मराठी चित्रपट दिग्दर्शकांची इफ्फीवर बहिष्काराची चिन्हे

0
90

इफ्फीसाठी इंडियन पॅनोरमा विभागात निवड झालेला ‘न्यूड’ हा मराठी चित्रपट अश्‍लील ठरवून वगळण्यात आल्याने मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळी भडकली असून या महोत्सवात सादर होणार्‍या सर्व मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक या महोत्सवावर बहिष्कार घालण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सुवर्ण कमळ विजेता चित्रपट ‘कासव’च्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी इफ्फी महोत्सवातून माघार घेत ‘न्यूड’ चित्रपटाला आपला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. या व्यतिरिक्त इफ्फीत निवड झालेल्या अन्य आठ चित्रपटांचे दिग्दर्शकही महोत्सवावर बहिष्कार टाकणार असल्याचे समजते. मात्र, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर यांनी देखील ‘न्यूड’ला पाठिंबा दर्शविला असून वरील निर्णयावर जोरदार टीका केली आहे. इफ्फीवर बहिष्कार घालायचा का यावर इफ्फित निवड झालेल्या सर्व मराठी चित्रपटांचे निर्माते व दिग्दर्शक हे लवकरच बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे मापुस्कर यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, ‘मुरांबा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन वैद्य यांनी गोव्यात येऊन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निर्णयाविरोधात आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. ‘मुरांबा’ची संपूर्ण टीम गोव्यात येऊन आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सुप्रसिद्ध मराठी अभिनेते जीतेंद्र जोशी यांनीही आपण महोत्सवावर बहिष्कार घालणार असल्याचे जाहीर केले आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनीही सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी आपला चित्रपट न बघताच तो गाळण्यात आल्याचा आरोप केला आहे.