मनोर्‍यांचा संघर्ष

0
101

मोबाईल टॉवरवरून सध्या दक्षिण गोव्यात संग्राम सुरू आहे. सरकार येणार्‍या ‘ब्रिक्स’ परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर लवकरात लवकर जास्तीत जास्त मनोरे उभारण्यास उतावीळ आहे, तर स्थानिक नागरिक पंचायत व ग्रामसभांच्या माध्यमातून या मनोर्‍यांना कडाडून विरोध करीत आहेत. मोबाईल मनोर्‍यांतून होणार्‍या उत्सर्जनामुळे कर्करोग होतो अशी भीती जनतेच्या मनामध्ये असल्याने हा विरोध होत आहे, परंतु खरोखर अशा प्रकारचे घातक उत्सर्जन होते का, त्याचे प्रमाण काय असते, त्याचे मानवी वस्तीवर किती परिणाम होतात, याबाबतची वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा आणि घेण्याचा प्रयत्न क्वचितच होतो. अशा उत्सर्जनाबाबतच्या उलटसुलट बातम्या संशोधनाच्या नावाखाली आजवर पसरवल्या गेल्या असल्याने नागरिक साशंक असणे साहजिक आहे. केवळ गोव्यातच असा विरोध होत आहे असे नव्हे, तर मुंबईसारख्या महानगरांमध्येही उंच इमारतींमधील रहिवाशांनीही यासंदर्भात वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. नागरिकांच्या शंकांचे योग्य निरसन करून आणि खरोखरच अशा उत्सर्जनाचा कोणताही दुष्परिणाम आम जनतेवर होणार नाही याची पूर्ण खातरजमा करून मनोर्‍यांची उभारणी होणे आवश्यक आहे. पण हल्ली होते आहे असे की, ज्या खासगी टेलिकॉम कंपन्यांना असे मनोरे उभारून आपला सेवाविस्तार करायचा असतो, त्या सरळसरळ स्थानिक राजकारण्याची मदत घेऊ लागल्या आहेत. साहजिकच मनोर्‍यांची उभारणी हादेखील राजकीय मुद्दा बनू लागला आहे आणि त्यातून संघर्ष उफाळतो आहे. मुळात दक्षिण गोव्यात असे आग लागल्यागत मनोरे उभारण्याची पाळी का ओढवली याचा विचार करण्याची जरूरी आहे. ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी चांगली दूरसंचार जोडणी आवश्यक आहे हे बरोबर आहे, परंतु आम जनतेलाही अशा प्रकारची गुणवत्तापूर्ण सेवा मिळावी या दृष्टीने आजवर प्रयत्न का झाले नाहीत? आज हे जे युद्ध पातळीवर मनोरे उभारणीचे काम रेटले जात आहे, विशेषतः दक्षिण गोव्यात, जिथे लाखो पर्यटक दरवर्षी लोटतात, तेथे सुयोग्य संपर्क यंत्रणा उभारणे आवश्यक होते, परंतु किनारपट्टीमध्ये आजवर ती प्रस्थापित करता का आली नाही? परिणामी, आग लागताच विहीर खोदायला घ्यावी त्याप्रमाणे पंचायतींना या मनोर्‍यांना मान्यता देण्यास निर्वाणीची मुदत देण्याची पाळी आज ओढवली आहे. जग प्रगत होत चालले आहे, तसतसे नवनवे तंत्रज्ञान येणे अपरिहार्य आहे. भ्रामक कल्पनांना बळी पडणे म्हणजे आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे. पूर्वीच्या काळी भारतीयांनी समुद्र ओलांडणे निषिद्ध मानले, पण पाश्‍चात्त्य देशांतील दर्यावर्दींनी जग पादाक्रांत केले. छपाईचे तंत्रज्ञान अवतरले, तेव्हा काही लोक शाईत गाईची चरबी असते या समजुतीने छापील पुस्तकांना हात लावायला तयार नसत. छायाचित्रणाची कला आली तेव्हाही आपल्याकडील जुनी माणसे स्वतःचा फोटो काढू द्यायला तयार नसायची. परिणामी आजही आपल्या कुटुंबांमध्ये जुन्या पिढीची छायाचित्रे क्वचितच आढळतात. कुठलेही तंत्रज्ञान बर्‍यावाईट गोष्टी घेऊन येत असते. त्याच्या वापराबाबत तारतम्य बाळगणे हे शेवटी आपल्या हाती असते. कर्करोगास कारणीभूत होणार्‍या अनेक गोष्टी आपल्या नित्य जीवनात संपर्कात येत असतात. घातक रसायने मिसळलेली फळे, मिठाई, भाज्या यांचा माराच आपल्यावर होत असतो. याच आठवड्यात मडगावात लाल रंगात बुडवलेले बोंबील पकडले गेले. म्हणजे अशा घातक गोष्टी अवतीभवती असतात. गरज असते ती त्यावर कडक नियंत्रण ठेवण्याची. मोबाईल मनोरे उभारतानाही सुरक्षिततेची काटेकोर काळजी घेतली गेली, प्रति चौरस मीटर उत्सर्जनाची पातळी व्यवस्थित सांभाळली गेली, तर त्याचा मानवी जीवनावर घातक परिणाम होणार नाही आणि विरोधही होणार नाही!