मध्यपूर्वेतील तणाव

0
141

इराणने आपले मानवरहित टेहळणी ड्रोण पाडल्याचा ठपका ठेवून त्या देशावर हल्ले चढवण्याचे आदेश अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले होते, मात्र नंतर परिणाम लक्षात घेऊन त्यांनीच त्याची कार्यवाही रोखली असे धक्कादायक वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने काल दिले आहे. इराणवर हल्ले चढवायला ट्रम्प यांना विदेशमंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व सीआयएच्या प्रमुखांनी हिरवा कंदील दर्शवला होता, पण पेंटागॉनच्या प्रमुखांनी आखातातील अमेरिकी सैनिकांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून तसे न करण्याचा सल्ला दिल्याने ट्रम्प मागे हटले असे न्यूयॉर्क टाइम्सचे म्हणणे आहे. खरोखरच ट्रम्प यांनी इराणवर आक्रमणाचा बेत केला होता का हे जरी अद्याप स्पष्ट होत नसले, तरीही गेल्या अनेक दिवसांपासून इराणवर अमेरिकेने वाढवलेला दबाव लक्षात घेता असे काही टोकाचे पाऊल उचलण्यास ट्रम्प यांच्यासारखा लहरी माणूस मागेपुढे पाहणार नाही. तसे घडले तर पुन्हा एकदा एका मोठ्या जागतिक समस्येला तोंड फुटू शकते आणि त्याची धग अर्थातच भारतालाही पोहोचल्याविना राहणार नाही. ओबामा यांनी २०१५ साली इराणशी केलेला आण्विक करार ट्रम्प यांनी सत्तेवर येताच त्या करारामध्ये इराणला वाजवीहून अधिक सवलती मिळाल्याचे सांगत रद्द करून टाकला. तेव्हापासून इराण – अमेरिका संघर्षाला तोंड फुटलेले आहे. इराण हा शियांचा देश. त्यामुळे संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया आदी सार्‍या अरब जगताचा त्याला कडाडून विरोध आहे. दुसरीकडे इस्रायलदेखील त्याच्या विरोधात आहे. इराणवर या अरब देशांचा, इस्रायलचा व अमेरिकेचा अनेक कारणांसाठी राग आहे. सिरियातील बशीर अल असद यांच्या राजवटीला इराणचा पाठिंबा आहे. शिवाय लेबनॉनमधील हिज्बुल्ला बंडखोर, येमेनमधील हौथी बंडखोर यांना इराणचे पाठबळ असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. इस्रायलचा याच कारणांसाठी इराणला विरोध राहिला आहे आणि अरबी जगतातील इतर देशही शिया – सुन्नी वादामुळे शियापंथीय इराणला पाण्यात तर पाहतातच, शिवाय हा त्याचा वाढता प्रादेशिक प्रभाव त्यांच्या डोळ्यांत खुपत आला आहे. इस्लामी बंडखोरांना इराणकडून बळ मिळाल्यास आपल्या पिढीजात राजसत्ता धोक्यात येतील याची अरब राजघराण्यांना चिंता आहे. त्यामुळे अमेरिकेच्या काठीने साप मरत असेल तर त्यांना ते हवेच आहे. परंतु मध्य पूर्वेच्या या प्रादेशिक प्रश्नामध्ये उडी घेत आणि फायदा उपटत अमेरिका आपले बस्तान तेथे बसवत चालली आहे. अमेरिकेने अलीकडे आपले लष्करी अस्तित्व तेथे वाढवत नेले आहे. आता तर बॉम्बर विमाने, क्षेपणास्त्रवाहू युद्धनौका आखाताकडे रवाना करून भीतीचे वातावरण प्रस्थापित केले आहे. इराणकडून कच्च्या तेलाची आयात करण्यावर अमेरिकेने यापूर्वी निर्बंध लादले, त्याची झळ भारतालाही बसली. त्यात भारतासह सात देशांना दिलेली १८० दिवसांची सवलत गेल्या महिन्यात संपली, त्यामुळे आता इराणकडून तेलाची आयात कमी करणे भारतालाही भाग पडले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये होर्मुझच्या आखातामध्ये तेलवाहू जहाजांवर झालेले हल्ले इराणनेच केल्याचा ठपका अमेरिकेने ठेवला. त्यातच इराणकडून अमेरिकी द्रोण पाडण्याचे प्रकरण घडले. अमेरिकेचे हे द्रोण आपल्या सागरी हद्दीत टेहळणी करीत होते म्हणूनच आम्ही ते पाडले असे इराणचे म्हणणे आहे. आपल्या बारा मैलांच्या सागरी हद्दीच्या आत आठ मैलांवरून ते उड्डाण करीत होते असे इराणचे म्हणणे, तर अमेरिकेच्या मते ते द्रोण आंतरराष्ट्रीय हवाई हद्दीतून चालले असताना इराणने त्याला पाडले. या सार्‍यातून आता तेथे खरोखरच तणावाची युद्धसदृश्य स्थिती निर्माण झालेली आहे. न्यूयॉर्क टाइम्सचे वृत्त खरे मानायचे तर हा हल्ला कधीही होऊ शकतो. ही एका मोठ्या जागतिक धोक्याची घंटा मानावी लागेल. पहिली बाब म्हणजे कच्च्या तेलाचे दर प्रचंड भडकतील. त्याची चिन्हे आताच दिसू लागली आहेत. इराण – अमेरिका युद्ध खरोखरच पेटले तर त्याचे भयावह परिणाम होऊ शकतात. अमेरिकेने अणुकरारातून माघार घेतल्यामुळे आता आपल्यावर त्यातील कलमे बंधनकारक उरलेली नाहीत असे इराणचे म्हणणे आहे. त्यामुळे युरेनियमचे मर्यादेबाहेरील साठे आपण जमवत असल्याची शेखी तो देश मिरवू लागला आहे. अमेरिका आणि इराणच्या या संघर्षाची झळ भारतालाही बसली आहे. इराण हा भारताचा पूर्वापार मित्रदेश राहिला आहे. शिवाय चीन विकसित करीत असलेल्या ग्वादार बंदराला प्रत्युत्तर म्हणून भारताने छबाहर बंदर इराणच्या साह्याने विकसित केले आहे. शिवाय इराण हा भारताचा मोठा तेल पुरवठादार देश आहे तो वेगळाच. मात्र, मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांच्या काळामध्ये संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, इस्रायल आदी देशांशी मैत्रिपूर्ण संबंध वाढविले. दुसरीकडे पाकिस्तान आणि चीनची वळवळ रोखण्यासाठी भारताला अमेरिकेची साथ अपरिहार्यपणे हवी आहे. त्यामुळे या संघर्षामध्ये भारत कात्रीत सापडलेला आहे. हा पेच सोडवणे हे नवे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यापुढील पहिले मोठे आव्हान मानले जाते आहे ते त्यामुळेच!