मतिमंद मुलांची शाळा ः ‘दिलासा’

0
1188
  • अनुराधा गानू (आल्त सांताक्रूझ, बांबोळी)

त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता विकसित व्हावी यासाठी काही उपक्रम राबवले जातात. त्यांना योगासनं शिकवली जातात. नृत्यकला शिकवतात. म्युझिक थेरपीचाही उपयोग केला जातो.

आपल्या देशात प्राचीन काळापासून स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले गेले असा कंठशोष करणार्‍यांना उत्तर म्हणजे वैदिक वाङ्‌मय आणि इतिहासात गौरवपूर्ण उल्लेख असलेल्या लोपामुद्रा, विश्‍ववारा, अदिती, श्रद्धा, यमी, गौतमी, गार्गी, सरमा या विदुषी होत. यांनी वेदात आपले अढळस्थान मिळवले. या विद्वान स्त्रियांना ब्रह्मवादिनी म्हणून ओळखले जात असे. त्यानंतरच्या काळात हळूहळू पुरुष प्रधान संस्कृतीचा पगडा समाजमनावर बसला. स्त्रियांना कमी लेखले जाऊ लागले. त्यांनी शिकणं म्हणजे ‘पाप’ आहे असं त्यांच्या मनावर ठसवलं गेलं. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाऊ लागले. चूल आणि मूल एवढ्यापुरतंच स्त्रियांचं क्षेत्र मर्यादित राहिलं. त्या काळात स्त्रियांची स्थिती अत्यंत वाईट होती. विधवा आणि परित्यक्ता, घटस्फोटिता या अशा स्त्रिया म्हणजे समाजाला कलंकच मानल्या जात.

पण त्यानंतर, म्हणजे १९ व्या शतकात, ज्योतिबा फुले, अण्णासाहेब कर्वे, महादेव गोविंद रानडे अशा समाज धुरीणांनी महिलांच्या उन्नतीचा जणू विडाच उचलला आणि स्त्रियांवरील अत्याचाराविरुद्ध चळवळ सुरू केली. यामध्ये ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले व महादेव रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांचे फार मोठे योगदान आहे. स्त्रियांची जर उन्नती करायची असेल तर त्यांना प्रथम सक्षम, स्वावलंबी बनवावे लागेल आणि त्यासाठी त्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षणाची दारे त्यांच्यासाठी उघडावी लागतील. ही चळवळ जस्टिस महादेव गो. रानडे यांनी सुरू केली. आणि ‘चांगल्या कामाची सुरुवात घरापासूनच करावी’ त्याप्रमाणे १८७३मध्ये त्यांचे एका अशिक्षित मुलीबरोबर लग्न झाल्याबरोबर त्यांनी प्रथम आपल्या पत्नीला – रमाबाईंना शिकवायला सुरुवात केली. रमाबाईंनी ही त्यांना चांगला प्रतिसाद दिला. घरातल्यांचा आणि बाहेरच्यांचा विरोध पत्करून मराठी आणि इतर भाषा शिकायला सुरुवात केली आणि १९०९ मध्ये स्त्रियांचे शिक्षण आणि पुनर्वसन हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून ‘सेवा सदन’ ही संस्था सुरू केली. विशेषतः विधवा आणि घटस्फोटिता आणि परित्यक्ता स्त्रियांच्या उन्नतीसाठी ही संस्था सुरू झाली. अशा महिलांनी स्वावलंबी व्हावे व समाजात त्यांना मानाने जगता यावे, हा मुख्य उद्देश होता.

नंतर काळ बदलत गेला तसं सेवासदनने प्राथमिक शाळा, हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज आणि ट्रेनिंग स्कूलही सुरू केले. त्यानंतर मुली आणि महिलांसाठी वसतिगृह सुरू केले आणि लोकसेवेची १००-१२५ वर्षांची परंपरा राखत ३० वर्षांपूर्वी या संस्थेने आणखी एक पाऊल पुढे टाकले, ते म्हणजे समाजाची गरज लक्षात घेऊन प्रौढ मतिमंद मुलांसाठी सुरू केलेली शाळा- ‘दिलासा’. ३० वर्षांपूर्वी सेवासदन शाळेच्या प्राचार्या असलेल्या श्रीमती संध्या देवरूखकर यांच्या मनात हा विचार सुरू झाला आणि लगेच त्याला मूर्त स्वरूप आलं. खरोखरच या विशेष मुलांच्या पालकांना मिळालेला हा दिलासाच आहे. अशा मुलांना जर सतत कामात व्यस्त ठेवले तर आपणही काहीतरी करू शकतो, हा आत्मविश्‍वास त्यांच्यामध्ये जागा होतो. त्यामुळे अशी मुलं जास्त चांगल्या तर्‍हेने आयुष्य जगू शकतात. ती स्वावलंबी होऊ शकतात. त्यांना स्वावलंबी बनवून समाजात मानाने जगता यावे यासाठी सेवासदन दिलासाने चालवलेला हा एक अत्यंत चांगला प्रयत्न आहे.

दिलासा केंद्र हे वय वर्षे १८-४५ या गटातील मुलामुलींसाठी कार्यरत आहे. वेगवेगळे औद्योगिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा हा प्रयत्न आहे. आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा काही मुले पेपर वेगवेगळ्या दर्जाचे वेगळे वेगळे करत होते. काही मुले पेपर कटिंगचं काम करत होते. विचारल्यावर कळलं की हे बारीक तुकडे केलेले कागद पॅकिंगसाठी नेले जातात. नंतर आम्ही दुसर्‍या वर्गात गेलो. तिथे काही मुली पुठ्‌ठ्यावर मणी-टिकल्या चिकटवून रांगोळ्या तयार करत होत्या. त्यांच्या शिक्षिकांना विचारलं तेव्हा कळलं की एकदा डिझाईन तयार करून दिलं की मग या मुली टिकल्या, चमक्या, मणी वगैरे चिकटवून सुंदर रांगोळ्या तयार करतात. मी त्यातल्या ३ रांगोेळ्या विकत घेतल्या. एवढ्यासाठीच घेतल्या की आपण काहीतरी करतोय आणि ते कोणीतरी विकत घेतंय म्हणजे आपण चांगलंच करतोय हा विश्‍वास त्यांच्यामध्ये वाढावा आणि त्यांच्याशी बोलताना मला तो जाणवला. त्या मुलींना मी विचारलं ‘‘तुम्हाला पोचवायला कोण येतं?’’ एक मुलगी म्हणाली, ‘‘छे छे, पोचवायला कोणी नाही. आम्ही बसनेच शाळेत येतो-जातो. ९ ते ४ अशी त्यांच्या कार्यशाळेची वेळ आहे, असे त्यांनीच मला आपणहून सांगितले. इतर मतिमंद मुलांच्या शाळेपेक्षा मला एक वेगळेपण जाणवलं ते म्हणजे आपटे नावाच्या एक शिक्षिका त्यांना चक्क गणितं शिकवत होत्या. एका जागेवर बसून मुली गणितं सोडवत होत्या आणि बाईंना आणून दाखवत होत्या. त्या बाईंच्या मते वेळ लागतो पण अशा मुली आकडे-मोड करू शकतात. गणितं म्हणजे अगदी प्राथमिक, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशीच होती. पण अशा मुलांना ते जमणं हीसुद्धा त्यांच्या दृष्टीने जमेचीच बाजू होती. मी त्यांना म्हटलं, ‘इतकी कामं करता मग आणखी बेरीज -वजाबाकी शिकायची काय गरज आहे. एका मुलीनं पटकन उत्तर दिलं, ‘आम्ही केलेल्या वस्तू, पदार्थ वगैरे विकायला आम्हीच तर स्टॉलवर बसतो ना. मग आम्हाला बेरीज-वजाबाकी नको का यायला? म्हणून आम्ही गणित शिकतो. एवढा विचार ही मुलं करू शकतात याचंच मला कौतुक वाटलं. मग त्या मुलींनी बनवलेली वेगवेगळ्या प्रकारची लोणची, भाजणीची पीठं, चकल्या, चिवडा हे पदार्थ बघितले. पुढेही जर या मुलींच्या पालकांनी त्यांना साथ दिली तर, पुढाकार घेतला तर अशी मुलं-मुली आत्मविश्‍वासानं नक्कीच पुढे येतील.

मग जोशी बाई आणि पटवर्धन सर यांनी आम्हाला त्यांचं अद्ययावत स्वयंपाकघर दाखवलं. तिथं हे सगळे पदार्थ तयार केले जातात. एकदा त्या मुलींना सांगितलं की त्या मुली व्यवस्थित त्या त्या मापात सामान काढून घेतात आणि तिथेच पदार्थ बनवतात. स्वच्छता आणि पदार्थाची विश्‍वसनीयता ही सेवासदनची फार पूर्वीपासूनची परंपरा आहे, असे ते स्वयंपाकघर आणि पदार्थ पाहून वाटलं. यावरून मला सेवासदनाच्या साबुदाणा वड्याची आठवण झाली. रमाबाई रानडे यांनी सेवासदन ही संस्था सुरू केली- महिलांसाठी. विशेषतः विधवा, घटस्फोटिता आणि परित्यक्ता महिलांसाठी. कारण त्या काळात अशा महिला म्हणजे समाजाने टाकून दिलेल्या उपेक्षित महिला हीच त्यांची ओळख होती. अशा महिलांना शिक्षण देऊन, त्यांना स्वावलंबी बनवून समाजात त्यांना मानाचे स्थान मिळावे यासाठी ही सगळी धडपड होती. त्यावेळी सेवासदन, त्यांची शाळा पदार्थ बनवण्याची जागा, विक्री केंद्र हे पुण्याच्या लक्ष्मीरोडवर हुजूरपागा शाळेच्या समोर होतं. माझे वडील नेहमी तिथूनच साबुदाणा वडे आणायचे. आज वयाच्या ७४ व्या वर्षीसुद्धा लहानपणी खाल्लेल्या सेवासदनाच्या साबुदाणा वड्याची चव आणि कुरकुरीतपणा तोंडामध्ये रेंगाळतो आहे. अजूनही हीच विश्वसनीयता सेवासदनच्या नवीन लोकांनी जपलेली आहे.

शेती-बागायतीचे शिक्षणही थोड्याफार प्रमाणात या मुलांना दिलं जातं. शाळेच्या मागे थोडीशी जमीन आहे. तिथे ही मुलं भाज्या आणि इतरही प्रकारची झाडे लावतात. आपणच त्यांची मशागत करतात, पाणी घालून वाढवतात आणि विक्रीही करतात. त्यासाठी एका शिक्षकाची नेमणूक केलेली आहे.

दिलासामधले हे विद्यार्थी ज्या वस्तू, पदार्थ, भाजीपाला तयार करतात ते तिथल्याच स्टॉलवर विकतात. विक्री व्यवस्थापन हीच मुलं बघतात आणि त्याबद्दल त्यांना मानधनही मिळते. त्यामुळे अशा मुलांना प्रोत्साहन मिळते. स्वावलंबी होण्याच्या वाटेवरचं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही.
त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता विकसित व्हावी यासाठी काही उपक्रम राबवले जातात. त्यांना योगासनं शिकवली जातात. नृत्यकला शिकवतात. म्युझिक थेरपीचाही उपयोग केला जातो. शिवाय ध्यान-धारणाही दाखवली जाते. त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळावा यासाठी करमणुकीचे कार्यक्रमही केले जातात.

३० वर्षांपूर्वी असा एखादा विचार मनात येणं, आला त्याला मूर्त स्वरूप देणार्‍या त्यावेळच्या सेवासदनच्या मुख्याध्यापिका संध्या देवरूखकर यांचे योगदान खूप मोठे आहे. आजही तेथील व्यवस्थापक श्री. पटवर्धन सर, मेघना जोशी हे जातीने या सगळ्याकडे लक्ष पुरवत असतात. शिवाय तिथले सगळे शिक्षक यांचाही या कामात फार मोठा वाटा आहे. कारण या विशेष मुलांना शिकवणं, त्यांच्याकडून काही गोष्टी करवून घेणं, एकूणच या मुलांना कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवणं हे काम वाटतं तेवढं सोपं नाही. त्यासाठी समाजासाठी काही करायचंय ही भावना मुळातच असावी लागते आणि विशेषतः या कामासाठी मनापासून तळमळ असावी लागते. असे शिक्षण आणि कार्यकर्ते सेवासदनच्या ‘‘दिलासा’’ला लाभणं ही सेवासदनच्या दिलासाची एक मोठी उपलब्धी आहे, यात शंकाच नाही.
त्यांच्या या कार्याला मनापासून शुभेच्छा.