महामार्गाच्या संथ कामामुळे गडकरी नाराज

0
64

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील राष्ट्रीय महामार्गांच्या प्रगतीचा आढावा घेताना गोव्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या गतीबाबत नाराजी व्यक्त केली. दक्षिण गोव्यातील तारांकित हॉटेलमध्ये महामार्गांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी कालपासून परिषद सुरू झाली.
गोव्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या मंदगतीने कामाबाबत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरले. महामार्गाच्या कामाला गती देण्याची सूचना त्यांनी केली आहे. मुरगाव, पर्वरी येथे महामार्गाच्या कामात अडचणी येत आहेत, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

या परिषदेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी एकूण ७०० प्रकल्पांचा आढावा घेतला. यांपैकी ४२७ प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तर ३६९ प्रकल्प ज्यांचा खर्च शंभर कोटींहून अधिक आहे असे प्रकल्प रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून हाती घेण्यात आले आहेत. या बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच विविध राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

एकूण ७०० प्रकल्पांपैकी ३०० प्रकल्प मार्च २०१९ पूर्वी पूर्ण केले जाणार असल्याची माहिती रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिली. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी प्रत्येक प्रकल्पाचे बारकाईने विश्लेषण केले. तसेच २७,००० किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जे मार्च २०१५ पूर्वी देण्यात आले आहे ते मार्च २०१९ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. राज्यात सध्या पत्रादेवी ते करासवाडा ६३४.३२ कोटी, करासवाडा ते बांबोळी ८५२.६७ कोटी, ढवळी वळणरस्ता ७१.९५ कोटी, खांडेपार पूल ३५५.४४ कोटी, मडगाव पश्चिम वळणरस्ता २७४.०१ कोटी, मिसिंग लिंक एनएच १७- बी चे १८४.०४ कोटी, काणकोण वळणरस्ता २९०.५९ कोटी, झुआरी पूल (पॅकेज-१) ८१९.९५ कोटी, झुआरी पूल (पॅकेज-२) ९३६.४० कोटी, झुआरी पूल (पॅकेज-३) ७७३.९८ कोटी ही कामे सुरू असल्याचे साबांखा विभागाने सांगितले.