मध्य प्रदेशकडून गोव्याची हार

0
99

>> विजय हजारे क्रिकेट स्पर्धा

विजय हजारे क्रिकेट स्पर्धेतील काल रविवारी झालेल्या लढतीत गोव्याला मध्यप्रदेशकडून ८ गड्यांनी दारुण पराभव स्वीकारावा लागला. ‘क’ गटात असलेल्या गोव्याने प्रथम फलंदाजी करताना २२० धावा केल्या. मध्यप्रदेशने केवळ २५.४ षटकांत विजयी लक्ष्य गाठत १४६ चेंडू राखत विशाल विजयाला गवसणी घातली.

मध्यप्रदेशने या सामन्यात नाणेफेक जिंकून गोव्याला प्रथम फलंदाजी दिली. अमोघ देसाई (३९) व स्वप्नील अस्नोडकर (८५) यांनी गोव्याला ९८ धावांची खणखणीत सलामी दिली. पहिल्या गड्याच्या रुपात अमोघ बाद झाल्यानंतर कर्णधार सगुण कामत (१८) व स्वप्नील यांच्यात दुसर्‍या गड्यासाठी ३५ धावांची भागीदारी झाली. यानंतर मात्र गोव्याची मधली फळी साफ कोलमडली. १ बाद १३३ अशा भक्कम स्थितीतून गोव्याची ७ बाद १७१ अशी केविलवाणी स्थिती झाली. दर्शन मिसाळ (२३) व लक्षय गर्ग (२४) यांच्यामुळे गोव्याला दोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. परंतु, पुन्हा एकदा गोव्याचा संघ निर्धारित षटके फलंदाजी करू शकला नाही. ४८.३ षटकांत गोव्याचा डाव आटोपला. मध्यप्रदेशकडून सोहराब धालिवाल व अंशुल त्रिपाठी यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. अंकित कुशवाह याने दोन तर अंकित शर्मा व रमीझ खान यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. माफक लक्ष्याचा पाठलाग करताना रजत पटीदार (नाबाद १२४, १३ चौकार, ७ षटकार) व नमन ओझा (५० धावा, २६ चेंडू, ४ चौकार, ४ षटकार) या दुकलीने गोव्याच्या गोलंदाजांवर तुटून पडताना केवळ ९.४ षटकांत ८१ धावा जोडल्या. नमन बाद झाल्यानंतरही रजतने आपली आक्रमकता कायम ठेवली. रमीझ खान (२९) दुसर्‍या गड्याच्या रुपात बाद झाला तोपर्यंत मध्य प्रदेशचा विजय निश्‍चित झाला होता. कर्णधार हरप्रीत सिंग १७ धावांवर नाबाद राहिला. कालच्या पराभवामुळे गोव्याची ‘क’ गटात चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. आज गोव्याचा सामना मुंबईशी होणार आहे.