मद्यपान करून वाहन चालविणार्‍या ५९४ जणांवर कारवाई

0
99

मोहीम चालूच राहणार
मद्यपान करून वाहने चालवून जीवघेणे अपघात करणार्‍या वाहनचालकांविरुद्ध वाहूतक पोलीस विभागाने मोहीम उघडलेली असून गेल्या २६ दिवसांत राज्यभरात या नियमाचे उल्लंघन करणार्‍या ५९४ वाहनचालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली.
गेल्या २६ दिवसांपासून ही मोहीम चालू आहे, असे वाहतूक पोलीस विभागाचे अधीक्षक अरविंद गावस यांनी काल सांगितले. १५ ऑगस्ट रोजी वाहूतक पोलिसांनी रात्रीच्या वेळी मोहीम हाती घेतली असता मद्यपान करून चालवणारे २६ जण पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यात चारचाकी वाहनचालक तसेच दुचाकीचालक यांचा समावेश होता.
गेल्या १९ जुलै रोजी मद्यपान करून चारचाकी चालवणार्‍या एका महिलेने कांपाल येथे दोन दुचाकींना धडक दिल्याने हे दुचाकीचालक गंभीर जखमी होण्याची घटना घडली होती. या घटनेनंतर नशेत वाहन चालवणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी लोकांकडून होऊ लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक पोलिसांनी ही मोहीम हाती घेतलेली असून ती चालूच राहणार असल्याचे गावस यांनी सांगितले. नशेत वाहने चालवणार्‍यांना पकडणे सोपे व्हावे यासाठी वाहतूक पोलीस विभागाने ४ नवे आल्कोमिटर्स खरेदी केलेले असून लवकरच आणखी १२ आल्कोमीटर्स खरेदी करण्यात येणार आहेत. मद्यपान करून वाहन चालविल्यास दोन हजार रुपये दंडाची तरतूद आहे. मात्र, त्या रकमेत न्यायालय कपात किंवा वाढ करू शकते. संबंधितास न्यायालयात उभे केल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होते.