मद्यधुंद पर्यटकांविरोधात कडक कायद्याचा प्रस्ताव ः पर्यटनमंत्री

0
108

दारूच्या नशेत आंघोळीसाठी समुद्रात उतरणार्‍या पर्यटकांवर कडक कारवाई करण्याची गरज असून तसा कायदा करण्यात यावा, अशी सूचना आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना करणार असल्याचे पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी काल सांगितले. सरकारला आवश्यक वटहुकूम काढण्याचा व गरज वाटल्यास यंदाचा पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वीच तो जारी करण्याचा प्रस्ताव असल्याचे ते म्हणाले. हल्लीच्या दिवसांत काही व्यक्ती राज्यातील समुद्रात बुडून मरण्याच्या घटना घडल्याच्या पार्श्‍वभूमीवर आजगावकर यांनी काल किनारी पोलीस, दृष्टी लाईफ सेव्हिंग व गोवा पोलिसांबरोबर बैठक घेऊन समुद्रात पर्यटक बुडून ठार होण्याच्या ज्या घटना घडतात त्याबाबत चर्चा केली व कारणेही जाणून घेतली. बरेचसे पर्यटक दारूच्या नशेत समुद्रात स्नानासाठी उतरत असतात व तेही पर्यटक बुडण्यामागील एक महत्त्वाचे कारण असल्याचे आजगावकर म्हणाले. जे पर्यटक दारूच्या नशेत आंघोळीसाठी समुद्रात उतरतात त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी व त्यासाठी तसा कायदा करण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.