महत्त्व पारंपरिक गोमंतकीय भातशेतीचे

0
332

– डॉ. शिल्पा भोसले, शिवोली बार्देश
जगातील पन्नास टक्के लोकांचे भात हे मुख्य अन्न आहे आणि सर्वसाधारणतः भातशेती ही सगळ्याच खंडांमध्ये केली जाते. सध्याच्या शहरीकरणामुळे किंवा विकासाच्या नावाखाली म्हणा, भातशेतीखाली लागवड करण्यात येणारी जमीन हळूहळू कमी होत चालली आहे. झपाट्याने वाढत चाललेल्या लोकसंख्येला खाद्यान्न पुरविण्यासाठी पारंपरिक व स्थानिक भाताच्या प्रजाती जपण्याची आवश्यकता आहे, ज्यांच्यामध्ये उच्च पोषक तत्वे व रोगराईपासून नैसर्गिकपणे रक्षण करणारे अनेक घटक आहेत.भातशेती ही गोव्यात प्रामुख्याने तीन प्रकारच्या जमिनीत केली जाते. भरड, खेर व खाजन. गोव्यात विविध हंगामांत गोळा केलेल्या भाताच्या नमुन्यामधून अनेक प्रकारच्या प्रजातींचा शोध लागला. जुन्या जाणत्या शेतकर्‍यांशी संवाद साधताना गोव्यातील भातशेतीबद्दल अनेक पारंपरिक बियाणे व त्यांच्या लागवडीच्या पद्धतीबद्दल उपयुक्त अशी माहिती मिळाली. हा उपक्रम करीत असताना भातशेतीबद्दल पारंपरिक माहिती, विशिष्ट भाताचे प्रकार जे विविध पारंपरिक पदार्थ बनविण्यासाठी वापरात आणले जायचे, गोव्याच्या संस्कृतीमध्ये विविध भाताच्या जातींचे महत्त्व इत्यादी माहितीचे संकलन करण्यात आले. भाताचे काही मर्यादित प्रकार काही मोजक्या खाद्यपदार्थांत वापरण्यास स्थानिक लोकांची पसंती होती असे लक्षात आले.
भूतकाळात वळून पाहता लक्षात येते की, पूर्वी गोव्यात अनेक प्रकारच्या भातशेतीची लागवड केली जायची. परंतु जास्त उत्पन्न देणार्‍या भाताच्या प्रकारामुळे उत्पादन वाढवण्याच्या नादात, हे पारंपरिक भाताचे प्रकार हळूहळू लुप्त होत गेले. भाताच्या पारंपरिक प्रजातीबरोबर त्यांची नावे पण कालांतराने लोक विसरले. इथली स्थानिक बियाणे/प्रजाती उदा. सांबरसाळ, भांगरसाळ, नेरमार, डोंगरी, चागर, शिरीबिडी, रंगा, ओडूस्को, पानयो, भूतालगो, जरमाळ, बेड्डो, पानयो, तांबडो पानयो, तांबडी पाटणी, मांडला, मोरेपाटणी, धवो केंदाळ, पाटणी, केंदाळ, धाकलो केंदाळ, धवो बाबरी, चुडी, साळसी, भागरकड्डी, भरड केंदाळ, व्होडलो केंदाळ, शिट्टो, कुकुमसाळ, कुरड, धवी पत्री, केनाळ, सट्टी आणि काळोखी. आपल्या गोव्यातील विद्यमान पिढीला ह्या स्थानिक भाताच्या जातींबद्दल माहिती असण्याची शक्यता कमीच.
हल्लीच्या काळात मरड व खेरजमिनीत अल्पप्रमाणात लागवड करण्यात येणार्‍या बेळ्ळो, जिरेसाळ, धनसाळ, बारीक कुड्डी, जिरगा, काळो कोरगुट, काळो नोवान, वालय, कर्ज, केंदाळ, खोचरो, कोळ्यो, कोथमिरसाळ, कुसगो, पाटणी, साळ, तायसु, तांबडी ह्या जाती हळूहळू नष्ट होत चालल्या आहेत.
भाताच्या उत्पादन वाढीसाठी दाण्यांची गुणवत्ता, उच्च प्रतीची पोषक तत्वे, रोगप्रतिबंधक शक्ती, खार्‍या पाण्यात किंवा दुष्काळात तग धरण्याची क्षमता, पाण्याखाली जाणारी जमीन इत्यादी गोष्टींचा विचार केला तर आपल्या गोव्यातील पारंपरिक भाताच्या प्रजातींचे जतन करण्याच अत्यंत आवश्यकता आहे. हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या प्रजाती गोळा करणे, त्यांच्या नोंदी ठेवणे, पोषक तत्त्वांचे परीक्षण करणे, व धान्याच्या गुणधर्माचे संवर्धन/अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरगुट, आसगो, मुणो, दामगो, शिड्डी, खारो मुणगो, काळो दामगो ह्या विशिष्ट व पारंपरिक प्रजाती खार्‍या पाण्यात तग धरणार्‍या व विशेषतः खाजन जमिनीत लागवड करण्यात येणार्‍या आहेत. पारंपरिक भातशेतीमध्ये असणार्‍या गुणधर्माचा अंतर्भाव उच्च उत्पादन देणार्‍या भाताच्या संकरीकरण प्रक्रियेत करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. वरील नमूद केलेल्या कारणासाठी, गोव्यातील पारंपरिक शेत बियाण्यांचे संवर्धन करण्याची नितांत आवश्यकता आहे. भात उत्पादन करणार्‍या कित्येक देशांसमोर आज शेतजमिनीत येणार्‍या खार्‍या पाण्याची समस्या आहे. शेत जमिनीची स्थिती सुधारण्यासाठी व जमिनीतील खारटपणा हाताळण्यासाठी स्थानिक भात प्रकारांची लागवड व सेंद्रीय शेतीपद्धतीचा अवलंब करण्याकडे बहुतेकांचा कल आहे.
खारटपणाचा दबाव हा प्रामुख्याने गोव्यातील भात पिकाच्या उत्पादनावर मर्यादा आणतो. विशेष करून खाजन भागात जिथे खाडीतील पाणी खारटपणा वाढविण्यासाठी कारणीभूत ठरते. खारटपणा गोव्याच्या किनारपट्टी भागात पसरलेला असला तरी या जमिनीत पावसाळ्यात भातशेती केली जाते. दीर्घकाळाकरिता रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा वापर जमिनीच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकतो. उदाहरणार्थ जमिनीवरील खारटपणाचा दबाव, सेंद्रीय खतांचा वापर हा ग्रामीण शेतीसाठी दीर्घकालीन उपाय होऊ शकतो. अशा प्रकारची शेती कमी खर्चात, जास्त उत्पादन देणारी व आर्थिकदृष्ट्या परवडणारी तसेच पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून उपयुक्त अशी आहे. पारंपरिक भाताची लागवड ही जमिनीच्या खारटपणावर तोडगा म्हणून तसेच खारट जमिनीत जास्त उत्पादन घेण्यासाठी उपयोगात येऊ शकते. नापीक किंवा कमी पिक येणार्‍या जमिनीची उत्पादन क्षमता वाढली तर न केवळ शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल तर स्थानिकांमध्ये रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध होतील. सुधारित बियाणी दीर्घकाळासाठी उपयुक्त नाहीत, कारण पर्यावरणातसुद्धा ठराविक काळाने बदल घडवून आणता येतात. अभ्यासाअंती काही मुद्दे लक्षात येतात ते म्हणजे पारंपरिक प्रजातीत खारटपणाचा दबाव सहन करण्याची जास्त क्षमता असते, त्याचबरोबर सेंद्रीय खतांचा वापर केल्यास जमिनीची सुपिकता वाढविण्यास मदत होते.
जास्त उत्पादन देणार्‍या बियाण्यांच्या तुलनेत पारंपरिक पद्धतीच्या खार्‍या पाण्यात तग धरणार्‍या स्थानिक प्रजातींमध्ये उच्च गुणवत्ता व ग्राहकांची पसंती असते. सेंद्रीय शेती पद्धती आणि पारंपरिक बियाण्यांचा वापक ओसाड शेतजमिनीला नवसंजीवनी व शेतकर्‍यांना उत्तम आर्थिक फायदे प्रदान करू शकते.
यासंदर्भातील विस्तृत माहिती येत्या दि. २९ नोव्हें. ते १ डिसेंबर दरम्यान काणकोण येथे संपन्न होणार्‍या दुसर्‍या अखिल गोमंतक कृषक गौरव महोत्सवात समस्त गोमंतकीय शेतकरी बंधु-भगिनींना देण्यात येणार असून त्याचा सर्वांनीच लाभ घेणे गरजेचे आहे.