मला पथ्यकर काय?

0
273
African-American black doctor woman over blue background.
  • डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी, म्हापसा)

चिकित्सेच्या मार्गात अडथळा न आणणारे ते पथ्य. पथ्य म्हणजे रोगामध्ये हितकर तर अपथ्य म्हणजे रोगासाठी अहितकर असा आहार व विहार होय. सहसा फक्त औषधे चालू असताना पथ्य-अपथ्य सांभाळायचं असतं असा समज झालेला दिसतो. मात्र पथ्य-अपथ्य आपल्या प्रकृतीला धरून ठरविलेले असते.

आपण राहतो तो देश, हवामान, आपली प्रकृती, आपला व्यवसाय आपली जीवनशैली वगैरे सर्व गोष्टी ध्यानात घेऊन आपल्यासाठी पथ्यकर काय व अपथ्यकर काय हे ठरवणे आवश्यक आहे.

मधुमेह म्हटला की सगळे रुग्ण सर्रास मेथीची व कारल्याची भाजी खायला सुरवात करतात. आता तर रोगीही कारले खातो व निरोगीही मनुष्य कारले खातो. रोगी खातो त्याच्या रोगाला पथ्यकर म्हणून व निरोगी खातो रोग होवू नये म्हणून. उच्चरक्तदाब, हृदयविकार म्हटले की तेल, मीठ सोडतात व बेचव खायला लागतात. लठ्ठपणा आला की जेवायचे सोडतात. थोडक्यात काय कोणताही आजार उत्पन्न झाला की त्यांना माहीत असलेली व त्यांना योग्य वाटणारी पथ्ये पाळायला सुरुवात करतात व या पथ्यात सगळे महत्त्व आहारालाच! विहार म्हणजे व्यायाम, योग, आचरण याला जणू आजारात काही महत्त्वच नाही. आपण पाळत असलेली पथ्ये खरेच शरीराला हितकर असतात का? पथ्ये ही रोग उत्पन्न झाल्यावरच पाळावी की रोग होवू नये म्हणून पाळावी? पथ्ये म्हणजे केवळ आहारीय पथ्ये का? पथ्ये म्हणजे चिकित्सा किंवा उपचार का? म्हणजेच लठ्ठपणासाठी सध्या मी मेथीचे पाणी पिते किंवा मिर्‍याचे पाणी पिते, अशा प्रकारची चिकित्सा, जी पथ्ये म्हणू का चिकित्सा म्हणन घ्यावी… यातील फरकही माहीत नसतो. अशाच प्रकारच्या काही समज-गैरसमजांबद्दल काही विचार मांडत आहे.
‘पथ्य’ म्हणजे काय?
‘पथ्यं पथोऽन पेतं यत् यच्चोक्तं मनस: प्रितम्‌|’
– शरीरातील स्रोतसे, ज्यांच्यामध्ये अन्नपचन, धातू तयार होणे, श्‍वास घेणे- सोडणे वगैरे शरीरातील सव क्रिया चालू असतात त्या स्रोतसांसाठी जे हानिकारक नसते तसेच जे मनाला प्रिय असते त्याला पथ्य म्हणतात.
‘अपथ्य’ म्हणजे काय?
‘यच्च अप्रियं च नियतं तन्न लक्षयेत्‌|’
– जे शरीरासाठी अहितकर असते, शरीराचे नुकसान करणारे असते आणि शिवाय मनाला अप्रिय असते त्याला अपथ्य म्हणतात.

रोग आटोक्यात रहावा, अधिक वाढू नये, चिकित्सेला सहाय्य व्हावे यासाठी आहार- विहारावर नियंत्रण ठेवावे लागते. यालाच पथ्यापथ्याचे पालन करणे असेही म्हणतात.
चिकित्सेच्या मार्गात अडथळा न आणणारे ते पथ्य. पथ्य म्हणजे रोगामध्ये हितकर तर अपथ्य म्हणजे रोगासाठी अहितकर असा आहार व विहार होय.
सहसा फक्त औषधे चालू असताना पथ्य-अपथ्य सांभाळायचं असतं… असा समज झालेला दिसतो. मात्र पथ्य-अपथ्य आपल्या प्रकृतीला धरून ठरविलेले असते. औषध चालू असताना पथ्य सांभाळले कीऔषधांचा गुण चांगला येतो. तसेच औषध नसताना पथ्य चालू ठेवले तर पुन्हा रोग होण्यास किंवा दोघांमध्ये बिघाड होण्यास प्रतिबंध होऊ शकतो.

जे आपल्या प्रकृतीला हितावह आहे, शरीरधातूंना साम्य स्थितीत ठेवण्यासाठी हितकर आहे व सर्वात महत्वाचे म्हणजे मनालाही प्रिय आहे… ते आपल्यासाठी पथ्यकर असते. एखादी गोष्ट कितीही चांगली असली, जी आपण शरीरासाठी उत्कृष्ट आहे असे म्हणतो.. ती जर मनाला रुचणारी नसेल तर ती पथ्यात मोडत नाही. उदा. एखाद्या कृश व्यक्तिला पथ्य म्हणून बदाम- खारीक दिले किंवा खायला सांगितले व मुळातच त्या व्यक्तीला बदाम खारीक किंवा सुका मेवा आवडत नसेल तर ते बदाम- खारीक त्या व्यक्तीसाठी पथ्यकर ठरत नाही. बर्‍याच लहान मुलांना सुका मेवा आवडत नसतो व पालक बळजबरीने मुलांना देत असतात. अशा वेळी त्या खाण्याचा उचित परिणाम शरीरावर दिसत नाही. तसेच धातुक्षय, वजन कमी होणार्‍या व्यक्तीसाठी क्षयरोगामध्ये मांसरस औषधाप्रमाणे हितकर असतो. पण ती व्यक्ती जर शाकाहारी असेल व तिला मांसाहाराविषयी तिटकारा असेल, तर त्या व्यक्तीसाठी मांसरस पथ्यकर ठरणार नाही.

अजून एक उदाहरण सांगते- साधारणत: कफ प्रकृतीच्या व्यक्तीसाठी कारणे हितकर समजले जाते, पण जर त्या यक्तीला कारले (कुठल्याही प्रकारात केले तरी) आवडत नसेल तर त्या व्यक्तीसाठी ते कारले पथ्यकर ठरत नाही.
अमुक वस्तू पथ्यकर आणि अमुक वस्तू अपथ्यकर असे शंभर टक्के पक्के विधान करता येत नाही. कारण…

१) मात्रा – पथ्यकर वस्तूसुध्दा अति मात्रेत खाल्ली तर ती अपथ्यकर ठरू शकते. उदा. ‘लवणम् अन्नद्रव्यरुचिकारणम्’- म्हणजे अन्नपदार्थांना चव देण्यासाठी मीठ सर्वोत्तम असते. एक वेळ स्वयंपाकात तिखट नसेल तरी चालते, पण रूची येण्यासाठी मीठ लागतेच. मीठ कमीत कमी खावे किंवा अजिबात खाऊ नये असा सध्या प्रचार चालू आहे. त्याचबरोबर याच्या उलट म्हणजे पदार्थांवर वरून मीठ घेऊन खाणार्‍यांची संख्याही काही कमी नाही. फळांवर मीठ टाकून खाणारेही भरपूर आहेत. पण आयुर्वेद शास्त्रामध्ये आहार षड्रसात्मक असावा, असे सांगितले आहे आणि त्यास लवण रसाचा म्हणजे खारट चवीचा समावेश केला आहे, त्यावरूनच मीठ आरोग्यासाठी आवश्यक आहे ही गोष्ट स्पष्ट होते. आधुनिक वैद्यकशास्त्रसुध्दा शरीरातील इलेक्ट्रोलाइट्‌चे संतुलन नीट राहण्यासाठी, मांसपेशी आखडू नयेत यासाठी, पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी योग्य प्रमाणात मीठ पोटात जाणे आवश्यक असते.. असे सांगते. जुलाब झाले तर मीठ- साखर- पाणी घ्यायला सांगितले जाते. म्हणजे हेच मीठ योग्य प्रमाणात खाल्ल्यास रुची आणणार्‍या द्रव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे म्हणजे पथ्यकार आहे. पण हेच पथ्यकर मीठ अति मात्रेत खाल्ले तर शुक्रधातु कमी करते. शक्तीचा र्‍हास होतो. केस पिकतात, गळतात व कमी मात्रेत खाल्ले तर गॉयटरसारखे व्याधी होेतात. म्हणजे पथ्यकर किंवा अपथ्यकर पदार्थ हे मात्रेवर अवलंबून असतात.

२) काळ : कोणत्या ऋतूत काय खावे किंवा कसे आचरण असावे हे आयुर्वेद शास्त्रामध्ये ऋतुचर्येत सांगितले आहे. आपण काय करतो, ऋतू कोणताही असो, आपली जेवण बनवण्याची पध्दत ही बदलत नाही, ना ही खाण्याची पूर्ण वर्ष आपले जेवणा- खाणातले ठरलेले मेनू तसेच व वापरणारे मसालेही तसेच किंवा खाद्यपदार्थही एकाच पध्दतीचे. कधीही काहीही व कसेही खाल्ले तर एका ऋतूत पथ्यकर असणारी वस्तू दुसर्‍या ऋतूत अपथ्यकर ठरू शकते.

उदा. मिठाईसारखे पचायला जड असणारे पदार्थ हेमंत ऋतूत खाल्ले तर तेव्हा अग्नी बलवान असल्याने नीट पचू शकतात मात्र हेच गुरु (पचायला जड) पदार्थ शिशिर ऋतूत खाल्ले व तेही कफ प्रकृतीच्या मनुष्याने व आवडते म्हणून जरा जास्तीच खाल्ले तर त्यातून कफदोष होऊन कफप्रकोप होवू शकतो. आणि हेच पदार्थ जेव्हा अग्नि मंद होतो तेव्हा पावसाळ्यात खाल्ले तर पचत नाही व अपचनाचा त्रास होतो. म्हणून प्रत्येक ऋतूत अग्निचे बल पाहून व दोषांची संचय- प्रकोप- साम्यता ह्या अवस्था पाहूनच ऋतूचर्येप्रमाणे आहारात बदल केला तरच पदार्थ पथ्यकर टरतात नाहीतर पथ्यकर पदार्थही अपथ्यकर ठरू शकतात.

३) क्रिया – आपली जीवनशैली व आपला व्यवसाय यावरसुद्धा काय पथ्यकर व काय अपथ्यकर हे ठरत असते. दिवसभर शेतात काम करणार्‍या, घाम गाळणार्‍या व्यक्तीने, रस्ता कामगार, गवंडी, ओझे उचलणारे इ. थोडक्यात सांगायचे म्हणजे मेहनतीचे काम करणार्‍या व्यक्तींनी जर जड अन्न खाल्ले तर त्याला कोणत्याही ऋतूत खाल्ले तरी त्याची पचनशक्ती उत्तम असल्याने त्याच्यासाठी ते अन्न पथ्यकर ठरते पण तेच दिवसभर बसून काम करणार्‍या व्यक्तींनी, सतत ए.सी.मध्ये असणार्‍या व्यक्तींनी खाल्ले तर अपचन होईल. उदा. सतत बैठे काम असणार्‍या व्यक्तींनी रात्री भरपेट जेवण केले तर पचन नीट होत नाही. दिवसभर व्यवस्थित खायला- जेवायला मिळत नाही म्हणून रात्रीचे जेवण अति मात्रेत खाण्याची काहींना सवय आहे.

४. भूमी – त्या त्या देशात पथ्यकर काय? अपथ्यकर काय याच्या व्याख्या बदलतात. उदा. दक्षिण भारतात उष्णता जास्त असल्याने तेथे थंड गुणाचे खोबरेल तेल स्वयंपाकात वापरले जाते तर उत्तर भारतात थंडी अधिक असल्याने मोहरीचे तेल वापरतात. मोहरीचे तेल पथ्यकर म्हणून जर दक्षिण भारतात वापरले तर तेच पथ्यकर तेल अपथ्यकर ठरून पित्त वाढेल. तसेच जे अन्नपदार्थ ज्या देशात उगवते, पिकते व सहज आढळते तेच अन्नपदार्थ सेवन करावेत. उदा. बरेच मधुमेही रुग्ण भात पूर्ण वर्ज्य करतात व फक्त गव्हाच्या चपात्या/पोळ्या खातात. तुमच्या भागात गहू पिकतो का? जर तांदूळ पिकत असेल तर भाताचे सेवन करावे. फक्त भात बनवण्याची आपली पद्धत बदलावी. तांदूळ थोडासा अजून घेऊन म्हणजे हलकासा अग्नीसंस्कार करून भात शिजवावा. भात शिजवताना कुकरचा वापर करू नये. कारण कुकरमधला भात चिकट होतो जो मधुमेहात अपथ्यकारक आहे. पण तोच भात.. त्याची पेज वेगळी काढून वाळून केला तर भात मोकळा होतो व त्याचा चिकटपणा जातो. म्हणजेच हाच भात मधुमेही रुग्णामध्येसुद्धा पथ्यकर ठरतो.

५) देह – म्हणजे प्रकृती. कित्येक गोष्टी अशा असतात की त्या एका प्रकृतीला पथ्यकर असतात पण दुसर्‍या प्रकृतीला अपथ्यकर असतात. उदा. मेथ्या या कफनाशक असल्याने कफ-पित्त किंवा कफ-वात प्रकृतीसाठी पथ्यकर असतात मात्र वात-पित्त प्रकृतीसाठी अपथ्यकर असतात. एखाद्या वात-पित्त किंवा पित्त-वात प्रकृतीच्या व्यक्तीला बैठा व्यवसाय किंवा इतर काही कारणांनी लठ्ठपणा आला म्हणून जर ती व्यक्ती दररोज मेथ्याचे पाणी लठ्ठपणावर उपाय म्हणून घेऊ लागली तर हा उपाय त्या व्यक्तीला पथ्यकर ठरण्यापेक्षा हानिकारकच ठरेल. तसेच गरम दूध आवडत नाही म्हणून सगळेच जण थंड दूध पिऊ शकत नाही. थंड दूध फक्त पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना पथ्यकर ठरते. कफप्रकृतीसाठी अपथ्यकारक होय.

६) दोषांच्या भिन्न अवस्था – ऋतुमानाप्रमाणे तसेच दिवस व रात्रीच्या विभागानुसार शरीरात वात-पित्त-कफ दोषात चढ-उतार होत असतात. त्यानुसारही कधी काय खावे किंवा काय करावे हे ठरत असते. वेळ-काळाचे भान न ठेवता खाल्लेली वस्तू किंवा केलेली क्रिया ही अपथ्यकर ठरू शकते. उदा. दुपारी झोपण्याने कफ व पित्त दोष वाढत असल्याने दुपारची झोप अपथ्यकर असते. मात्र हीच झोप रात्री घेतली तर पथ्यकर ठरते. सकाळी ब्राह्ममुहुर्तावर केलेला अभ्यास पथ्यकारक व रात्रीचे जागरण करून केलेला अभ्यास शरीरास हानीकारक. अग्नी संधुक्षित असताना खाल्लेले अन्न पथ्यकर व हेच अन्न अपचन असता, अग्नीमांद्य असता खाल्ले तर अपथ्यकर.
म्हणून आपण राहतो तो देश, हवामान, आपली प्रकृती, आपला व्यवसाय आपली जीवनशैली वगैरे सर्व गोष्टी ध्यानात घेऊन आपल्यासाठी पथ्यकर काय व अपथ्यकर काय हे ठरवणे आवश्यक आहे व यासाठी योग्य वैद्याचा सल्ला घ्यावा.