मयेतील ६२ जणांना तात्पुरत्या मालकी सनदी

0
106

>> २०२ अर्जांवर प्रक्रिया चालू

 

पोर्तुगीज राजवट व त्यानंतरचा ५५ वर्षांच्या मुक्तीनंतरचा काळ मिळून तब्बल ५०६ वर्षांनी काल मयेतील ६२ जणांना तात्पुरत्या स्वरुपाचा मालकी हक्क देणार्‍या सनदींचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. वरील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानेच तात्पुरता मालकी हक्क दिल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
एकूण २०२ अर्जांवरील प्रक्रिया चालू आहे. एकूण ११२७ अर्ज आहेत. विधानसभेत कायदे करण्यापूर्वी त्याचा अभ्यास करण्याची गरज असते, यापूर्वी मयेवासीयांच्या प्रश्‍नावर गंभीरपणे कोणीही विचार केला नाही, असे पर्रीकर म्हणाले. आंतोन गावकर नामक व्यक्तीने आपली बाजू ऐकून घ्यावी म्हणून न्यायालयात अर्ज केलेला आहे. त्यामुळे न्यायालयानेही हा विषय लवकर निकालात काढावा म्हणून प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वरील निवाडा जाहीर होईपर्यंत कायम मालकी देणार्‍या सनदी देणे अडचणीचे आहे. त्यामुळेच तात्पुरत्या सनदी दिल्याचे ते म्हणाले. निवृत्त अधिकार्‍यांचा वापर करून सनदी देण्याच्या कामाला गती देण्याची गरज पर्रीकर यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनीही आपल्या भाषणात मयेवासीय खर्‍या अर्थाने मुक्तीच्या ५५ वर्षानंतर मुक्त झाल्याचे सांगितले. सभापती अनंत शेट यांचेही भाषण झाले. त्यांनी सरकारचे आभार मानले.