महापौर – उपमहापौर निवडणूक १४ मार्चला

0
159

पणजी महानगरपालिकेच्या नूतन महापौर आणि उपमहापौर निवडण्यासाठी येत्या १४ मार्च रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. महानगरपालिकेचे महापौर सुरेंद्र फुर्तादो व उपमहापौर लता पारेख यांच्या एक वर्षाच्या कार्यकाळाची मुदत मार्च माहिन्यात पूर्ण होत आहे.
दरम्यान, महापौर आणि उपमहापौरपदासाठी राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून महापौरपदाच्या शर्यतीत भाजप गटाचे नगरसेवक पुंडलिक राऊत देसाई सर्वांत पुढे असल्याची चर्चा सुरू आहे.

माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या गटाचा भाजप गटाला पाठिंबा मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. उपमहापौरपद बाबूश गटाला दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे विद्यमान महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी पुन्हा महापौरपदासाठीच्या निवडणुकीत उतरणार नसल्याचे सांगितले. बाबूश यांचा पाठिंबा नसताना निवडणूक लढवण्यात अर्थ नाही. त्यांनी भाजप नेत्यांना त्यांच्या पॅनलमधील नगरसेवकाची महापौरपदी वर्णी लावण्याचे आश्‍वासन दिले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आपण शर्यतीतून माघार घेतल्याचे फुर्तादो म्हणाले.
नगरसेवक उदय मडकईकर यांनी महापौरपदासाठी मोर्चेबांधणी केली होती. बाबूश गटाच्या नगरसेवकांच्या बैठकीत स्वतःच्या नावाची शिफारस करून घेतली होती.

तथापि, मडकईकर यांनी महापौरपदाच्या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी महापौर व उपमहापौर पदासाठीची रणनीती जाहीर केलेली नाही. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी मोन्सेरात यांची ग्रेटर पणजी पीडीएच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठी मदत केलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या नगरसेवकाची महापौरपदी वर्णी लावण्यासाठी माजी मंत्री मोन्सेरात यांच्याकडून मदत करण्यात येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजप गटाच्या नगरसेवकांची सोमवारी बैठक घेऊन चर्चा केली आहे. महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध सुध्दा होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.