मये तळ्यावर गोव्यातील पहिले ‘बंजी जंपिंग’

0
104

>> मुख्यमंत्र्यांहस्ते मंगळवारी २७ रोजी उद्घाटन

गोव्यातील पहिल्या बंजी जंपिंग स्थळ उत्तर गोव्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ मये तळे येथे सुरू करण्यात येणार आहे. येत्या २७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या साहसी पर्यटन सेवेचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती काल पर्यटन खात्यातील सूत्रांनी दिली.

मयें तळे येथील बंजी जंपिंग स्थळावर तब्बल ५५ मीटर एवढ्या उंचीवरून उडी मारण्याची सोय उपलब्ध असेल. बंजी जंपिंग म्हणजे पायाला दोरी बांधून घेऊन उंचावरून उडी घेणे असा थरारक प्रकार. नंतर त्या दोरखंडाच्या सहाय्यानेच सदर व्यक्तीला वर काढण्यात येत असते. ‘जंपिग हाईट्‌स, धी बंजी पीपल’ ही कंपनी बंजी जंपिंगची जबाबदारी सांभाळणार आहे. सदर कंपनी २००६ सालापासून ऋषिकेश येथे बंजी जंपिंगची जबाबदारी सांभाळत आहे. तेथे आतापर्यंत ७० हजार पर्यटकांनी बंजी जंपिंगचा आनंद लुटला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

माजी लष्कर अधिकारी ही कंपनी चालवत असून त्यांच्याकडे पूर्णपणे प्रशिक्षित असे जंप मास्टर्स आहेत. न्यूझिलॅण्डमधील तज्ज्ञांचीही ते मदत घे असतात. जून महिना ते ऑगस्ट मध्यापर्यंत बंजी जंपिंग बंद ठेवण्यात येणार असून नंतर वर्षभर ते चालू राहणार आहे.

२७ रोजी संध्याकाळी ५ वाजता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते बंजी जंपिंग स्थळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी पर्यटनमंत्री बाबू आजगावकर, पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे, मयेंचे आमदार प्रवीण झांट्ये, पर्यटन सचिव अशोक कुमार, झेडपी सदस्य शंकर चोडणकर, पर्यटन संचालक संजीव गडकर व गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई आदी उपस्थित असतील.

पर्यटकांसाठी पुढील
वर्षापासून हेलिकॉप्टरसेवा
पर्यटकांसाठी पुढील वर्षापासून हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचा पर्यटन खाते विचार करीत असल्याचे काल खात्यातील सूत्रांनी सांगितले. यापूर्वी राज्यात हेलिकॉप्टर सेवा सुरु केली होती. मात्र, कालांतराने ही सेवा बंद पडली होती. आता ती पुन्हा सुरू करण्याबाबत खात्यात हालचाली सुरू झाल्या आहेत. हेलिकॉप्टर सेवा ही साहसी पर्यटनाचा एक भाग असून विदेशी पर्यटकांबरोबरच देशी पर्यटकांकडूनही ह्या सेवेला चांगली मागणी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

साहसी पर्यटनाला चालना : पर्यटनमंत्री
बंजी जंपिंगमुळे गोव्यातील साहसी पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले. यासंबंधी पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्यात आतापर्यंत बंजी जंपिंगसाठीचे स्थळ नव्हते. सरकारने आता ते स्थळ उपलब्ध करून दिलेले असून २७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते या स्थळाचा शुभारंभ होत आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी पर्यटक दरवर्षी येत असतात. विदेशी पर्यटकांना खास करून साहसी पर्यटनाबाबत ओढ व आकर्षण निर्माण होऊ लागलेले आहे. बंजी जंपिंगला असलेली मागणी व देशातल्या अन्य भागात त्याला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊनच पर्यटन खात्याने राज्यात बंजी जंपिंगची सोय करण्याचा निर्णय घेतल्याचे आजगावकर यांनी सांगितले.