मला उमगलेल्या शिरीषताई

0
135

– नीलिमा आंगले

आज शिरीषताई आमच्यामध्ये नसल्या तरी त्यांच्या ‘हायकू’ निर्मितीचा प्रसार बराच होत आहे, होणार आहे आणि होत राहील… सरस्वतीच्या दरबारामधील हायकूंच्या वाटचालीत शिरीष नावाची ज्योत जनमानसात अखंड तेवत राहील. भरल्या कंठाने या ‘हायकूसम्राज्ञी’ला अलविदा! शिरीषताई, अलविदा!!

बकुळीची फुले सुकली तरी त्यांचा सुगंध निरंतर टिकून राहतो, तसेच माणूस गेला तरी त्याच्या आठवणींचा सुगंध सदैव ताजाच राहतो. यासंदर्भात सिद्धहस्त महिला साहित्यिक शिरीष पै यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. काही माणसे जन्मतःच चांदीचा चमचा तोंडात धरून येत असतात. शिरीषताई या अशा व्यक्तींपैकी एक होत. महाराष्ट्रातील पुण्याजवळ असलेल्या सासवड गावातील अत्रे कुटुंबात १५ नोव्हेंबर १९२९ रोजी ही सरस्वतीकन्या या जगात अवतरली.
झुंजार पत्रकार, नाटककार, विडंबनकार, कवी, गीतकार, चित्रपट निर्माता, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जनक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या होत. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्यांनी जवळून पाहिली, अनुभवली. लेखनाचे बाळकडू त्यांना त्यांच्या तीर्थरूपांकडून मिळाले. साहित्य व पत्रकारिता ही त्यांच्या जिव्हाळ्याची क्षेत्रे होती. भावी काळात त्यांनी उभय क्षेत्रांत स्वतःची नाममुद्रा उमटवली. वडिलांच्या सहकार्याने त्यांनी दैनिक ‘मराठा’ व साप्ताहिक ‘नवयुग’मधील साहित्यिक पुरवणीची जबाबदारी समर्थरीत्या सांभाळली.
सिद्धहस्त लेखिका, पत्रकार, कवयित्री, नाटककार, संपादक, अनुवादक व बालसाहित्यिक असे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व असलेल्या शिरीषताई म्हणजे मराठी साहित्यातील अवलिया होत. साहित्यातील कोणताच प्रकार त्यांना वर्ज्य नव्हता. त्यांच्या संपादकत्वाखाली ‘मराठा’ व ‘नवयुग’ने एक वेगळी उंची गाठली होती. आचार्य अत्रे यांच्या पश्‍चात ‘मराठा’च्या संपादकपदाची धुरा शिरीषताईंनी सांभाळली. त्यावेळी त्यांनी अनेक नवीन लेखकांना ‘मराठा’मधून लिहिते केले.
मुलींचा ओढा आईपेक्षा वडिलांकडे जास्त असतो. शिरीषताईही याला अपवाद नव्हत्या. वडिलांविषयी त्यांचा दृष्टिकोन हळवा होता नि तो त्यांनी नेहमीच जपला. ‘वडिलांचे सेवेशी’ नि ‘वडिलांचे आठवून’ या पुस्तकांमधून त्यांच्या मनामधील वडिलांविषयीचा हळवा कोपरा व्यक्त होतो. ‘मराठीमधील एकमेव स्त्री नाटककार’ असा त्यांचा नामनिर्देश करता येईल. नाट्यलेखनाबरोबर त्यांनी त्या नाटकांचे दिग्दर्शनही केले होते. ‘सोन्याचा संसार’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘झपाटलेली’, ‘कळी एकदा फुलली होती’ ही त्यांनी लिहिलेली व दिग्दर्शित केलेली नाटके. ‘कळी एकदा फुलली होती’ हे त्यांचे नाटक आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. ‘एकतारी’, ‘गायवाट’, ‘कस्तुरी’, ‘ऋतुचित्र’, ‘एका पावसाळ्यात’, ‘जीवनगाथा’ हे त्यांचे कवितासंग्रह. साधीसुधी, हृदयस्पर्शी भाषा. तादात्म्यता, उत्कटता, तरलता नि चिंतनशीलता हे त्यांच्या कवितेचे विषय होत. त्यांनी कथा-कादंबर्‍याही लिहिल्या आहेत. ‘चैत्रपालवी’, ‘सुखस्वप्न’, ‘मयूरपंख’, ‘मंगळसूत्र’, ‘हापूसचे आंबे’, ‘खडकचाफा’, ‘कांचनबहार’, ‘हृदयरंग’ हे त्यांचे कथासंग्रह व ‘लालन बैरागीण’ नि ‘हेही दिवस जातील’ या दोन कादंबर्‍या. स्त्री-दुःखाचा शोध हा त्यांच्या कथा-कादंबर्‍यांचा गाभा आहे. ‘अखेरचे पान’, ‘अमेरिकन कथा’, ‘अमेरिकन कथांचा अनुवाद’ हे त्यांचे अनुवादित वाङ्‌मय. ‘आईची गाणी’ व ‘बागेतील गमती’ ही बालसाहित्य निर्मिती. ‘आजचा दिवस’, ‘आतला आवाज’, ‘प्रियजन’, ‘अनुभवांती‘, ‘सय’, ‘मी माझे मला’, ‘उद्गारचिन्हे’, ‘आकाशगंगा’, ‘वडिलांच्या सेवेशी’, ‘वडिलांना आठवून’, ‘एका पावसाळ्यात’ व ‘ऋतुचित्रे’ या कवितासंग्रहांस नि ‘मी माझे मला’ व ‘वडिलांच्या सेवेशी’ या ललित लेख-संग्रहास महाराष्ट्र राज्य शासनाचे पुरस्कार लाभले आहेत. शिरीषताईंची व्यक्तिचित्रणे नि ललितलेखन म्हणजे मराठी समाजाच्या विशाल कालखंडाचा आलेख होय. त्यांचे हे लेखन मूर्तिमंत स्वरुपात वाचकांसमोर त्यांची व्यक्तिरेखा साकारते.
खिलाडी वृत्तीच्या, मवाळ स्वभावाच्या, दिलखुलास बोलणार्‍या, शालीन, प्रसन्न, हसर्‍या व्यक्तिमत्त्वाच्या शिरीषताई पाहताक्षणी कोणालाही अंकित करायच्या. मुक्या प्राण्यांवर त्यांचा जीव होता. कासव, हरणासारखे निरुपद्रवी प्राणी त्यांच्या व्हरांड्यात मुक्तपणे हिंडताना मी पाहिले आहेत. माणसांच्या त्या लोभी होत्या. त्यांच्या घरात नेहमी आल्यागेल्यांची वर्दळ असायची. त्यांचा स्नेहपरिवार म्हणजे एक विश्‍वकुटुंब होते. साहित्याची आवड असलेल्यांना वीणकाम, भरतकामात स्वारस्य नसते, परंतु शिरीषताईंना या कलांत रस होता.
शिरीषताईंचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपण. वडिलांच्या मोठेपणाचा टेंभा त्यांच्या वागण्यात नव्हता. सर्वांशी त्या मिळूनमिसळून बरोबरीने वागायच्या. म्हाळसा हे त्यांचे कुलदैवत. जायांची पूजा असो वा कोजागिरी- त्यावेळी त्या आवर्जून गोव्याला यायच्या. कविवर्य बाकीबाब बोरकर हे त्यांचे काव्यदैवत. त्यांची ‘पांयजणां’ कविता त्यांना खूप आवडायची. माझा नि शिरीषताईंचा परिचय झाला तो बाकीबाबांमुळे. या परिचयाचे रूपांतर स्नेहात कधी झाले ते कळले नाही. गोव्यात आल्यावर शिरीषताई आमच्याकडे आल्यावाचून जात नसत. मी पण मुंबईला गेले तर माझ्या कुटुंबीयांसोबत त्यांना भेटून यायची.
शिरीषताई साहित्यव्रती होत्या. साठ दशकांहून अधिक काळ त्यांनी लेखन केले. उत्कृष्ट पत्रकार म्हणून त्या सर्वज्ञात असल्या तरी साहित्यविश्‍वातील सर्व प्रांतांत त्यांनी मुलुखगिरी केली. परंतु ‘हायकूसम्राज्ञी’ ही त्यांची खरी ओळख आहे. ‘हायकू’, ‘ध्रुवा’, ‘हायकूंचे दिवस’, ‘माझे हायकू’, ‘फक्त हायकू’, ‘नवे हायकू’, ‘हेही हायकू’ हे हायकूसंग्रह याचा पुरावा आहेत. ‘हायकू’ हा जपानी भाषेतील निसर्गाशी तादात्म्य पावणारा आणि जीवनातील प्रत्येक क्षण उत्कटतेने जपणारा तरल आणि उत्कट असा काव्यप्रकार आहे. जीवनाबद्दलची ती एक सहज प्रतिक्रिया आहे. तीन ओळींचा बंदिस्त घाट आणि निसर्गप्रतिमांचा प्रतीकात्मक वापर ही हायकूंची वैशिष्ट्ये होत. जपानीमधील हा काव्यप्रकार शिरीषताईंनी मराठीत आणला व सजवला. सबब, जपान व भारत या दोन ध्रुवांवरील दोन देशांना जोडणारी ‘ध्रुवा’ असल्याचे त्यांच्या ‘ध्रुवा’ हायकूसंग्रहातून जाणवते. हायकू आणि शिरीषताईंच्या जीवनातील साम्य या काव्यप्रकारात जाणवते. आज शिरीषताई आमच्यामध्ये नसल्या तरी त्यांच्या हायकू निर्मितीचा प्रसार बराच होत आहे, होणार आहे आणि होत राहील. सरस्वतीच्या दरबारामधील हायकूंच्या वाटचालीत शिरीष नावाची ज्योत जनमानसात अखंड तेवत राहील. समारोपादाखल त्यांच्या गाजलेल्या कवितांपैकी एक भावकविता नि हायकू खाली देत आहे.
हृदय अर्पण करतात
ती माणसं निराळीच असतात
पूर असतो त्यांच्या स्वभावात
किनारा सोडतात तेव्हा नदीहून
बेफाम होतात.
कोसळतात खोल खोल तेव्हा
किती उंच जातात….

हायकू

पाणी आलें
पाणी गेलें
मी नुसती पाहत राहिलें
भरल्या कंठाने या ‘हायकूसम्राज्ञी’ला अलविदा! शिरीषताई, अलविदा!!