मनःशांतीसाठी आत्मपरीक्षण

0
201

–  प्रा. रमेश सप्रे

नुसते विधिनिषेध (डूज अँड डोन्ट्‌स) लादणं उपयोगी पडणार नाही. शरीराच्या आरोग्याकडे आपण व्यायाम, आहार, रोगप्रतिकारक शक्ती अशा विविध अंगांनी लक्ष देतो. पण तरीही आपण अनेक कारणांनी, एखादी गोष्ट मनाविरुद्ध किंवा अपेक्षेप्रमाणे झाली नाही तर अस्वस्थ होतो. आपल्या मनाचा तोल जातो. आपण मनोविकारांनी त्रस्त होतो.

पाश्चात्त्य देशांनी विज्ञान- तंत्रज्ञानात खूप प्रगती केलीय. अद्भुत वाटावी अशी प्रगती सुरूच आहे. आपण तत्त्वज्ञान- आत्मज्ञान या क्षेत्रात खूप विकास केला. आपल्या देहाच्या सुखसोयीसुविधा याकडे पाश्चात्त्य संशोधकांचं अधिक लक्ष होतं. अजूनही आहे. पण आपल्या अंतरंगाचा म्हणजे मनःशांती, समाधान यांचा विचार प्राचीन काळापासून आपले ऋषीमुनी, विचारवंत करत आले आहेत.
उपनिषदात गुरु-शिष्य यांच्यातील संवादातून मनबुद्धीची रचना, कार्य, त्यांना हाताळायचे मार्ग याविषयी मौलिक मार्गदर्शन सार्‍या मानवजातीसाठी करण्यात आले आहे. विज्ञान- तंत्रज्ञानाचा एक विशेष म्हणजे एका प्रश्‍नाचं उत्तर मिळालं तर त्यातून दुसरे प्रश्‍न निर्माण होतात. प्लास्टिक हे याचं उत्तम उदाहरण आहे. अतिशय सोयीची असलेली ही वस्तू शेकडो वर्षं नैसर्गिक रीतीनं नष्ट न होण्याच्या गुणधर्मामुळे सर्व जगात प्रदूषण, कचरा, वातावरणाची हानी हे प्रश्‍न आ वासून उभे आहेत. दुसरं जीवघेणं उदाहरण म्हणजे जंतुनाशकं. पिकांवरील कीड मारण्यासाठी फवारलेली जंतुनाशकं किंवा कीटकनाशकं धान्यातून आपल्या शरीरात शिरली. एवढेच नव्हे तर गवतात शिरून दुधावाटे आपल्याला आतून दूषित करत राहिली.
याउलट उपनिषदातील ऋषीमुनींच्या चिंतनातून आपल्याला आनंदात राहण्याचा मार्ग मिळाला. बुद्धीची स्थिरता, चित्ताची शुद्धी यातून हमखास लाभणारी मनःशांती आपल्या अनुभवाच्या कक्षेत आली. पण दुर्दैवानं देहसुखाच्या नि उपभोगांच्या मागे लागून आपण आतून दरिद्री बनलो आहोत. बाहेरचे बदल आपल्याला आतून उध्वस्त करु लागलेयत. वाईट गोष्ट म्हणजे वाटेल त्या मार्गानं पैसा, सत्ता मिळवण्यासाठी आपण खूप स्वार्थी नि संकुचित वृत्तीचे झालो आहोत.

अशा एका स्पर्धेच्या दुष्टचक्रात सारी मानवता सापडलीय की आपल्या कर्मातून निर्माण होणार्‍या दुष्परिणामांकडे लक्ष देऊन आपल्या एकूणच जीवनात कल्याणकारी परिवर्तनाकडे आपण दुर्लक्ष करत चाललो आहोत. याचं ठळक उदाहरण म्हणजे कोरोना नावाचा डोळ्यांना न दिसणारा विषाणू नि त्यातून होणार्‍या कोविड-१९ या महाभयंकर महामारीनं उभं केलेलं जागतिक संकट. यातून सुटकेचा प्रयत्न करत असूनही सारी मानवजात अधिक यातनामय कालखंडाकडे प्रवास करत आहे. अगतिक, असहाय होऊन!
या पार्श्‍वभूमीवर हजारों वर्षांपूर्वी गुरु-शिष्य यांच्यात झालेली प्रश्‍नोत्तरं नि चर्चा आजही उद्बोधक आहे. असाच एक शिष्य कुतुहलानं विचारतो-
‘‘ॐ केनेषितं पतति प्रेषितं मनः|
केन प्राणः प्रथमः प्रैति युक्तः॥
केनेषितां वाचमिमां वदन्ति चक्षुः|
श्रोत्रं क उ देवो युनक्ति ॥
हे एकमेकांशी संबंधित असलेले प्रश्‍न शिष्य विचारतो. हे सारे प्रश्‍न त्यानं अगदी तळमळीनं विचारलेयत. त्याला आत्मज्ञान झालेले गुरू उत्तरं देताना त्याची जिज्ञासा अधिक प्रेरित करणार आहेत. अशा प्रश्‍नातून प्रश्‍न एवढंच नव्हे तर दिल्या गेलेल्या उत्तरातून नवे प्रश्‍न असा ज्ञाननिर्मितीचा आनंदप्रवाह सुरू राहणार आहे,
शिष्याच्या प्रश्‍नाचा आरंभ ‘केन’ या शब्दानं झाल्यामुळे याला ‘केनोपनिषद’ असं नाव पडलंय. शिष्याच्या प्रश्‍नांचा सरळ अर्थ असा-
– कोणाच्या इच्छेनं प्रेरित झालेलं (आपलं) मन बाहेरील वस्तूंकडे, विषयांकडे धावतं?
– कोणाच्या प्रेरणेनं प्राण आपले व्यवहार पार पाडतो?
– कोणी प्रेरित केलेली वाणी लोक बोलतात?
– डोळे नि कान यांना कोणता देव आपापली काम करायला लावतो?
या प्रश्‍नातून एक गोष्ट स्पष्ट होते की शिष्याला डोळे, कान, वाणी यांना त्यांच्या त्यांच्या कार्यासाठी मिळणारी प्रेरणा त्यांची स्वतःची नसते. इतकंच काय पण मन, प्राणसुद्धा स्वप्रेरणेनं त्यांचं कार्य करत नाहीत. मग या सार्‍या इंद्रियं- मन- प्राणांचा खरा प्रेरक कोण? कोणता देव किंवा देवता त्यांना काम करण्याची शक्ती व दिशा देतो असा प्रश्‍न विचारण्यात खरी जिज्ञासा ही आहे की या सार्‍यांचा प्रेरक कोण हे कळलं तर त्याच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग, त्याला प्रसन्न करण्यासाठी योग्य ती उपासना आणि या सार्‍या प्रयत्नातून अधिक चांगला माणूस बनण्याची नि अधिक प्रभावी जीवन जगण्याची दिशा कोणती हे निश्चित ठरवता येईल.

या जीवनाबद्दल विचारलेल्या गंभीर प्रश्‍नाला गुरु उत्तरही तसंच देतात.
‘‘श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यद् |
वाचो ह वाचं स उ प्राणस्य प्राणः॥
चक्षुश्च चक्षुः अतिमुच्य धीराः|
प्रेत्यास्माल्लोकात् अमृता भवन्ति ॥
ऋषींची उत्तरं देण्याची भाषा त्यांच्या अनुभवावर आधारित असते. तिला ‘समाधी भाषा’ असंही म्हटलं जातं. हेच पहा ना-
कानाचा जो कान, मनाचे जो मन, वाचेची जो वाचा, प्राणाचा जो प्राण, डोळ्याचा जो डोळा आहे तो आत्मा या सर्वांना प्रेरित करतो. शहाणी (विवेकी) माणसं त्या आत्म्याला जाणतात आणि आशाश्‍वत (अनित्य, अनात्म) दूर करून अमृतत्व प्राप्त करून घेतात.
आपण उपनिषदातून मनःशांतीचा मार्ग शोधत आहोत. केनोपनिषदातील ही प्रश्‍नोत्तरं या दृष्टीनं महत्त्वाची आहेत. क्रमाक्रमानं विचार करू या.

इंद्रियं निरनिराळ्या प्रकारची कामं करतात. प्रत्येक इंद्रियाचं कार्य ठरलेलं असतं. कान पाहू शकत नाही. डोळे ऐकू शकत नाहीत. तोंड पाहू- ऐकू शकत नाही. पण कानांनी ऐकलेलं, डोळ्यांनी पाहिलेलं याचं वर्णन मात्र तोंड करतं. हे कसं घडतं? याचं उत्तर सोपं. कारण प्रत्यक्षात कान ऐकतच नाहीत नि डोळे पाहतच नाहीत. सार्‍या इंद्रियांची कामं मेंदूतली त्यांची केंद्र करतात. म्हणून एखाद्या अपघातात मेंदूतील श्रुती (ऐकणं) नि दृष्टी (पाहणं) यांच्या केंद्रांना इजा झाली तर कानडोळे अगदी ठीक असूनही ती व्यक्ती बहिरी नि आंधळी बनू शकते.

सर्वांत वाईट म्हणजे स्मृतिभ्रंश झालेली व्यक्ती काना-डोळ्यांनी ऐकून- पाहूनसुद्धा अर्थपूर्ण प्रतिसाद देऊ शकत नाही, प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही. संवाद साधू शकत नाही. कोणत्याही प्रकारची मनोविकृती झाली की त्या व्यक्तीचं वर्तन सामान्य राहत नाही. त्यांना नीट शिकवता येत नसल्यानं, म्हणजे आपल्या शिक्षण- प्रशिक्षणाला आवश्यक तो प्रतिसाद देऊ शकत नसल्यानं शरीरासाठी द्यावयाची औषधं सोडल्यास इतर मानसिक उपचार करणं एक आव्हान किंवा समस्या बनून राहतं.

यासाठी मन आरोग्यवान ठेवण्यावर ऋषीमुनींचा भर असतो. रोगी मनं किंवा मनोरुग्ण यावर उपचार करण्यापेक्षा मनं निरोगी ठेवण्याच्या पद्धती, व्यायाम, ध्यान, नामस्मरण इ. साधनं, श्रवण- वाचन- मनन- चिंतन यांसारख्या गोष्टी करावयाची स्वयंशिस्त यावर घरी नि शाळा-कॉलेजातून मार्गदर्शन व्हायला हवं. त्यात सर्वांचा सहभाग हवा. नुसते विधिनिषेध (डूज अँड डोन्ट्‌स) लादणं उपयोगी पडणार नाही. शरीराच्या आरोग्याकडे आपण व्यायाम, आहार, रोगप्रतिकारक शक्ती अशा विविध अंगांनी लक्ष देतो. पण तरीही आपण अनेक कारणांनी, एखादी गोष्ट मनाविरुद्ध किंवा अपेक्षेप्रमाणे झाली नाही तर अस्वस्थ होतो. आपल्या मनाचा तोल जातो. आपण मनोविकारांनी त्रस्त होतो.

ऋषींनी यावरच उपाय सांगितलेयत.
पहिली गोष्ट म्हणजे चिंतनातून, निरीक्षणातून पूर्ण ज्ञान मिळवणं. हे प्रत्येकाला शक्य नसतं. म्हणून त्यानं काय करावं तर ‘प्राप्यवरान् निबोधत’ म्हणजे ज्यांना असं ज्ञान मिळालं आहे त्यांना शरण जाऊन त्यांच्याकडून हे ज्ञान मिळवावं. नाहीतर सद्ग्रंथ म्हणजे उपनिषदं, गीता, संतांचं वाङ्‌मय यातून अंतःकरणाच्या आरोग्यासाठी अचूक ज्ञान मिळतं.
डोळ्याचा डोळा, कानाचा कान असं जेव्हा ऋषी म्हणतात तेव्हा त्यांना डोळ्याचा डोळा म्हणजे विज्ञानानं दिलेला चष्मा, कॉंटॅक्ट लेन्स असं म्हणायचं नसतं. तसंच कानाचा कान म्हणताना श्रवणयंत्रं सुचवायची नसतात. हे बाहेरून बाहेर झालं. डोळ्याच्या बाहेर चष्मा ज्याला उपनेत्र म्हणतात. कानाच्या बाहेर ऐकण्याचं यंत्र लावावं लागतं. तसंच इतर इंद्रियांच्या बाबतीत असतं. वैद्यकीय क्षेत्रातल्या शस्त्रक्रिया, उपकरणं, यंत्रं ही बाहेरूनच सारे व्यवहार करतात. निरनिराळ्या चाचण्या- रक्ततपासण्या हेही बाहेरूनच केलं जाते.

याउलट ऋषी हे आत जायला सांगतात. मन- बुद्धी- चित्त अशी साखळी त्यांनी विषय समजून देण्यासाठी तयार केलीय. हे काही अंतरंगातले कप्पे किंवा टप्पे नाहीयेत. या सर्वांच्या आत असलेलं आत्मतत्त्व म्हणजे मूळ शक्ती, चैतन्य हे सार्‍या क्रिया-कृतींमागची प्रेरणा असते. सारे अनुभव तिथूनच घेतले जातात. तिथंच प्रतिसाद- प्रतिक्रिया तयार होतात. वरवर इंद्रियं कार्यरत असल्यासारखी दिसतात. पण त्यांची मूळ प्रेरणा आत्म्यापासून आलेली असते.
काही उदाहरणं – मोठ्या यंत्रात, गुंतागुंतीच्या संगणकात, अद्भुत कामं करणार्‍या यंत्रमानवात (रोबो) असंख्य छोटे- छोटे भाग, निरनिराळ्या आकाराची चक्रं नि इतर मती गुंग करणारी रचना असते. पण ही सारी यंत्रं किंवा साधनं चालतात एकाच शक्तीवर मग ती शक्ती विद्युत असेल किंवा बॅटरी, डिझेल यासारख्या पदार्थांतून आलेली असेल. हे कळलं की विविध यंत्रांबद्दल त्यांच्या रचना नि कार्याबद्दल आश्चर्य वाटणं कमी होतं.

सार्‍या विश्‍वात सजीव- निर्जीवांची थक्क करून टाकणारी विविधता आहे. तरीही त्यांच्या आत असलेली जीवशक्ती, चैतन्यशक्ती एकच असते. वरवर निर्जीव वाटणार्‍या वस्तूतही शक्तीचा प्रवाह असतो. ज्ञानदेवांसारखे म्हणून म्हणतात-
‘‘उपाधिमाजी गुप्त | चैतन्य असे सर्वगत | परी ते तत्त्वज्ञ संत | स्वीकारिती ॥
इथं ‘संत’ या शब्दाच्या ठिकाणी शास्त्रज्ञ- वैज्ञानिक- संशोधक असे शब्द वापरले तरी चालेल. आइन्स्टाइनसारख्या उच्च कोटीचा चिंतनशील वैज्ञानिकानं जगाला नवं समीकरण देताना त्याला ‘शक्ती समीकरण (एनर्जी इक्वेशन)’ असंच नाव दिलं, ज्यात त्यानं भौतिक पदार्थ (मॅटर) आणि शक्ती (एनर्जी) हे एकमेकात परिवर्तीत होऊ शकतात हेच सांगितलं. – हे समजायला अवघड वाटलं तरी महत्त्वाचं आहे.
यासाठी उपासनेच्या दृष्टीनं काही सूत्रं सांगता येतील –

* देह, इंद्रियं आणि मन यांच्याद्वारे घडणार्‍या कार्यांची प्रेरणा आतून
(बुद्धीतून) येते.

* स्वतःच्या नि इतरांच्या बाह्य कृतींवरून त्यांच्या स्वभावाबद्दलचे निष्कर्ष काढू नयेत.

* हे सारं लक्षात येण्यासाठी विचारांचा झोत (फोकस) स्वतःवर ठेवावा. अंतरंगीची उपासना यासाठी नेहमीची वाटली तरी तीच उपासना पद्धती आहे.

* मौन- श्रवण- वाचन- मनन- चिंतन- ध्यान हे सारं अवघड वाटलं तर एकच करावं- भगवंताचं नामस्मरण करत रहावं. सध्याचं कोविडनिर्मित लादलं गेलेलं ‘लॉकडाऊन’ कधीतरी संपेल. पण अशी आत नेणारी, आत्मपरीक्षण करणारी उपासना अंगवळणी पडली पाहिजे. हे कठीण वाटेल- पण मग कोरोनाशी संघर्ष तरी कुठं सोपा आहे?