मत्स्यप्रेमींना स्वस्तात मासळी लवकरच

0
84

योजनेची अंमलबजावणी नोव्हेंबर अखेरीस
गोमंतकीयांना स्वस्तदरात मासळी उपलब्ध करून देण्याची योजना तयार झाली असून येत्या नोव्हेंबर अखेर या योजनेची अंमलबजावणी होणार असल्याचे खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले. त्यासाठी सरकारने पाच वाहनांसाठी निविदा जारी केली आहे. फिरते स्टॉल म्हणून या वाहनांचा वापर केला जाईल. वाहनातील मासळीचा दर्जा कमी होऊ नये. मासळी ताजी राहावी म्हणून या वाहनांमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असतील. वाहने खरेदी करण्याची तयारी चालू महिना अखेरपर्यंत पूर्ण होईल.
वरील वाहने सहकारी संस्थांना देण्याचा निर्णय झाल्याचे कळते. एका ग्राहकाला एक किलो मासळी देण्याची तरतूद योजनेत आहे. बर्‍याच काळापासून वरील योजनेची अंमलबजावणी लांबणीवर पडत आहे. आता खात्याच्या अधिकार्‍यांनी अंमलबजावणीच्या दृष्टीने गंभीरपणे पावले उचलली आहेत. बाजारातील मासळीचे दर बरेच वाढल्याने वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूनेच वरील योजना सरकारने तयार केली आहे.