महाराष्ट्राकडून विर्डी धरणाचे काम पुन्हा सुरू

0
125

>> मुख्य सचिव हरकत घेणारे पत्र महाराष्ट्राला पाठविणार

म्हादई जल लवादासमोर दिलेल्या आश्‍वासनाला हरताळ फासत महाराष्ट्राने विर्डी धरणाचे २०१५ सालापासून बंद असलेले काम डागडुजीच्या नावाखाली १५ दिवसांपूर्वी पुन्हा सुरू केले असून मोठ्या प्रमाणात मशिनरी व ट्रक आणून अविश्रांत काम चालू ठेवले आहे. गोवा सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून राज्याचे मुख्य सचिव महाराष्ट्राच्या सचिवांना याबाबत नाराजी व्यक्त करणारे पत्र पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

म्हादई जल लवादासमोर यापूर्वी विर्डी धरणाचा प्रश्‍न गोव्याने उपस्थित केला होता. त्यावेळी २०१५ मध्ये महाराष्ट्राने धरणाचे काम पूर्णपणे थांबवले होते. म्हादईप्रश्‍नी सुनावणी होऊन निकाल लागेपर्यंत काम करणार नसल्याचे आश्‍वासन महाराष्ट्राने लवादासमोर दिले होते. मात्र, महाराष्ट्राने सर्व नियम धाब्यावर बसवत कोकण जलसंसाधन महामंडळातर्फे १५ दिवसांपूर्वी काम पुन्हा सुरू केले आहे. त्यानंतर गोव्याच्या पथकाने दोनवेळा दौरा करून कामाचा तपशील सादर केला होता. शनिवारी जलसंसाधन खात्याचे सहाय्यक अभियंता नाईक यांनी विर्डी धरण प्रकल्पाच्या जागी भेट देऊन कामाची पाहणी केली होती.

जलसंसाधन खात्याचे मुख्य अभियंता संदीप नाडकर्णी, त्याचप्रमाणे खात्याचे सचिव यांनी यासंदर्भात महाराष्ट्र सरकारला व संबंधित अधिकार्‍यांना यापूर्वीच पत्र लिहिले आहे. राज्याचे मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना याबाबत पत्र लिहून कल्पना देण्याचे निश्‍चित केलेले आहे. सध्या विर्डी येथे मान्सूनपूर्व तयारी असल्याचे भासवून महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणात कामाचा धडाका लावला आहे. काम पावसाळ्यानंतर पूर्ण करण्याच्या हालचालीना वेग दिला असून कत्रांटदाराने तशी शक्यता व्यक्त केली आहे.