मनपाखरू सुंदर आकाश… सुंदर प्रकाश

0
154

– राधा भावे

गोव्याच्या सौंदर्याविषयी व येथील आगळ्या संस्कृतीविषयी कुणी उफाळत्या उत्साहाने बोलू लागले की मी शांतपणे, निर्मम भावाने, परंतु हसून पाहते. ‘काही बोलायचे आहे पण बोलणार नाही’ ही ठाम भूमिका घेऊन.

ठाण्याच्या रेल्वेस्टेशनवर उभी होते. संध्याकाळची वेळ… माणसांनी भरून वाहणारे प्लॅटफोर्मस्… धावणार्‍या लोकल्स, चढणार्‍या-उतरणार्‍या, वाट पाहाणार्‍या प्रत्येक माणसाचा चेहरा त्रस्त, कंटाळलेला… दिवसभराचा शीण आणि थकवा मनात, शरीरात वागवत घरी परतणारी ही माणसं पाहताना वाटलं, एका प्रचंड ‘जायंटव्हील’वर गरगरतायत सर्वजण. माझा जीव दडपून गेला. मी तिथलं काम आटोपून त्याच रात्री निघणार होते. ट्रेनमध्ये बसले की बारा-तेरा तासांत मी माझ्या ओळखीच्या, सवयीच्या जगात परतणार होते. नुसत्या या विचारानेही हायसं वाटलं.
मी ज्यांच्या घरी उतरले होते, त्यांनी गोव्याच्या सौंदर्याचं भरभरून वर्णन करत, तो आपला खूप आवडीचा प्रदेश असल्याचं पुन्हा पुन्हा सांगितलं होतं. तिथं ज्या लोकांशी नव्याने ओळख झाली, त्या प्रत्येकानं गोव्यात राहते म्हणून मी खूप भाग्यवान असल्याचं बोलून दाखवलं होतं. अर्थात मलाही ते मान्य होतं. इथल्या गर्दीच्या, धकाधकीच्या, वेगवान आयुष्याच्या तुलनेत गोव्यातलं जगणं कितीतरी शांत, निवांत, आरामदायी आहे हे खरंच आहे.

परंतु सगळं सौंदर्य गोव्यातच एकवटलंय आणि आम्ही काही भाग्यवान मंडळी त्यावर कब्जा करून बसलोय असा काहीसा असूयेचा सूर अनेकदा काहींच्या बोलण्यात आढळतो तेव्हा गंमत वाटते. खरं तर त्या-त्या प्रदेशाच्या अनेक अंतर्गत समस्या असतात. त्या समस्यांशी तिथल्या रहिवाशांना झगडावं लागतं. अनेक गोष्टींबाबत नाखुषी असते. गोव्यासारख्या आर्थिकबाबतीत पर्यटन व्यवसायावर मदार असलेल्या राज्यात तर ‘असणं’ आणि ‘दिसणं’ या दोन्हीत ‘दिसण्याला’ जास्त महत्त्व दिलं जातं. दे ‘देखावे’ खास बाहेरून येणार्‍या लोकांसाठी तयार केले जातात. ठराविक गोष्टींचा प्रचार आणि प्रसार केला जातो. ज्यांच्यासाठी हा आटापिटा असतो ते भारावून जातात. या दिखाव्यासाठी जे कष्ट घेतात ते कृतकृत्य होतात. -एक वर्तुळ पूर्ण होतं.
आणि गंमत म्हणजे, जो गोवा बाहेरून येणारे लोक पाहतात, त्याच्याशी गोव्यातल्याच काही लोकांना परिचय नसतो. गोव्यात येऊन गेलेले बरेचदा समुद्रकिनार्‍यांविषयी, तिथल्या हॉटेल्सविषयी बोलतात. नौकाविहार, मत्स्याहार, चर्चेस, ठराविक देवळे, इथलं पाश्‍चात्त्य संगीत, मद्याची मुबलकता याची वाखाणणी करतात. खाजगी बसवाल्यांचे भलेबुरे अनुभव, टॅक्सी, रिक्षावाले करत असलेली पिळवणूक पोटतिडकीने सांगतात. इथले कॅसिनो, खाण व्यवसाय, इथलं राजकारण याविषयी सर्वज्ञाच्या आविर्भावात शेरेबाजी करतात. तेव्हा गोव्यात राहूनही, आपले या प्रदेशाविषयीचे अज्ञान, आणि त्यानी पाहिलेल्या गोव्यापल्याड अस्तित्वात असलेल्या गोव्याविषयी त्याना नसलेले ज्ञान पाहून- दोन अज्ञानी लोकांची ही भेट, बोलणं अन् चर्चा गमतीदार वाटते.

सौंदर्याची खाण मानला गेलेल्या गोव्याची हळूहळू होत चाललेली ‘धुळधाण’ तशी कुणाला सांगण्यात अर्थ नसतो. एखाद्या गोष्टीविषयीची आपली भावनिक बांधिलकी आपल्याला आंधळ्या प्रेमात बुडवून टाकते. आपली अस्मिता वगैरे जागी होऊन, जे जे चांगले आहे, त्याचाच उच्चार करायला भाग पाडते. त्यामुळे गोव्याविषयी समोरचा माणूस चांगलं बोलतो तेव्हा आपण ‘हो’ला ‘हो’ मिळवत जातो. जेव्हा तो विरोधात काही बोलू लागतो, तेव्हा आपण घाईघाईनं प्रतिवाद करतो. कधी नकळत, कधी जाणीवपूर्वक! अशावेळी मनात ‘गोवा माझा मंगलमंत्र जणू सौंदर्याची खाण…’ ही धून वाजत असते.

त्रयस्थपणे विचार केला तर आपण आपल्या भवतालाबाबत किती अनभिज्ञ आहोत हे जाणवते. अनेक गोड गैरसमज आणि भ्रम आपल्या मनाला व्यापून असल्याचे कळते. आपण आपलं घर, घराणं, गाव, प्रदेश या सर्वांविषयीचा दुराभिमान, आपल्या त्या-त्या गोष्टीबाबतच्या प्रेमात मिसळून गेलेलो असतो. त्यातच कुणी आपली खरी/खोटी भलावण करणारं भेटलं तर ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुनमास’ अशी आपली अवस्था होते.

मी हल्ली गोव्याबाहेर जाते तेव्हा या अशा चक्रव्यूहात न सापडण्याचा निर्धार करूनच निघते. कारण जे आहे, जसं आहे ते मांडतानाच, जे नकोसं आहे, जे चुकीचं आहे ते बदलवण्याच्या दृष्टीने आपण काहीही करत नसतो याची अपराधी जाणीव मनाला अस्वस्थ करत असते. एखाद्या गोष्टीवर फक्त बोलत राहाणं, चर्चा करणं, वाद घालणं, यातून कदाचित आपली भावनिक, वैचारिक भूक भागत असेल; परंतु कोणत्याही निष्कर्षाप्रत न पोचणं, अन् समजा चुकून पोचलोच तर त्याला कुठल्याही कृतीची जोड न देता वार्‍यावर सोडून देणं हेच आपल्या अंगवळणी पडलेलं आहे. त्यामुळे क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे किंवा वांझोटा कळवळा निरर्थक असतो एवढे तरी माझ्या मनावर बिंबवण्यात मी यशस्वी झाले आहे. त्यामुळे गोव्याच्या सौंदर्याविषयी व येथील आगळ्या संस्कृतीविषयी कुणी उफाळत्या उत्साहाने बोलू लागले की मी शांतपणे, निर्मम भावाने, परंतु हसून पाहते. ‘काही बोलायचे आहे पण बोलणार नाही’ ही ठाम भूमिका घेऊन.
परंतु ठाण्याच्या वास्तव्यात एका महिलेने वेगळाच प्रश्‍न केला. ‘तुमच्याबरोबर फिरून पाहिलं तर नेहमीपेक्षा वेगळा गोवा पाहता येईल का हो?’ मला का कोण जाणे, या प्रश्‍नाचे अप्रूप वाटले. पर्यटकांना दाखवलं जातं त्यापेक्षा वेगळं काही गोव्यात असू शकतं याची जाणीव त्या प्रश्‍नात दडलेली होती, तीच फार लोभस वाटली.

मग मला गोव्यातील प्रशस्त किनारे, भव्य चर्चेस, देखणी देवळे आठवण्याआधी हिरवीगार शेते, त्या पल्ल्याडचे गर्द झाडीने भरलेले डोंगर, झुळझुळते झरे, मोकळा वारा, वाहत्या नद्या, शेताच्या बांधावरचे माड, घनदाट पोफळीने भरलेली कुळागरे, आंब्या-फणसाची झाडे, डोंगर चढावावरच्या काजूच्या बागा, कौलारू घरे, सारवलेलं अंगण दारात, मांडवावर बोकाळलेल्या मोगरा, जाई, जुईच्या वेली, जास्वंदी, गुलाब, कुंदाचे ताटवे, आवारात कुठेतरी दरवळणारी बकुळे, सुरंगी, चाफा, केवड्याची बेटे… गावागावांतील टुमदार, स्वच्छ सुंदर मंदिरे, त्या मंदिरातील देवता अन् परिसरातील इतर दैवतांविषयीच्या आख्यायिका, गूढ संबंध, जत्रा, उत्सव, शिगमा, मांड आणि त्यात सहभागी होणारी उत्साही गावकरी, अनेक प्रथा, लोकनृत्ये, लोकगीते…. जुन्या देवळातील पुरातन शिल्पाकृती, कलाकुसरीने सजलेले घाटदार स्तंभ, सभामंडप, चित्राकृती असं खूप काय-काय आठवत गेलं. गावागावांतील महत्त्वाची स्थाने, या स्थानांशी बांधले गेलेले वेगवेगळ्या स्तरातील गावकरी, त्यांचा सलोखा. हिंदू-ख्रिश्‍चनांचा एकमेकांच्या सणा-उत्सवाविषयीची आस्था, सहभाग, गणेशोत्सव आणि नाताळात घरात बनणार्‍या पदार्थांची प्रेमाने होणारी देवाण-घेवाण, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची तत्परता…. चित्रफितीसारख्या या गोष्टी डोळ्यांसमोर सरकू लागल्या. या सगळ्याशी आपली ओळख आहे, नाते आहे या जाणिवेने मन भरून आले.

आणि हे असे माझ्या गोव्यातच का, या भूतलावरील प्रत्येक प्रदेशात असणार. एखादा भूप्रदेश आणि तेथील संस्कृतीवरचं झगमगतं, सुरेख कशिदाकारीचं दिखाऊ आवरण दूर करून तिच्या मूळ रूपाला निरखून पाहण्याएवढा, ओळख करून घेण्याएवढा वेळ आणि तशी तीव्र इच्छा आहे कुठे आपल्यात?
स्टेशनच्या दिशेनं धडधडत येणारी ट्रेन पाहता पाहता मन झाकोळून गेलं. आपण सारे वरवरचे पाहतो…. आणि वरवरचे जगतो, असा एक निराश, अगतिक भाव मन व्यापू लागला. एव्हाना गाडीत चढून माझा प्रवास सुरू झाला होता. गाडी शहराबाहेर पोचली. भोवतीच्या अंधारात मिसळली तशी अनावर झोपेत माझं विश्‍व बुडून गेलं.
सकाळी थोडी उशिराच जाग आली. पुरतं उजाडलं होतं. खिडकीतून दिसणारं निळंभोर आकाश, प्रफुल्लित हिरवी झाडे, हवेतील ताजेपणा मन प्रसन्न करून गेला. अचानक प्राथमिक शाळेत शिकलेली कविता आठवली-
देवा तुझे किती, सुंदर आकाश
सुंदर प्रकाश, सूर्य देतो…
लख्ख शब्दात अधोरेखित केलेले हे सौंदर्य तर सर्वत्र भरून आहे. ते सर्वांसाठी आहे, सर्वांचे आहे. ते गोव्यात आहे, तसे ठाण्यातही आहे. ते शाश्‍वत आहे, सत्य आहे. आणि त्याला कुणीही, कुठलाही बेगडी मुलामा देऊ शकत नाही. ते कशा आड दडवता येत नाही.
काहीतरी अलौकिक, निर्भेळ गवसल्यासारखं वाटलं. त्यात ‘सुंदर वेलींची, सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी’- या ओळीतील सध्या लोप पावलेला निरागस, भोळा भाव दुर्लक्षित करून ‘सुंदर प्रकाश सूर्य देतो’ या पारदर्शी जाणिवेत मन बुडून गेले.