मर्सिडीझ कपसाठी प्रज्ञेश गुणेश्‍वरन पात्र

0
93

भारताचा डेव्हिसपटू प्रज्ञेश गुणेश्‍वरन आपल्या कारकिर्दीत प्रथमच एटीपी वर्ल्ड टूर प्रकारासाठी पात्र ठरला आहे. जर्मनीतील स्टुटगार्ट येथे सुरू असलेल्या मर्सिडीझ कप पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत त्याने क्रिस्टियन हॅरिसनला नमवून पात्रता मिळविली. डावखुर्‍या भारतीयाने ७२९,३४० युरो बक्षीस असलेल्या ग्रास कोर्टवरील स्पर्धेच्या लढतीत अमेरिकन प्रतिस्पर्ध्याला ६-३, ४-६, ६-३ असे हरविले. प्रज्ञेशला फ्रेंच ओपनमध्ये ‘लकी लुझर’म्हणून खेळण्याची नामी संधी चालून आली होती. परंतु, मुख्य स्पर्धेतील प्रवेशाच्या आशा मावळल्यामुळे त्याने इटलीतील स्पर्धेतील आपला प्रवेश नक्की केल्याने त्याची ही संधी हुकली होती. स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत प्रज्ञेशला जागतिक क्रमवारीत २३व्या स्थानावरील डेनिस शापोवालोव याच्याशी लढावे लागणार आहे.