या विधानसभेत केवळ ४ जागा मिळवलेल्या भाजपने हरयाणात यावेळी ४६ जागा मिळवीत मोठी झेप घेतली आहे. भाजप हरयाणात प्रथमच स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी सज्ज झाला आहे. मावळते मुख्यमंत्री भूपेंद्र हुडा यांनी आपल्या पक्षाचा पराभव मान्य केला असून भाजपचे अभिनंदनही केले आहे.
मावळत्या विधानसभेत ४० आमदार असलेल्या कॉंग्रेसला या निवडणुकीत फक्त १५ जागा मिळाल्या आहेत. इंडियन नॅशनल लोक दल पक्षाला १८ जागा मिळाल्या असून हा पक्ष या विधानसभेत प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहे.
नारायण राणेंचा धक्कादायक पराभव
कॉंग्रेसचे निवडणूक प्रचारप्रमुख असलेले नारायण राणे यांचा कुडाळ मतदारसंघातून झालेला पराभव हा यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील सर्वात धक्कादायक पराभव ठरला आहे. त्यामुळे त्यांना पराभूत करणारे शिवसेनेचे वैभव नाईक किंगमेकर ठरले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गणेश नाईक यांनाही अशाच पराभवाला सामोरे जावे लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नारायण राणे यांनी बंड करीत उद्योगमंत्रीपदाचा राजीनामाही दिला होता. तथापि कॉंग्रेस श्रेष्ठींनी त्यांना शांत केले होते. त्यासाठी त्यांच्यावर प्रचार प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली होती. कॉंग्रेसच्या मुख्यमंत्रीपदाचे ते दावेदार होते. मात्र त्यांना दहा हजार मतांनी पराभूत व्हावे लागले. त्यातल्या त्यात पुत्र नीतेश राणे विजयी झाल्याने त्यांची पत काही प्रमाणात शिल्लक राहिली आहे. या निकालामुळे सिंधुदुर्गातील राणेंची सद्दी संपल्याची चर्चा आहे.