महापौरपदासाठी मोन्सेरात गटातर्फे विठ्ठल चोपडेकर उमेदवार घोषित

0
86

>> उपमहापौरपदासाठी अस्मिता केरकर

महानगरपालिकेच्या येत्या १४ मार्च २०१८ रोजी होणार्‍या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी माजी मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी आपल्या गटाचे महापौरपदाचे उमेदवार म्हणून नगरसेवक विठ्ठल चोपडेकर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार म्हणून नगरसेविका अस्मिता केरकर यांच्या नावाची घोषणा काल केली.
दोनापावल येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये माजी मंत्री मोन्सेरात यांच्या उपस्थितीत बाबुश समर्थक गटाच्या १५ नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत माजी मंत्री मोन्सेरात यांनी महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी आपल्या गटाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.

महापौरपदासाठी नवीन चेहरा देण्याची घोषणा माजी मंत्री मोन्सेरात यांनी केली होती. त्यानंतर नगरसेवक चोपडेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. बाबूश समर्थक गटाची महापौरपदाची उमेदवारी मिळविण्यासाठी उदय मडकईकर यांनी प्रयत्न केला होता. नगरसेवकांच्या बैठकीत आपल्या नावाची शिफारस सुध्दा करून घेतली होती. तथापि, मडकईकर यांनी अचानक निवडणूक रिंगणातून माघार घेतली. महानगपालिकेत बाबूश गटाचे पंधरा, भाजप गटाचे तेरा आणि विद्यमान महापौरदोन अपक्ष नगरसेवक मिळून तीस नगरसेवक आहेत. भाजपकडून या निवडणुकीत उमेदवार उतरले जाणार आहे. भाजप गटाच्या उमेदवारांच्या नावाच्या घोषणेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. बाबूश मोन्सेरात यांनी उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजप गटाच्या उमेवरांची घोषणा केली जाईल, असे भाजप नेत्यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, बाबुश गटाच्या नगरसेवकांच्या बैठकीचे निमंत्रण आपणाला नव्हते. त्यामुळे बैठकीला उपस्थित राहिलो नाही. महापौर, उपमहापौर निवडणुकीतील आपली भूमिका योग्यवेळी स्पष्ट करणार आहे, अशी माहिती महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी दिली.