महाराष्ट्रात पडघम

0
130

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणावर आणि शिवसेनेमध्ये काही प्रमाणात सुरू असलेले नेत्यांचे ‘इनकमिंग’ लक्षात घेता येणार्‍या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीसाठी ही अस्तित्वाची लढाई असणार आहे. नेत्यांमागून नेते पक्ष सोडून चालले आहेत. एका रात्रीत निष्ठा बदलत आहेत. या परिस्थितीत पक्षाला लागलेली ही गळती थांबवायची कशी या चिंतेत दोन्ही पक्षांचे श्रेष्ठी दिसत आहेत. जागावाटपामध्ये मात्र कॉँग्रेस – राष्ट्रवादीने यावेळी आघाडी घेतली. भाजप – शिवसेनेचा जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नसताना कॉंग्रेस व राष्ट्रवादी मात्र प्रत्येकी १२५ जागा लढवण्याचा निर्णय घेऊन मोकळे झाले आहेत. उरलेल्या ३८ जागा ते मित्रपक्षांना देणार आहेत. गरज भासली तर स्वतःच्या वाट्याच्या जागाही मित्रपक्षांना देण्याची त्यांची तयारी आहे. कोणत्याही तक्रारीविना, कुरबुरीविना दोन्ही पक्षांमधील जागावाटप पार पाडले याचा अर्थ स्पष्ट आहे. एकत्र येणे ही यावेळी दोन्ही पक्षांची आत्यंतिक गरज बनलेली आहे. आजवर हे दोन्ही समविचारी पक्ष कधी निवडणुकीपूर्वी एकत्र आले, तर कधी निवडणुकीनंतर, कधी स्वतंत्रही लढले, परंतु गेल्या निवडणुकीत झालेल्या धुळधाणीचे स्मरण ठेवून यावेळी दोन्ही पक्षांनी मुकाटपणे हातमिळवणी करून टाकली आहे. भाजप – शिवसेनेचा गुंता मात्र अजूनही सुटलेला नाही. शिवसेनेची दुटप्पी नीती हेच त्यामागील मुख्य कारण आहे. २०१९ ची निवडणूक स्वबळावर लढू अशा गर्जना सेनेने केलेल्या होत्या, परंतु निवडणूक जवळ येऊ लागताच दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सौहार्दाचे संबंध भासवायला सुरूवात केली. परंतु हे सौहार्दही स्वच्छ नाही. मैत्रीची भाषा करायची आणि हळूच बोचकारायचे हे सातत्याने चालले आहे. शिवसेनेला धास्ती आहे ती भाजपच्या विस्तारवादाची. गोव्यामध्ये मगोची जशी धूळधाण उडवली, तशी भाजपा आपली उडवेल या भीतीच्या सावटाखाली शिवसेना गेली अनेक वर्षे आहे. त्यामुळे मैत्री असल्याचे भासवायचे, पण घरात मात्र घ्यायचे नाही असा काहीसा प्रकार शिवसेनेने चालवलेला आहे. भारतीय जनता पक्षही गेल्या लोकसभा निवडणुकीतील दणदणीत यशानंतर आणि अन्य पक्षीय नेत्यांची रीघ लागल्याने छाती फुगवून आहे. त्यामुळे शिवसेनेला न जुमानता स्वबळावर लढावे असा एक मतप्रवाहही पक्षात आहे. मात्र, अजूनही शिवसेनेला मतविभागणीची संधी द्यायची नेत्यांची तयारी नाही. शिवसेनेसोबत एकत्र लढण्यात आपलाच फायदा आहे हे भाजपा पुरेपूर जाणून आहे. प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ व एमआयएम यांनी हातमिळवणी केली, परंतु कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीमध्ये मात्र त्यांची ही वंचित बहुजन आघाडी सामील झाली नाही. त्यामुळे त्या मतविभाजनाचा फायदा भाजपा – शिवसेनेला मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही पक्षांकडे लागून राहिलेली नेत्यांची रीघ लक्षात घेता या निवडणुकीत कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक बालेकिल्ले आयते भाजपा सेनेच्या घशात जातील अशी शक्यता दिसते आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हेच मुलामागोमाग भाजपाच्या गोटात आले. त्यामुळे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात यांना कॉंग्रेसने प्रदेशाध्यक्षपद दिलेले आहे. मोहिते पाटील पितापुत्र, सातार्‍याचे उदयनराजे – शिवेंद्रराजे, उस्मानाबादचे राणा जगजितसिंगजी, नवी मुंबईचे गणेश नाईक, अहमदनगरचे मधुकर व वैभव पिचड, इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, अशी मंडळी वाहत्या वार्‍याच्या दिशेने डेरेदाखल झाली आहेत. कॉंग्रेस – राष्ट्रवादीतील पडझड त्या दोन्ही पक्षांसाठी आव्हानात्मक आहे. भाजपाने प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे दिली आहेत. चंद्रकांतदादा पक्षाचे खंदे कार्यकर्ते आहेत. गोव्यामध्येही ते पूर्वी संघटनात्मक कार्यासाठी वारंवार यायचे. भक्कम संघटनात्मक बांधणी, मोदींचा प्रभाव आणि देवेंद्र फडणविसांचे स्वच्छ प्रशासन याचा फायदा मिळेल असा भाजपाला विश्वास आहे. फडणविसांनी महाजनादेश यात्रेने महाराष्ट्र पिंजून काढला आहे. शिवसेनेनेही आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जनआशीर्वाद यात्रा काढली. आदित्य यांचे नवे नेतृत्व सेनेने यावेळी पुढे आणलेले आहे. मुख्यमंत्रिपदासाठीही त्यांचे नाव पद्धतशीरपणे पुढे आणले जाते आहे. राज्यामध्ये नुकताच महापूर येऊन गेला. पश्‍चिम महाराष्ट्रातील जनतेला त्याचा मोठा त्रास सोसावा लागला. शहरांना खड्‌ड्यांनी वेढले आहे. नुकतीच सेलिब्रिटींनी त्याविरुद्ध मोहीम चालवली. परंतु सरकारला घेरता येईल अशी मोठी प्रकरणे आज विरोधकांच्या हाती दिसत नाहीत. फडणवीस सरकारने प्रशासनावर चांगलीच मांड ठोकली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक कोणते मुद्दे पुढे आणणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. जागावाटपामध्ये कॉंग्रेस – राष्ट्रवादीने आघाडी घेतली असली तरी जनसंपर्कात भाजपा, सेना आघाडीवर दिसते आहे. आता प्रश्न आहे जागावाटपाचा. तो सुटणार का, युती होणार का आणि ती झाली तर कॉंग्रेस राष्ट्रवादीचे काय होणार, हे प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत!