मराठीतील आगळावेगळा लेखक

0
140

– प्रभा गणोरकर, (ज्येष्ठ समीक्षक)

ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक आणि कवी भालचंद्र नेमाडे यांचा साहित्यातील सर्वोच्च पुरस्कारानं म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरव होणं ही प्रत्येक मराठी माणसाला सुखावणारी बाब आहे. यापूर्वी त्यांचा ‘जनस्थान पुरस्कारा’नंही गौरव झाला होता. यानिमित्त पुन्हा एकदा नेमाडेंच्या साहित्यिक कार्याचा गौरव झाला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते चौथे मराठी साहित्यिक ठरले आहेत. नेमाडेंनी कादंबरी, काव्य तसेच समीक्षा या क्षेत्रात विपुल लेखन केले आहे. त्यात पारंपरिक रूढी-परंपरांच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न प्रकर्षाने दिसून येतो. नेमाडेंच्या ‘कोसला’ या कादंबरीला मोठे यश लाभले. त्यात मुख्यत: मागच्या पिढीतील मध्यमवर्गीय, रूढीग्रस्त सांकेतिक मूल्ये आणि त्यातील दुहेरी मूल्यव्यवस्था नाकारणार्‍या तरूण पिढीच्या प्रतिनिधीचे चित्रण आले आहे. नंतरच्या कादंबर्‍यांमध्ये जातीव्यवस्था, महाविद्यालयीन शिक्षणाची घसरलेली पातळी यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. कादंबरीचे हे विषय निश्‍चित वेगळे होते. त्यांना मिळालेल्या प्रतिसादामागे हे ही एक कारण असू शकेल. समाजातील सर्व प्रकारच्या विसंगतींवर बोट ठेवण्याचा प्रयत्न नेमाडेंनी वेळोवेळच्या लेखनात केला. नेमाडेंची ‘कोसला’ ही कादंबरी १९६२ मधली. आताची वयस्कर पिढी त्यावेळी तरूण होती आणि प्रस्थापितांविरोधात बोलत होती. पण त्या अर्थाने त्यांना आता बंडखोर म्हणणे उचित ठरत नाही. त्याच पध्दतीने आज नेमाडेंनाही बंडखोर विचारांचे लेखक म्हणणे योग्य नाही. नेमाडेंना काही गोष्टींबद्दल आकर्षण, ममत्त्व, आस्था आहे. ‘हिंदू’ या कादंबरीत त्यांनी कृषी संस्कृतीतील जीवनाचे प्रभावी दर्शन घडवले आहे. या कादंबरीच्या पहिल्या भागात कृषीसंस्कृतीच्या जगरहाटीचे वेगळे वर्णन वाचायला मिळते. कोणत्याही विषयातील गाभा अचूक टिपणे हे नेमाडेंच्या लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य. कादंबरी असो वा कवितालेखन, त्यात स्मरणरंजन हा भाग अजिबात नसतो, ही बाबही त्यांचे वेगळेपण स्पष्ट करणारी आहे. सूक्ष्म निरिक्षण आणि निदर्शनास आलेल्या गोष्टींचे विश्‍लेषण ही नेमाडेंच्या लेखनाची आणखी वैशिष्ट्ये आहेत. आपल्या मातीशी, आपल्या मुळांशी नाळ बांधून ठेवणारा हा लेखक. नेमाडे यांचे स्वत:चे असे काही आग्रह आहेत. उदाहरणार्थ कथा हा अगदी किरटा वाङ्‌मयप्रकार आहे. नियतकालिकांनी पोसलेला वाङ्‌मयप्रकार आहे असे म्हणत त्यांनी जगातील श्रेष्ठ कथाकारांचेही अवमूल्यनच केले आहे असे मला म्हणावेसे वाटते. त्यांना कादंबरी आणि कविता हे दोन घाट आव्हान देणारे वाट़तात. भाषिक दृष्टीने या दोन्हीही रूपबंधांमध्ये नेमाडे यांची प्रयोगशिलता दिसून येते.कादंबरी हा साहित्यप्रकार मोठा अवकाश असलेला असल्यामुळे समाजचित्रण आणि कादंबरीतील वर्ण्य विषयाच्या कालाचे भान कादंबरीतून व्यक्त करता येते आणि ते कसे व्यक्त करता येत असते हे त्यांनी आपल्या कादंबर्‍यांमधून दाखवून दिले आहे.समाजाचे, जीवनरितींचे, त्यातील गुणदोषांचे विश्‍लेषण ते कलावंताच्या नजरेतून करतात.
नेमाडेंच्या ‘कोसला’ या कादंबरीला अभुतपूर्व यश मिळाले. त्या कादंबरीबद्दल गेल्या ५० वर्षांपासून बोलले वा लिहिले जात आहे. विशेष म्हणजे आजच्या पिढीलाही ती कादंबरी आपलीच वाटत आहे हे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल. याचे कारण ती वयाचे प्रतिनिधित्व करणारी कादंबरी आहे. त्यामुळे पिढ्या बदलल्या तरी त्या त्या वयातील सार्‍यांना ती आपलीच वाटते. ही कादंबरी लिहिताना आपल्याला कशाबद्दल लिहायचे आहे, त्यातून पारंपरिक चौकट कशी मोडायची आहे याचे नेमाडेंना पूर्ण भान होते. त्याच पध्दतीने त्यांनी पुढेही लेखन केले. त्यामुळे पूर्ण विचारांती लेखन करणारे लेखक म्हणूनही नेमाडेंचा उल्लेख केला पाहिजे. आपल्या वाड.मयीन निष्ठेनुसार इतर कोणत्याही वाड.मयबाह्य प्रलोभनांची वा दडपणांची दरकार न बाळगणारा हा लेखक मराठी साहित्यात आगळाच म्हणावा लागेल.
कोणत्याही पुस्तकाला वाचकांचा अङ्गाट प्रतिसाद लाभण्यामागे लेखकाचे अविरत प्रयत्न, पुरेपूर कष्ट यांचे बळ असते. नेमाडेंच्या लोकप्रिय ठरलेल्या पुस्तकांमागेही हेच कारण आहे. नेमाडेंनी कादंबरी लेखनाबरोबरच काव्यलेखनही केले आहे. कवितांमधूनही त्यांची तीच वैशिष्ट्ये जाणवतात. ‘मेलडी’ आणि ‘देखणी’ या दोन काव्यसंग्रहातून त्यांची ओळख पटते. ‘रोजच्या जगण्याचे उर्ध्वपतन होऊन निदान त्याची एक ओळ झाली पाहिजे’ असे त्यांनी प्रस्तावनेत लिहिले आहे. त्यावरून त्यांची लेखनावरची निष्ठा व्यक्त होते. अशा ज्येष्ठ लेखकाला प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार लाभल्याबद्दल मी आनंद व्यक्त करते. त्यांच्या हातून आगामी काळात असेच विपुल आणि वेगळेपणाने नटलेले लिखाण होत राहो हीच सदिच्छा.
चिकित्सक आणि डोळस लेखक
बोलीभाषेचा नेमका आणि प्रभावी वापर ही नेमाडेंच्या लेखनाची खासियत आहे. त्यामुळे वाचकांना त्यांचे लेखन अधिक जवळचे वाटते. शिवाय त्या लेखनात वास्तव अनुभवकथनाचा भागही मोठा असतो. लिखाणात सतत वैविध्य राखणार्‍या नेमाडेंनी कोकणी, हिंदीमिश्रीत उर्दु आणि वैदर्भीय बोली यातही कविता लिहिल्या आहेत. १९६० च्या सुमारास अनियतकालीकाची सुरूवात झाली. त्यात नेमाडे यांचा जवळचा संबंध होता. त्या माध्यमातून काही बंडखोर लेखकांनी प्रस्थापित साहित्यावर जोरदार हल्ले चढवले होते. ‘वाचा’ या अनियतकालिकाचे संपादक असताना नेमाडे यांनी लिहिलेला ‘हल्ली लेखकाचा लेखकराव होतो तो का?’ या शीर्षकाचा लेख बराच गाजला. अशी बंडखोरी असणार्‍या त्यांच्या लेखनात नैतिकता आणि वृत्तीगांभिर्याचा आग्रह असतो. नेमाडे यंानी कादंबरीविषयी लिहिलेला समिक्षालेखही अत्यंत वाचनीय आहे. साहित्य आणि जीवन यांच्यात ते कधीच ङ्गारकत करत नाहीत. रंजनवादी मुल्यांना कडाडून विरोध करतानाच परंपरेविषयी चिकित्सक असण्याकडे त्यांचा कल असतो. डोळसपणे पाहण्याच्या वृत्तीमुळेच ते वि. का. राजवाडे यांच्या ‘कादंबरी’ या काहीशा दुर्लक्षित समीक्षेकडे अत्यंत आग्रहाने वाचकांचे लक्ष वळवतात. ‘श्यामची आई’ या पुस्तकाकडे महत्त्वपूर्ण वास्तववादी कादंबरी या अंगाने पाहण्याची दृष्टी त्यांनीच दिली आहे. नेमाडे यांचे इंग्रजीतूनही विपुल लेखन आहे. मराठीवरील इंग्रजीचा प्रभाव, शैलीशास्री दृष्टीने अभ्यास हे त्यांचे लेखन इंग्रजीतून प्रकाशित झाले आहे. ‘साहित्याची भाषा’ (१९८७) हे त्यांचे भाषाविज्ञानविषयक तात्त्विक स्वरुपाचे पुस्तकही वाचकांना वेगळा आनंद देणारे आहे. समीक्षेच्या क्षेत्रातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. अरूण कोल्हटकर यांच्या ‘इराणी’ या कवितेचे नेमाडे यांनी शैलीशास्राच्या दृष्टीने केलेले विवेचन वैशिष्ट्यपूर्ण आहे. नेमाडेंची मराठी भाषा समृद्ध होण्याविषयीची तळमळ लेखनातून सतत व्यक्त होते.