मराठी साहित्य पुरस्कार खंडित होऊ नयेत!

0
134

 

  • दासू शिरोडकर
    (फोंडा)

गोमंतकीय मराठी साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्याचा आदर, सन्मान कुणी करायचा? अशा साहित्यिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप कुणी मारायची? कुणी त्यांना अधिक सकस निर्मितीसाठी प्रेरणा देणारी ऊर्जा द्यायची?

पुरस्कार हे उल्लेखनीय कामगिरीबद्दल पाठीवर शाबासकीची थाप देणारी एक प्रशंसनीय अशी कृती असते. न बोलताच ती सृजनाचे एक मोठे सकारात्मक कार्य करून जात असते. ज्याच्या पाठीवर ती पडते त्याला तर ती अधिक जोमाने कार्यरत राहण्यासाठी ऊर्जा देऊन जातेच; शिवाय इतरांनाही ती आपापल्या क्षेत्रात झोकून देऊन भरीव असे काही करून दाखविण्याची प्रेरणा देऊन जाते. त्या अनुषंगाने मग त्या त्या क्षेत्रात बरेच काही सर्जनशील घडू लागते. त्यातूनच समाजाला नवीन काही मिळण्याची प्रक्रिया सुरू होते. अर्थात पुरस्कार ही अशा प्रक्रियेची जननी असते. यास्तव ही प्रक्रिया सतत सुरू राहावी म्हणून त्या त्या क्षेत्रात पुरस्कार देण्याची प्रथा सतत कार्यरत असायला हवी.

मराठीचे योगदान
गोव्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात अगदी प्राचीन काळापासून मराठी भाषेचे योगदान अनन्यसाधारण राहिले आहे. पोर्तुगिजांच्या साडे चारशे वर्षांच्या जुलुमी राजवटीत इथे हिंदू संस्कृतीचे जतन झाले ते मराठी भाषेमुळेच. हा सिद्धांत मानून आपल्या संस्कृतीला अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी स्वातंत्र्यानंतर गोव्यात सतत मराठी भाषेत साहित्य निर्मिती होत राहिली. ती सकस आणि दर्जेदार व्हावी म्हणून कला अकादमी, गोमंत विद्यानिकेतन सारख्या संस्थांनी इथे मराठी साहित्य पुरस्कार सुरू केले. नंतर स्थापन झालेल्या गोमंतक मराठी अकादमीने तर मराठी साहित्य निर्मितीचा यज्ञच सुरू केला. त्यासाठी पोषक ठरणार्‍या बर्‍याच योजना कै. शशिकांत नार्वेकरांच्या अध्यक्षीय काळापासून राबविल्या गेल्या. उदा. पाच उत्कृष्ट गोमंतकीय साहित्यकृतीचे प्रकाशन; त्यांचे गोव्यात तसेच महाराष्ट्रात वितरण; दहा साहित्यकृतींना पुस्तक प्रकाशनासाठी अनुदान. शिवाय कथा, एकांकिका, नाट्यलेखन पुरस्कारही सुरू करण्यात आले होते. त्याशिवाय गोमंतकीय मराठी साहित्यिकांच्या पाच उत्कृष्ट साहित्यकृतींना दरवर्षी पुरस्कार देण्यात येत होते.

या सार्‍या योजनांमुळे कितीतरी मराठी साहित्यकृतींची निर्मिती झाली. कित्येक साहित्यिकांना उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार मिळाले. ते लौकिकपात्र झाले. या प्रक्रियेने गोमंतकीय साहित्य महाराष्ट्रातही नावाजले गेले. परंतु गेल्या काही वर्षांतल्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर गोमंतक मराठी अकादमीचे अनुदान बंद पडले आणि त्याचबरोबर वरील सार्‍या उपयुक्त योजनाही बंद पडल्या. त्याचा फटका गोमंतकीय मराठी साहित्य निर्मितीला निश्‍चितच बसला.

गोवा सरकारचे संस्कृती खाते गोमंतकीय साहित्यकृती खरेदी करण्याची एक योजना सध्या राबविते, परंतु गोमंतकीय मराठी साहित्यकृतींना मिळणारे पुरस्कार मात्र कायमचे बंद झाले आहेत. कला अकादमीची मर्यादित स्वरुपात असलेली साहित्य पुरस्कार योजनाही हल्ली डुलक्या घ्यायला लागलीय की काय असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. यामुळे गोव्यात मुबलक प्रमाणात मराठी साहित्य निर्मिती होऊनही त्याचे म्हणावे तसे कौतुक, सन्मान होत नाही. या पार्श्‍वभूमीवर गोमंतकीय मराठी साहित्य जगतावर एक प्रकारची नैराश्याची छाया पसरल्याचे चित्र दिसत आहे.

गोवा मराठी अकादमीची जबाबदारी
सरकारी गोवा मराठी अकादमीचे कार्य तसे जोमात सुरू आहे. ते पाहता खरे म्हणजे अकादमीने वरील प्रकारच्या योजना सुरू करायला हव्या होत्या, परंतु तिथेही या बाबतीत अजून सामसूम आहे. येथे उद्धृत करण्यासारखी एक गोष्ट म्हणजे गोवा मराठी अकादमीने गेल्या वर्षी पुस्तक प्रकाशनासाठी आर्थिक सहाय्य योजना जाहीर करून त्या अंतर्गत साहित्यकृती मागविल्या होत्या. त्याला आता एक वर्ष होऊन गेले तरी त्या योजनेचा निकाल काही जाहीर झालेला नाही. या मागचे इंगित काय, तेही कळायला काही मार्ग नाही.
गोवा मराठी अकादमीकडून खरे म्हणजे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार योजना सुरू होणे अपेक्षित होते, कारण गोमंतक मराठी अकादमीनंतर गोमंतकीयांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींचा गौरव करणे हे मराठीसाठीची सरकारी संस्था म्हणून गोवा मराठी अकादमीचे कर्तव्य असायला हवे होते, पण अजूनपर्यंत तरी तसे काही घडताना दिसत नाही. मग गोमंतकीय मराठी साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्याचा आदर, सन्मान कुणी करायचा? अशा साहित्यिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप कुणी मारायची? कुणी त्यांना अधिक सकस निर्मितीसाठी प्रेरणा देणारी ऊर्जा द्यायची? असे प्रश्‍न पडणे साहजिकच आहे.

साहित्याची उपेक्षा का?
साहित्य अकादमीचे पुरस्कार हे अखिल भारतीय पातळीवरचे असतात. शिवाय तो पुरस्कार वर्षातून एकदाच एका साहित्यकृतीला मिळत असतो. मग जवळजवळ तेवढाच दर्जा असलेल्या इतर साहित्यकृतींची उपेक्षा व्हावी का? त्यांना किमान मान, आदर कुठे तरी मिळायला नको का? तो त्यांना त्या त्या सरकारने किंवा सरकारी संस्थांनी द्यायला नको का? गोव्यात अशा साहित्यकृती निर्माण झाल्या, तर त्यांचा गौरव आपल्या सरकारने वा सरकारी संस्थेने करावा, अशी अपेक्षा बाळगणे गैर आहे का? गोवा सरकारचे सांस्कृतिक खाते वा गोमंतकात मराठीच्या उत्थापनासाठी स्थापन झालेल्या गोवा मराठी अकादमीने यावर विचार करावा, असे म्हणणे गैर न ठरावे. शेवटी गोमंतकात दर्जेदार साहित्य निर्मिती होणे आणि तिची दखल घेतली जाणे हे गोव्याच्या सांस्कृतिक हिताच्या वृद्धीसाठी महत्त्वाचे आहे.