मनाचं मोकळं आकाश…

0
432

– श्रेयस सू. गावडे, मडगाव

‘‘फिटे अंधाराचे जाळे…. झाले मोकळे आकाश…
दरी खोर्‍यातून वाहे… एक प्रकाश प्रकाश….!’’
सुधीर मोघे यांनी लिहिलेलं अन् सुधीर फडके यांनी गायिलेलं हे गीत ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं एक चित्र…
पावसाळा सुरू आहे… आकाश ढगांनी गच्च भरलंय… सूर्य दिसेनासा झालाय… पण सूर्य दिसेनासा झाला तरी ढगांच्या कडा अन् त्यावरची चंदेरी झालर (सिल्व्हर बॉर्डर) आपल्याला प्रकाशाच्या अस्तित्वाची आशा देतायत्. इतक्यात जोराचा वारा येतो… ढग बाजूला सरतात… अन्… सगळीकडे प्रकाशच प्रकाश… मन खूप प्रसन्न होतं… कवीला काय बरं सांगायचं असेल या दृश्यातून..? मोकळं आकाश कशाचं..? निसर्गाचं..? की मनाचं..?
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची ‘मन’ ही कविता सर्वांनाच पाठ असेल. ‘मन वढाय वढाय…’ या कवितेत त्यांनी मनाला अनेक उपमा दिल्या आहेत… ‘‘मन पिकातलं ढोर, मन लहरी लहरी.. त्याले हाती धरे कोन?… मन चपय चपय, त्याले नाही जरा धीर..! मन एवढं एवढं.. जसा खसखशीचा दाना… मन केवढं केवढं आकाशात भी मावेना..!’’ किती योग्य आहेत ना या सर्व उपमा!! मन म्हणजे जागेपणी देवाला पडलेलं स्वप्नंच असलं पाहिजे!मन कुठे असतं? कसं दिसतं? या प्रश्‍नांची उत्तरं आजपर्यंत मिळालेली नाहीत. मनाचं अस्तित्व आहेही अन् नाहीही! मुलांना विचारलं, तुझं मन कुठे आहे, तर काही मुलं हृदयाकडे बोट दाखवतात, तर काही डोक्याकडे! हृदयात कुठे बरं असेल मन! अन् डोक्यात म्हणजे मेंदूतही सापडलं नाही बुवा मनाचं घर! पण मन कुठेही असो, कसंही असो, काहीही असो… मन असलं पाहिजे मुक्त आकाशात भरारी मारणार्‍या हवाई छत्रीसारखं (पॅराशूट)… कधी गगनात आनंद लुटणारं तर कधी जमिनीवर खाली उतरताना अलगद पडणार्‍या एका मोराच्या कोवळ्या पिसासारखं! म्हणून चिनी भाषेत एक म्हण आहे…
‘‘हवाई छत्रीसारखं मन असतं, जी उघडल्याशिवाय काम करू शकत नाही!’’
खरंच! मुक्त, मोकळं (ओपन माइंड) असल्याशिवाय मन मनंच होऊ शकत नाही. नाहीतर ते फक्त सकारात्मक-नकारात्मक विचारांचं, विशेषतः नकारात्मक विचारांचं घरटं होऊन राहतं.
मोकळं मन असलेल्या माणसाची कृती भावनाप्रधान जरी नसली तरी विचार अन् विवेकप्रधान असते. तो माणूस आपल्या जीवनात घडणारे बदल, कधी सुख तर कधी दुःख, नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून अन् एक आव्हान म्हणून स्वीकारत असतो, तो माणूस स्वतःशी कायम प्रामाणिक असतो म्हणून साहजिकच सर्वांशी प्रामाणिक राहतो. फक्त स्वतःसाठी जगणार्‍यांची रासच आहे या जगात! पण मोकळ्या मनाचा माणूस कायम दुसर्‍यांचा, आपल्या प्रिय व्यक्तींचा विचार पहिल्यांदा करत असतो. तो कायम दुसर्‍यांसाठी जगतो. अन् जो दुसर्‍यांसाठी जगतो, तोच खरा जिवंत असतो. आपल्या देशात अन् जगात अनेक महान व्यक्ती होऊन गेल्या. त्यांच्या जीवनाचा विचार केला, तर ते कायम दुसर्‍यांसाठीच जगत होते, असे दिसून येते. अन् अशीच माणसं ‘‘मरावे परी कीर्तीरूपे उरावे’’ ही ओवी खरी करत असतात. अशा व्यक्तींना अनेकजण मूर्ख, बावळट समजतात, पण तीच खर्‍या अर्थाने शहाणी असतात.
आपल्या जीवनाचा विचार केला तर ते इतकं वणवणीचं, रखरखीचं अन् दगदगीचं झालंय की आपलं मन कायम विचारांनी गच्च भरलेलं असतं. पण कधी आपण सुट्टीत फिरायला जातो, तेव्हा इतके रिलॅक्स असतो, त्यालाच मोकळं मन म्हणतात. केरळमध्ये जर कोणी गेला, तर तिथला समुद्रकिनारा पाहून मन कित्ती आनंदी होतं! मन मुक्तपणे त्याचा आनंद लुटतं. अहो, पण तेच समुद्रकिनारे आपल्या गोव्यातही आहेत. गोव्यातील समुद्रकिनारे पाहून तितकं रिलॅक्स का वाटत नाही? तसेच केरळची व्यक्ती गोव्यात आली तर त्यालाही इथले समुद्रकिनारे पाहून तसंच वाटतं, हो ना? म्हणून हे धकाधकीचं जीवन सुरूच राहणार, मोकळ्या मनासाठी दिलेली स्पेस थोडी वाढवायचा प्रयत्न तरी करुया, यात आपलाच फायदा आहे.
भूतकाळाच्या आठवणी अन् भविष्यकाळाच्या चिंता या विचारांच्या कात्रीत आपण आपलं मन कातरत असतो. जो अखंड वर्तमानकाळात जगतो त्याचं मन मोकळं असतं. जो विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो, त्याचं मन कायम अन् विशेषतः परीक्षेच्या वेळी मोकळं राहतं. आपल्याला ऐकायला कटू वाटेल पण हे एक आजच्या काळाचं सत्य आहे की आपण सगळेच मनोरुग्ण बनलोय. छोट्या छोट्या गोष्टींसाठी मनाचा तोल जाणे, दुसर्‍यांचा हेवा वाटणे, ईर्ष्या वाटणे, सुडाची भावना असणे ही सगळी मनाच्या रोगाची लक्षणं नाहीत तर काय? या स्पर्धात्मक जगात जर खरीच स्पर्धा करायची असेल तर ती स्वतःशी करुया, स्वतःचं मन जिंकण्याची करुया, कारण ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्यानेच जग जिंकलं!
एका पुस्तकात लिहिलेलं वाक्य आहे, ‘‘होवो मोकळे आकाश’’. ही एक प्रार्थना आहे, सुरुवात आहे… तर ‘‘मनाचं मोकळं आकाश करीन’’- ही एक प्रतिज्ञा आहे, मुक्काम आहे.
या मोकळ्या आकाशात सूर्योदय-सूर्यास्त होतच राहणार; उन्हाळा-पावसाळाही येत राहणार अन् त्यात सप्तरंगी इंद्रधनूही असणार… त्या इंद्रधनूचा तुरा खोवून मनाचं आकाश सुंदर-मुक्त-मोकळं करण्याची करुया ना सुरुवात!!