‘मन की बात’

0
143
  • माधुरी रं.शेट उसगावकर (फोंडा)

आषाढातील पावसाचा महिमा तो काय वर्णावा? आपण आता मोठे झालो तरी पावसातील हौस विसरायची नाही. फेसबुक, व्हॉट्‌सऍपच्या अधीन झालेल्या मुलांना पावसात भिजवू. मुलांसंगे आपण ओलेचिंब होऊ.

दिवसेंदिवस वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध होत होत्या… रणरणत्या उन्हात जिवाची लाही लाही, अति उष्णतेचे बळी, कडकडीत उष्म्याचे चटके… इतर राज्यातील बातम्या वाचताना गोवेकरांचा गोवा अपवाद कसा ठरेल?
इतकी वर्षे आपण गोव्यातील हवामानाविषयी स्तुती सुमने उधळीत होतो. पण आता गोवा ही तापू लागला. उन्हाच्या काहिलीतून गोव्यातील तापमान चाळीशी ओलांडण्याच्या मार्गावर झुकू लागले. जागतिक तापमान वरचेवर वाढत असताना आपला गोवा कसला वगळला जातो? उष्णतेच्या लाटेत समर्पित, याचा प्रत्यय येऊ लागला. उष्ण कटिबंधात असलेल्या प्रदेशाप्रमाणेच गोव्यातीलही उष्णतेचा पारा वाढत असल्याचे जाणवत होते. आतापर्यंतच्या विक्रमी स्तरावर या राज्यातील उष्मा वाढला. वरून वातावरणात जीव होरपळून जात होता. ‘कधी येशील तू पर्जन्यराजा….’ अशी विनवणी करण्यापलीकडे तरी काय होतं आपल्या हातात? (अर्थात उष्णता वाढीची आणि पावसाच्या र्‍हासाची कारणे अलाहिदा!) आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले तरी उमग ती कशी येणार? वातावरणातील संतुलन बिघडण्यास कोण जबाबदार? गांभिर्याने विचार करण्यास लावणारा प्रश्‍न. विचारच नव्हे तर त्वरित कृती करण्यासाठी ठोस उपाययोजनेची आवश्यकता आहे.

रखरखत्या मनःस्थितीत आकाश ढगांनी काळेकुट्ट व्हावे आणि अचानक पावसाच्या सरी बरसाव्या, जसे काही विलंबित पावसामुळे तृषार्त मनाला लाभलेली संजीवनी. आणि हो, सुहृदांनो! तसंच घडलं ना! पावसाने आपले पहिले वहिले रूप रंग दाखवले. पावसाच्या बरसण्याने वातावरण पालटले… ताजेतवाने झाले. मृद्गंधाला रसिक मिळाला. मृद्गंधाने मनाच्या कुपीतील स्मृती उचंबळून आल्या. पाऊस सारखा धो धो बरसू लागला. अशा मुसळधार पावसात कविमनाच्या उदात्त काव्यप्रतिभेला पंख फुटले नाहीत तरच नवल! कविवर्य बा.भ. बोरकर यांना बहुदा अशा पावसाच्या धुंदीच ‘सरींवर सरी आल्या गं, सचैल गोपी न्हाल्या गं’ ही कविता कल्पना सुचली असावी.
पावसाचा नूरच न्यारा होता. नकळत ओठावर स्वर उमटले, ‘धोय धोय पाऊस पडतोय रे, माझ्या मनीचा मोर कसा नाचतो.’
सलग चार दिवस धुवॉंधार पाऊस कोसळला. जोरदार पावसाने सलामी दिली. ‘घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा’ या पाऊस गाण्याची तीव्रतेने आठवण झाली. निसर्ग विविध रूपाने व्यक्त होत असतो याचे मूर्तीमंत उदाहरण.
धुवॉंधार पावसाने जनजीवन विस्कळित, दक्षिण गोव्यात पावसाचा कहर, राजधानीत पाणीच पाणी, जोरदार पावसामुळे राज्यात जलमय स्थिती… पर्जन्यवृष्टीच्या विविध बातम्यांनी वर्तमानपत्रातील रकाने भरले.

पाऊस, हवाहवासा, पण कसा? सृष्टीचे सौंदर्य सुजलाम, सुफलाम करण्यासारखा. जीवनात अमृतगोडी निर्माण करणारा.
अहो, आपण सीमेंट कॉंक्रिटचे बनत आहोत. आपली मातीशी नाळ तुटलेली आहे आणि आहे आम्हाला पावसाची हौस! ‘ऋतू हिरवा, ऋतू बरवा’ हे भावगीत हिरव्या निसर्गाकडे पाहून गुणगुणावेसे वाटते. आगामी काही वर्षांनी ‘ऋतु हिरवा झाला तर…’ असा प्रश्‍न निर्माण होईल. कारण पाऊस आता पहिल्यासारखा राहिला नाही.
तो जमाना वेगळा, हा जमाना वेगळा आणि तसा आहेच कुठे पाऊस? पाऊस झाला लहरी, मनमानी. त्यावेळी पाऊस पडणे मोठे अजब नव्हते. तो योग्य वेळी नेमेचि दाखल व्हायचा. पावसात भिजणे, चिखलात रोवून पाय चिखल तुडवायचो. मातीचा गोड स्पर्श अनुभवायचो. कागदी होड्या पाण्यात सोडून मौजमजेत दंग होत असू. सर्दीपडशाची तमा नसायची. दुपारी आईचा डोळा चुकवून विटी दांडू, सागरगोट्यांनी मनमुराद खेळायचो.

एकदा तर माझ्या बालमैत्रीणीची खेळता खेळता विटी शेजारच्या कुंपणात पडली. ती कुंपणावर चढून विटी आणण्याच्या प्रयत्नात असताना तिथला कुत्रा मोठमोठ्याने भुंकू लागला. तरीदेखील त्याच्या भुंकण्याला न जुमानता ती विटी घेऊन आलीच. पावसाशी आमचे नाते गमती जमतीचे असायचे. सहज जुळायचे. हे अनुभव खर्‍या अर्थाने बालपण संपन्न करतात.

यंदा पाऊसराव आले ते हुलकावणी देतच आले. पण बरसले ते ऐटीतच मल्हाराचा साज घेऊन. गर्मीच्या वातावरणात शीतल सरींच्या बरसातीने उष्णतेची दाहकता शोषून घेतली जात होती. काळ्या कुट्ट ढगांनी आकाश पुन्हा भरून आले. पावसाच्या संतत धारेत आसमंत ओलाचिंब झाला. आक्रसलेली धरती आळस झटकून तजेला धरू लागली. गटाराला येऊ लागला पूर आणि बेडूक धरू लागले सूर. पाऊसरावांनी प्रारंभी जरी खाल्ला भाव तरी बरसले तदनंतर जोमात. सृष्टी झाली हिरवीगार, वृष्टीने वसुंधरा झाली गारेगार.
पावसाच्या आगमनाने धरतीमातेचा रुसवा क्षणात लोप पावला. नभी इंद्रधनुष्य खुलले. मोर नाचू लागले मनोमनी. पाऊस आला कस्तुरी देऊन गेला. रंगांची उधळण करून गेला. सृष्टीला साजेसे हिरवे हिरवे रूप गवसले.

सिमेंट कॉंक्रिटच्या युगात मनाने मनाला कल्पकतेने उमग देणे हेच खरे. आजच्या बेगडी युगात असलीनकलीच्या हिकमती साधण्यापेक्षा पावसाची ‘मन की बात’ काय आहे हे पाऊसच जाणे. पावसाची चाहूल मनात उत्साह फुलवून जाते. सणांच्या मांदियाळीची आठवण करून देते. हे पावसाळी रूप असेच निसर्ग संतुलित ठेवणारे असावे. नाहीतर कसा काय लागावा आमचा निभाव? या समस्येला खतपाणी न मिळो!
पावसाने राज्याच्या अनेक भागात सध्या उसंत घेतली. काही ठिकाणी तुरळक पाऊस पडतो. हवामानाच्या अंदाजाप्रमाणे जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाते.
आषाढस्य प्रथम दिवसे… कवी कुलगुरू कालिदासांनी ‘मेघदूत’मध्ये अप्रतिम वर्णन केले आहे, हे बहुज्ञात आहे. जणू देववाणी. निसर्गाच्या गहिर्‍या चित्राचा साक्षात सौंदर्यानुभवाचा आविष्कार दिसून येतो. अद्वैत सौंदर्याचा साक्षात्कार होतो.
आषाढातील पावसाचा महिमा तो काय वर्णावा? आपण आता मोठे झालो तरी पावसातील हौस विसरायची नाही. फेसबुक, व्हॉट्‌सऍपच्या अधीन झालेल्या मुलांना पावसात भिजवू. मुलांसंगे आपण ओलेचिंब होऊ. लहान होऊन एकमेकांना भिजवू. पावसाची गाणी गाऊ. निसर्गातील चैतन्याचा मोकळ्या मनाने मनसोक्त आस्वाद घेऊ. बालपणाच्या मधुर स्मृतिगंधात रमू. आयुष्यातील सर्वांत सुंदर बालपणाचा आनंद मनमुराद अनुभवू. असा हा….
मनभावन रिमझिम पाऊस
घेऊन येतो उत्साह नि उल्हास
रंगांची करून जातो उधळण
ग्रीष्मऋतुची परी, करी बोळवण
नवीन हिरवी पालवी
मन माझे मोहवी
परंतु पावसा, आता नको देऊस चकवा!!