मतमोजणीनंतर गोव्यात सत्तापालट

0
130

>> लुईझिन फालेरो यांचा दावा

लोकसभा आणि गोवा विधानसभेच्या चार मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतमोजणीनंतर गोव्यात आणि केंद्रात सत्तापालट होणार आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे आमदार लुईझिन फालेरो यांनी कॉंग्रेसच्या आमदारांसमवेत कॉंग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केला.

या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, कॉंग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे, रवी नाईक, नीळकंठ हळर्णकर, आन्तोनियो फर्नांडिस, क्लाफासियो डायस, फ्रान्सिस सिल्वेरा, आलेक्स रेजिनाल्ड, इजिदोर फर्नांडिस, गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांची उपस्थिती होती.

कॉंग्रेस पक्षाने २०१७ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेसंबंधी केलेली चूक पुन्हा केली जाणार नाही, असेही आमदार फालेरो यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले. गोवा विधानसभेच्या २०१७ च्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला सर्वांत जास्त जागा मिळविल्या होत्या. राज्यपालांनी कॉंग्रेस पक्षाला सरकार स्थापनेची प्रथम संधी द्यायला हवी होती. परंतु, केंद्रीय पातळीवरील दबावामुळे राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन करण्याची संधी देऊन कॉंग्रेसवर अन्याय केला होता. पोटनिवडणुकीत गोव्यातील जनता पुन्हा एका कॉंग्रेस पक्षाला संधी देणार आहेत, असा विश्वास फालेरो यांनी व्यक्त केला. पणजीतील मतदारांनी बदलासाठी मतदान करावे, असे आवाहन फालेरो यांनी केले.