मर्कझसाठी गेलेल्यांत एकही गोमंतकीय नाही ः मुख्यमंत्री

0
116

 

नवी दिल्ली निजामुद्दिम येथे आयोजित तबलिगी जमात धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या ४६ जणांना ताब्यात घेऊन क्वारंटाईन करण्यात आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये एकही गोमंतकीय नाही. गोवा पोलिसांची निजामुद्दिमहून आलेल्यांचा शोधमोहीम सुरू आहे. क्वारंटाईन करण्यात आलेल्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

निजामुद्दिन येथील धार्मिक कार्यक्रमातून आलेल्यांना फोंडा, मडगाव, वास्को, ओल्ड-गोवा आणि डिचोली येथून ताब्यात घेण्यात आले आहे. आणखीन कुणी लपून बसलेला असल्यास नागरिकांनी पोलिसांना माहिती द्यावी. बाहेरून आलेल्या व्यक्तींकडून राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. राज्याबाहेरून येऊन लपून बसले असतील तर त्यांची त्वरित माहिती पोलिसांना द्यावी, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

दरम्यान, तबलिगी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल फातोर्डा मडगावातून १६, वास्कोतून १३, फोंड्यातून ९, ओल्डगोवा व डिचोलीतून प्रत्येकी ४ जणांना ताब्यात घेतले.

चिकन खाऊ नये

राज्यातील नागरिकांनी चिकन खाऊ नये. बर्ड फ्ल्यूमुळे परराज्यातून चिकन आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्यात भाजी व इतर सामान घेऊन ४०३ ट्रक दाखल झाले आहेत. नागरिकांनी थंड पेय टाळावे, गरम पाणी पिण्यावर भर द्यावा. योगा, प्राणायाम करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्सफरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी विधायक सूचना केला. राज्यात कोरोनाचा फैलाव रोखणे व उपाय योजनांची माहिती देण्यात आली. लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला  नाही. शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सीमा सील करण्याची गरज आहे.

पासचा गैरवापर टाळा

सर्व धर्माच्या धर्मगुरूंनी कोरोना विषाणूबाबत जनजागृतीवर भर द्यावा. नागरिकांनी आणखी १२ दिवस संयम बाळगावा. लोकांना मदत करण्यासाठी दिलेल्या पासचा गैरवापर केल्यास आढळून आल्यास पास रद्द केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

परदेशात बोटीवर काम करणार्‍या गोमंतकीय खलाशांना आणण्याबाबत विदेश मंत्रालयाकडून प्रयत्न केला जात असल्याच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.